Success story of Mukesh Bansal: भारतात अनेक उद्योगपती आहेत की, ज्यांनी आपल्या जिद्द व मेहनतीवर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यातही त्यांना हे यश अल्पावधीत मिळाले नसून, त्यासाठी त्यांना खडतर प्रवासाला सामोरे जावे लागले आहे. आज आपण अशाच एका प्रसिद्ध उद्योजकाबद्दल जाणून घेणार आहोत; ज्यांनी भारतातील अग्रगण्य ई-कॉमर्स कंपनी myntraची स्थापना केली.

सोशल मीडियावरील सर्वांत प्रसिद्ध उद्योजकांपैकी एक म्हणजे मुकेश बन्सल. आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी असलेल्या मुकेश बन्सल यांचा व्यावसायिक जगतात एवढा गवगवा असेल, असे त्यांच्या ध्यानीमनी नसतानाही मुकेश बन्सल यांनी १८ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त बाजार भांडवल असलेल्या कंपन्या सुरू केल्या. मुकेश बन्सल यांनी पदवीनंतरची अनेक वर्षे शिकागोमध्ये डेलॉइट या कंपनीसाठी काम केले. तसेच बन्सल यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी अनुभव घेण्यासाठी सिलिकॉन व्हॅलीच्या काही कंपन्यांमध्येही काम केले.

हेही वाचा… बारावीनंतर सोडलं शिक्षण अन् सुरू केला पोल्ट्री व्यवसाय, आता आहेत कोट्यवधींचे मालक; जाणून घ्या सौंदरराजन भावंडांची अनोखी यशोगाथा

इथूनच त्यांना स्टार्टअपची कल्पना सुचली. त्यासाठी त्यांनी त्यांच्या दोन मित्रांना स्टार्टअप सुरू करण्यासाठी विचारले आणि मग त्या तिघांनी पुढच्या सहा महिन्यांत भारतात जाऊन काहीतरी नवीन करायचे ठरवले; परंतु जेव्हा भारतात परतण्याची वेळ आली तेव्हा मुकेश यांच्या त्या दोन्ही मित्रांनी माघार घेतली. मात्र, मित्र पाठी हटले तरी मुकेश बन्सल यांनी हार मानली नाही. ते भारतात परतले आणि २००७ मध्ये आशुतोष लावनिया व विनीत सक्सेना यांच्यासह Myntra या फॅशन ई-कॉमर्स कंपनीची स्थापना केली.

Myntra ची सुरुवात

Myntra सुरू करण्यापूर्वी मुकेश यांनी चार स्टार्टअपमध्ये काम केले होते. स्टार्टअपमध्ये आठ वर्षे काम करण्याचा अनुभव त्यांना खूप उपयुक्त ठरला. एका मुलाखतीत मुकेश म्हणाले की, जेव्हापासून त्यांनी इतरांच्या स्टार्टअपसाठी काम करायला सुरुवात केली तेव्हापासून त्यांना स्वतःचे काहीतरी करायचे होते. त्या काळात ते नेहमी नवनवीन कल्पना शोधत राहिले. यादरम्यान त्यांनी अनेक प्रयत्नही केले, जे अपयशी ठरले.

२००७ मध्ये गिफ्टिंग प्लॅटफॉर्म म्हणजेच भेटवस्तूंची विक्री करण्यासाठी myntra ची सुरुवात करण्यात आली होती. काही वर्षांतच myntra हा फॅशनविश्वात भारतातील सर्वांत लोकप्रिय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्ममध्ये परावर्तित झाला.

…अन् Flipkart झाली Myntra ची पॅरेंट कंपनी

Myntra नवीन उंची गाठत असताना, इतर मोठ्या ई-कॉमर्स व्यावसायिकांचे लक्ष त्यांच्याकडे गेले नसते तरच ते नवल ठरले असते. अखेरीस २०१४ मध्ये Flipkart ने Myntra ला २,७३० कोटी रुपयांच्या मोठ्या कराराद्वारे विकत घेतले. या वेळेस मुकेश बन्सल यांनी या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मला ४१,३६४ कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळवून देण्यासाठी मदत केली.

मुकेश बन्सल यांचं नेटवर्थ

Myntra लाँच करणारे मुकेश बन्सल सध्या आरोग्य आणि फिटनेस कंपनीचे सीईओ म्हणून काम करीत आहेत. त्यांची Cure fit ही फिटनेस कंपनी झपाट्याने वाढली. तसेच अत्यंत लोकप्रिय जिम चेन cult fit सह त्यांच्या अनेक व्यवसायांची भरभराट झाली. या यशामुळे टाटा डिजिटलने Cure fit आणि cult मध्ये आपलं स्वारस्य दर्शवलं. द इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, टाटाने कल्ट या कंपनीमध्ये एकूण ६२० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. आता cult fit आणि Cure fit ची किंमत १२,४११ कोटी रुपये आहे. मुकेश बन्सल यांची एकूण संपत्ती ४,२०० कोटींहून अधिक आहे.

हेही वाचा… विड्या विकून आईनं बनवलं मुलाला IAS अधिकारी, UPSC परीक्षेत मिळवला २७ वा क्रमांक; वाचा अनोखी यशोगाथा

मुकेश बन्सल यांचं शिक्षण

मुकेश बन्सल मूळचे हरिद्वार, उत्तराखंडचे असून, मध्यमवर्गीय कुटुंबात ते वाढले. त्यांनी आयआयटी कानपूरमधून बी.टेक. केले आहे. ही पदवी मिळविल्यानंतर त्यांनी दोन वर्षे ‘डेलॉइट’मध्ये सिस्टीम विश्लेषक म्हणून काम केले. त्यांनी NexTag, eWanted, Centrata व newScale यांसारख्या इतर कंपन्यांमध्येही काम केले आहे. या सर्व कंपन्या सिलिकॉन व्हॅलीतील सुरुवातीच्या स्टार्टअप कंपन्या आहेत.