Success Story: आपण आजपर्यंत सेंद्रिय भाज्या आणि फळांबद्दल ऐकले असेल. त्याचप्रमाणे कोंबडीची अंडीदेखील सेंद्रीय असतात. आता तुम्ही म्हणाल की, हे कसे शक्य आहे? मंजुनाथ मारप्पन आणि अशोक कन्नन यांनी हे शक्य करून दाखवले आहे. मेहनतीच्या जोरावर त्यांनी हा व्यवसाय उभा केला. आता ते कोंबडीची सेंद्रिय अंडी विकून वर्षाला करोडो रुपये कमवत आहेत.
बेंगळुरू येथील मंजुनाथ मारप्पन आणि अशोक कन्नन यांनी पारंपरिक कुक्कुटपालनाऐवजी नव्या पद्धतीने या व्यवसायाचा विचार केला. त्यांनी २०२४ मध्ये बेंगळुरूमध्ये हॅप्पी हेन्स या नावाने फार्म उभारले. हे भारतातील पहिले फ्री-रेंज फार्म होते. या ठिकाणी कोंबड्या पिंजऱ्यात न ठेवता, उघड्यावर फिरतात. आज त्यांच्या फार्ममधील कोंबड्या दररोज सुमारे २० हजार अंडी घालतात. तसेच प्रत्येक अंड्याची किंमत २५ रुपये आहे. या पौष्टिक सेंद्रिय अंड्यांमध्ये ओमेगा ३, प्रथिने व जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.
तसेच मंजुनाथ त्यांच्या व्यवसायासाठी लहान पोल्ट्री फार्मबरोबर भागीदारी करतात. यादरम्यान ते कोंबडीला कोणतेही प्रतिजैविक न देता, सेंद्रिय अंडी कशी तयार करावीत याचे प्रशिक्षण देतात. मंजुनाथ त्यांच्या फार्ममध्ये कोंबडीची प्रतिकारशक्ती वाढविणारे खाद्यही तयार करतात. ज्या शेतकऱ्यांबरोबर ते अंड्यांसाठी भागीदारी करतात, त्यांना ते हे खाद्य देतात आणि त्या शेतकऱ्यांकडून त्या कोंबड्यांची अंडी विकत घेतात.
वर्षाला करतात करोडोंची कमाई
या व्यवसायातून त्यांना वर्षाला सुमारे आठ कोटी रुपये मिळतात. अर्धा डझन पॅकसाठी सामान्य अंड्याची किंमत ६० ते ७० रुपये आहे; तर हॅपी कोंबडीच्या अंड्यांच्या अर्धा डझनच्या पॅकसाठी १५० रुपये आहेत. ग्राहकाने मेंबरशिप घेतल्यास त्याला ४० टक्के सूट दिली जाते.