Success Story: आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी वय, पैसा, धर्म अशी कोणतीही अट नसते. स्वप्न साकारण्यासाठी फक्त आपली मेहनत आणि चिकाटी या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. आपल्या भारतात असे अनेक दिग्गज आहेत की, ज्यांनी अनेक अडचणींवर मात करीत स्वतःचे स्वप्न साकारले आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका तरुणाची ओळख करून देत आहोत की, ज्याने अगदी कमी वयात यश मिळवले आहे. सूर्य वर्षण (वय २३) हा तमिळनाडूतील मदुराई येथील तरुण आहे. पण, इतक्या लहान वयातही सूर्य वर्षण 'नेकेड नेचर' नावाच्या कंपनीचा संस्थापक आहे. हा D2C ब्रॅण्ड आहे. त्याने १२वीमध्ये असताना पहिले उत्पादन बनवले, जे एक प्रकारचे मीठ होते. आज त्याची कंपनी अनेक प्रकारची उत्पादने विकते. या कामाची सुरुवात सूर्यदर्शनने केवळ २०० रुपयांपासून केली होती आणि त्याच कंपनीची किंमत आता १० कोटी रुपयांहून अधिक आहे. लहानपणापासून व्यावसायिक होण्याची इच्छा (Success Story) सूर्य वर्षण एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात वाढला. त्याच्या वडिलांचा मदुराईमध्ये फोटो स्टुडिओ आहे. त्यावेळी ते कुटुंबातील एकमेव कमावते होते. सूर्य वर्षणला एक लहान भाऊ असून, त्याची आई गृहिणी आहे. सूर्य वर्षणला लहानपणापासूनच स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा होती. सूर्य वर्षण १२वीत होता तेव्हा त्याने बाथ सॉल्टचे प्रयोग सुरू केले होते. तिथे त्याने मिठाला हिबिस्कस बाथ सॉल्ट, असे नाव दिले होते. हे मीठ विकण्यासाठी ठेवले असताना, कोणीही ते विकत घेतले नाही. सूर्य वर्षण वयाने लहान असल्यामुळे लोक त्याला गांभीर्याने घेत नव्हते. २०१७ मध्ये त्याने चेन्नईच्या जेप्पियर इंजिनियरिंग कॉलेजमध्ये BE सिव्हिल इंजिनियरिंगसाठी त्याने अॅडमिशन घेतले. पण तेव्हादेखील तो सुटीच्या दिवशी हा प्रयोग करायचा. पण तेव्हादेखील त्याच्या उत्पादनांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर एके दिवशी एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी त्यांच्या वृद्ध आई-वडिलांना सांधेदुखीचा त्रास होत असल्याने त्यांच्यासाठी सूर्य वर्षणकडून बाथ सॉल्टचा एक जार विकत घेतला. एका आठवड्यानंतर त्यांनी सूर्य वर्षणला फोन केला आणि त्याला दर आठवड्याला सहा जार पुरवायला सांगितले. या पहिल्या यशातून सूर्य वर्षणला आपला व्यवसाय विकसित करण्याचा आत्मविश्वास मिळाला. सूर्य वर्षणची मदुराई येथील महाविद्यालयात बदली झाली. त्याने यूट्यूबवर डिजिटल मार्केटिंगचा अभ्यास केला. एका व्यक्तीकडून ४०० रुपये आकारून या विषयाचे ऑनलाइन क्लासेस घेतले. या काळात त्याने संशोधन आणि विकासाद्वारे अधिक उत्पादने विकसित करणे सुरूच ठेवले. हेही वाचा: Success Story : शिक्षणासाठी घेतलं कर्ज, १० किमी केला पायी प्रवास अन् UPSC परीक्षेत पटकावला ९२ वा क्रमांक या क्लासेसद्वारे सूर्य वर्षणने सुमारे २.२० लाख रुपये कमावले. त्याने हे पैसे फक्त 'नेकेड नेचर'मध्ये गुंतवले. सूर्य वर्षणचे 'नेकेड नेचर' आज विविध प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती करते. त्यामध्ये आंघोळीची उत्पादने, त्वचा व केसांची काळजी, ओठ व डोळ्यांची काळजी, दातांची काळजी, बाळाची काळजी इत्यादी श्रेण्यांतील विविध उत्पादनांचा समावेश आहे. सध्या सूर्य वर्षणच्या Naked Nature कडे ७० उत्पादने उपलब्ध आहेत. या ब्रॅण्डने २०२१-२२ या आर्थिक वर्षातच ५६ लाख रुपयांची उलाढाल सुरू केली. आज त्याचे मूल्य १० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ही उत्पादने ऑनलाइन, तसेच तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्रात उपलब्ध आहेत.