Varun Chakravarthy : भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे विजेतेपद पटकावले आहे. भारताने न्यूझीलंडचा अंतिम सामन्यात ४ विकेट्सने पराभव केला. भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता ही स्पर्धा आपल्या नावे केली. एवढंच नाही तर भारताने तीन वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा देश म्हणून इतिहास रचला आहे. या ऐतिहासिक विजयानंतर देशभरातून भारतीय खेळाडूंचे कौतुक केले जात आहे. या खेळाडूंमध्ये वरुण चक्रवर्तीचेसुद्धा नाव सर्वात पुढे आहे. वरुणने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करत दमदार कामगिरी केली. त्याने १० षटकांत ४२ धावा देत ५ विकेट्स घेतल्या होत्या, ज्यामुळे भारतीय संघ ४४ धावांनी विजय मिळवू शकला. पण, तुम्हाला या स्टार स्पिनर वरुण चक्रवर्तीचा प्रवास माहितीये का? आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत. (Success Story of spinner Varun Chakravarthy struggle Movie actor architect turned into Indian cricketer inspiration story)
वरुण चक्रवर्तीची जरी आता चर्चा होत असली तरी खूप कमी लोकांना त्याचा संघर्ष माहीत आहे. २०१४ मध्ये वरुणने तामिळच्या ‘जीवा’ नावाच्या सीरिअलमध्ये एका क्रिकेटरचे पात्र साकारले होते, जो जीवनात खूप संघर्ष करतो. पण, त्यावेळी त्याला हे माहिती नव्हते की त्याच्या खऱ्या आयुष्यातसुद्धा त्याला असाच सामना करावा लागेल.
वरुणची कहाणी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. वरुणने क्रिकेटर बनण्यापूर्वी शेफ म्हणून काम केले, सिनेमात आपले नशीब आजमावले, तो आर्किटेक्ट म्हणून घरांची डिझाइन करायचा; पण आज तर त्याने त्याच्या गोलंदाजीने देशाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली
एसआरएम विद्यापीठातून आर्किटेक्चरची पदवी घेतल्यानंतर तो दिवसा घरांचे नकाशे बनवायचा आणि रात्री क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहायचा. २५ वर्षांच्या वरुणने एकदिवस असा निर्णय घेतला, ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. त्याने फ्रिलान्स आर्किटेक्टची नोकरी सोडून क्रिकेट पुन्हा खेळण्याचा निर्णय घेतला. तो एका लोकल क्लबमध्ये विकेटकीपर- फलंदाज आणि वेगवान गोलंदाज म्हणून सराव करायचा. त्याला गुडघ्याचा त्रास होता, पण या त्रासाला त्याने आपली ताकद बनवली आणि स्वत:ला एक अनोखा स्पिनर म्हणून समोर आणले. त्याच्या स्पिनच्या कलेने भारत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकू शकला.
२०१७-१८ मध्ये जुबली क्रिकेट क्लबसाठी खेळताना त्याने सात सामन्यांत ३१ विकेट्स घेतल्या, तसेच तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये तो मदुरै टीमकडून खेळला. त्याची अप्रतिम गोलंदाजी आयपीएल स्काउट्सच्या नजरेत आली आणि किंग्ज इलेवन पंजाबने ८.४ कोटी रुपयांमध्ये त्याला संघात जागा दिली. पण, त्याचा आयपीएल डेब्यू इतका खास राहिला नाही, पण २०२० मध्ये कोलकाता नाइट राइडर्स (केकेआर) ने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि वरुणने चांगली कामगिरी केली, त्याने १७ विकेट घेतल्या. एवढंच काय, तर एका सामन्यात त्याने पाच विकेट्स घेतल्या आणि तो केकेआरचा स्पिन गोलंदाज ठरला.
२०२१ मध्ये फिटनेसच्या कारणाने त्याला राष्ट्रीय संघात परत खेळता आले नाही, पण वयाच्या ३३ व्या वर्षी त्याने टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये डेब्यू केले. २०२५ आईसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी फाइनलमध्ये त्याने एक महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या स्पिन गोलंदाजीने भारताला विजयाच्या आणखी जवळ आणले.
आयुष्यात चढ उतार येत असतात. कधी कधी जबाबदारीच्या मागे धावताना स्वप्ने मागे पडतात, पण वरुणने नेहमी स्वप्न पाहणं सोडलं नाही आणि स्वप्नांचा पाठलाग केला. कधी अभिनेता तर कधी शेफ बनला एवढंच काय तर आर्किटेक्ट म्हणूनही काम केले; पण फक्त इच्छाशक्तीच्या जोरावर तो आयुष्यात पाहिजे ते मिळवू शकला. वरुण चक्रवर्ती हजारो तरुणांसाठी एक प्रेरणा आहे, जे त्यांच्या आयुष्यात मोठं काहीतरी करण्याची इच्छा बाळगतात.