Success Story of Malvica Saxena: आज आपण उत्तर प्रदेशातील एका महिलेबद्दल जाणून घेणार आहोत, जिने तिच्या छोट्या छंदाचे रूपांतर मोठ्या व्यवसायात केले, जिचं नाव आहे, मालविका सक्सेना. मालविका उत्तर प्रदेशातील मथुरा येथील रहिवासी आहे. मालविकाला हाताने स्नीकर्स रंगवण्याची खूप आवड होती. पूर्वी, मालविका तिच्या घराच्या छोट्या तळघरात हे काम करायची पण लवकरच तिने या छंदाचे रूपांतर “द क्वर्की नारी” (The Quirky Naari) या मोठ्या ब्रँडमध्ये केले. चला तर मग, यानिमित्ताने मालविका सक्सेनाच्या यशोगाथेबद्दल जाणून घेऊया.
मालविकाचा जन्म १९९० मध्ये झाला. तिच्या वडिलांचा तंबाखूचा व्यवसाय होता. मालविकाने तिचे सुरुवातीचे शिक्षण मथुरा येथून पूर्ण केले आणि २००९ मध्ये मालविकाने बी.एससी केले आणि नंतर तिने मथुरा येथील जीएलए विद्यापीठातून एमबीए पदवी देखील मिळवली.
फॅशन डिझायनिंग कोर्सपासून केली सुरुवात
मालविकाने तिचे शिक्षण पूर्ण केल्यावर, तिच्या कुटुंबाने तिच्या लग्नासाठी मुलगा शोधण्यास सुरुवात केली. लग्न पुढे ढकलण्यासाठी तिने एका फॅशन डिझायनिंग संस्थेत प्रवेश घेतला. नंतर तिने तिथे शिक्षिका म्हणून काम करायला सुरुवात केली. एके दिवशी तिने तिच्या वॉर्डरोबमध्ये सापडलेले शूज सजवले. मालविकाने त्यावर एक अतिशय स्मार्ट क्वर्की डिझाइन बनवले, ज्यामुळे ते अगदी नवीन आणि सुंदर दिसत होते. जेव्हा मालविकाच्या धाकट्या बहिणीने बाहेर तिने बनवलेल्या डिझाइनचे शूज घातले तेव्हा तिच्या मैत्रिणींना ते खूप आवडले. यानंतरच, मालविकाने स्वतः रंगवून लोकांसाठी डिझायनर स्नीकर्स बनवायला सुरुवात केली.
मालविकाने तिचे इंस्टाग्राम पेज तयार केले आणि छोट्या प्रमाणावर तिचे काम सुरू केले. तिने पांढऱ्या स्नीकर्सवर खूप चांगले काम केले. हळूहळू मालविकाला अधिक ऑर्डर मिळू लागल्या. मालविकाच्या या ब्रँडचे नाव ‘द क्वर्की नारी’ म्हणजेच TQN आहे. २०२१ मध्ये, मालविकाने शार्क टँक इंडियामध्येही सादरीकरण केले होते, जिथे तिला दोघांकडून गुंतवणूक मिळाली होती. आज मालविका तिचा व्यवसाय ऑनलाइन चालवत आहे. या ब्रँडची उलाढाल ५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.