Success Story Of Romil Dwivedi : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) काही दिवसांपूर्वी नागरी सेवा परीक्षा (CSE) २०२४ चा अंतिम निकाल जाहीर केला. त्यामध्ये प्रयागराजची शक्ती दुबे अव्वल आणि त्यानंतर हर्षिता गोयल व अर्चित डोंगरे यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे. पण, या यादीत आणखीन एक अनोखे नाव आहे; ज्याने कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
रोमिल द्विवेदी (Romil Dwivedi) याने यूपीएससी सीएसई २०२४ (UPSC CSE 2024) मध्ये प्रभावी ऑल इंडिया रँक (AIR) २७ मिळवली आहे. त्याच्या यशाला आणखी उल्लेखनीय बनविणारी गोष्ट म्हणजे त्याने औपचारिक प्रशिक्षणाशिवाय हा टप्पा गाठला. कठोर परिश्रम आणि अडचणींवर मात करून, तो ही परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. चला तर पाहू त्याचा प्रवास…
रोमिल द्विवेदी कोण आहेत (Who is Romil Dwivedi)
रोमिल द्विवेदीहा मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याचे वडील के. के. द्विवेदी भोपाळमधील सहकार विभागात सहकार आयुक्त म्हणून काम करीत होते. के. के. द्विवेदी यांच्या मते, त्यांचा मुलगा लहानपणापासूनच शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करीत होता. सुरुवातीला रोमिलने २०२२ मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि ऑल इंडिया रँक ३६४ मिळवली. त्यानंतर तो भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा (IRS)मध्ये सामील झाला. जरी त्याने त्याच्या प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात रेल्वे व्यवस्थापन सेवे (IRS) मधून केली असली तरी त्याला नेहमीच भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) जाण्याची इच्छा होती.
परंतु, रोमिलला आयएएस अधिकारी व्हायचे होते. म्हणून त्याने २०२४ मध्ये पुन्हा यूपीएससी परीक्षेसाठी प्रयत्न केला. परीक्षा दिली आणि यावेळी त्याने थेट टॉप ३० मध्ये स्थान मिळवले. त्याच्या कठोर परिश्रम आणि चिकाटीला अखेर फळ मिळाले. रोमिलने यूपीएससीची तयारी करण्यासाठी स्व-अभ्यासावर अवलंबून राहण्याचा निर्णय घेतला. पण, तरीही त्याने त्याच्या यशाचे श्रेय त्याचे काका, राज्य वित्त सेवांमध्ये अधिकारी असलेले प्रकाश द्विवेदी यांना दिले आहे. सध्या त्याचे प्रशिक्षण जयपूरमध्ये सुरू आहे.