Success Story: रमेश बाबू यांना त्यांच्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. रमेश बाबू यांचे वडील न्हावी होते. रमेश बाबू अवघ्या सात वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक परिस्थितीचाही सामना करावा लागला. त्यावेळी त्यांच्या कुटुंबासाठी दिवसातून दोन वेळा जेवण मिळणेही कठीण झाले होते. परंतु, या सर्व आव्हानांना न जुमानता रमेश यांनी त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत सलूनचा व्यवसाय सुरू केला.

रमेश बाबू यांचे खडतर आयुष्य

रमेश बाबू यांचे सुरुवातीचे आयुष्य आव्हानात्मक होते. वडील वारल्यानंतर त्यांच्या आईला कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोलकरीण म्हणून काम करावे लागले. रमेश यांनी कुटुंबाला मदत करण्यासाठी विविध नोकऱ्या केल्या. १९९० मध्ये दहावी पूर्ण झाल्यावर रमेश यांनी वडिलांचे सलून चालवायला घेतले. परिश्रम आणि कष्टाच्या जोरावर त्या साध्या सलूनचे रूपांतर त्यांनी आधुनिक आणि स्टायलिश हेअर सलूनमध्ये केले.

हळूहळू त्यांना या व्यवसायातून चांगले पैसे मिळू लागले. १९९४ मध्ये एका महत्त्वाच्या वाटचालीसह त्यांनी अनेक मार्गांनी आपला व्यवसाय वाढवला. सलून व्यवसायातून बचत केल्यानंतर रमेश यांनी मारुती ओम्नी व्हॅन खरेदी केली आणि ती कार भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला.

रमेश टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सची स्थापना

पुढे रमेश बाबू यांनी टूर्स अॅण्ड ट्रॅव्हलची स्थापना केली. त्यांच्या वाढत्या वाहनांचा ताफा भारतभर भाड्याने देण्यासाठी वापरला. त्यांनी मर्सिडीज ई-क्लास सेडान विकत घेतली. भाड्याने आलिशान कार देणारी शहरातील पहिली व्यक्ती ठरण्याचा मान त्यांनी मिळवला. कालांतराने त्यांच्याकडे बीएमडब्ल्यू, रोल्स रॉयस घोस्ट, जग्वार, मर्सिडीज मेबॅक व ४०० हून अधिक लक्झरी कार यांसारख्या उच्च श्रेणीतील वाहनांचा समावेश झाला. आज ते भारतातील सर्वांत श्रीमंत केशकर्तनकारांपैकी एक आहेत आणि करोडो रुपये कमावतात.

हेही वाचा: Success Story: शाब्बास पठ्ठ्या..! ज्यूस विक्रेत्याच्या मुलाने तिसऱ्या प्रयत्नात NEET ची परिक्षा केली उत्तीर्ण

आमिर खान, अमिताभ बच्चन यांनाही रमेश टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सच्या कार सेवेचा लाभ

२०१७ मध्ये रमेश बाबूंनी २.७ कोटी रुपयांची ‘Maybach S600’ खरेदी केली तेव्हा ते चर्चेत आले. रमेश बाबूंच्या म्हणण्यानुसार, ज्या सेलिब्रिटींनी त्यांची कार सेवा वापरली आहे, त्यात अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन व आमिर खान यांसारखे प्रसिद्ध अभिनेते आणि सचिन तेंडुलकरसारख्या क्रीडापटूचा समावेश आहे.