Success Story: आयुष्यात अडचणी येतच असतात; पण त्या अडचणींचा धैर्याने सामना केल्यास सर्वांत मोठे यशही सहज मिळविता येते. जगात अनेक लोक उज्ज्वल भविष्यासाठी कठोर परिश्रम करतात, ते कधीही मागे हटत नाहीत. अशा अनेक दिग्गजांचा प्रेरणादायी प्रवास भारतीयांना ठाऊक आहे. या दिग्गज व्यावसायिकांमध्ये जुपल्ली रामेश्वर राव यांच्या नावाचाही समावेश आहे. एकेकाळी ते अत्यंत गरिबीत जगत होते; पण त्यांनी कधीच हार मानली नाही. त्यांनी मेहनत करून पैसे कमावले आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आज ते एक प्रसिद्ध उद्योगपती व करोडोंचे मालक आहेत.

सध्या करोडपती असलेले रामेश्वर राव हे आंध्र प्रदेशातील शेतकरी कुटुंबात जन्माला आले. रामेश्वर यांचा जन्म १६ सप्टेंबर १९५५ साली झाला होता. त्यांचे वडील गरीब शेतकरी होते. त्यामुळे रामेश्वर यांच्या आयुष्यातील सुरुवातीचा काळ अनेकांप्रमाणेच आव्हानांनी भरलेला होता. त्यांना शाळेत जाण्यासाठी काही किलोमीटर चालत जावे लागायचे. त्यावेळी त्यांच्या वडिलांकडे सायकल विकत घेण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. परंतु, या सर्व गोष्टींमुळे खचून न जाता, ते १९७४ साली पुढील शिक्षणासाठी हैदराबादला आले आणि त्यांनी होमिओपॅथीचा अभ्यास सुरू केला. होमिओपॅथीची पदवी मिळाल्यावर त्यांनी हैदराबादमध्येच स्वतःचा दवाखाना सुरू केला.

हेही वाचा: Success Story: जिद्दीला सलाम! ऑटोरिक्षा चालवण्यापासून ते ८०० कोटींची कंपनी उभारण्यापर्यंत… लोकप्रिय ब्रँडच्या व्यावसायिकाचा प्रेरणादायी प्रवास

मात्र, त्यावेळी हैदराबादमध्ये रिअल इस्टेटच्या व्यवसायालादेखील चांगला स्कोप होता. रामेश्वर यांना या क्षेत्रातील ज्ञान नव्हते. तरीही त्यांनी धोका पत्करून १९८० मध्ये ५० हजार रुपयांना प्लॉट खरेदी केला. या प्लॉटमध्ये फ्लॅट बांधून त्यांनी ते विकले. या प्लॉटमधून त्यांना तीन पट पैसे परत मिळाले. हा व्यवसाय चांगला चालेल या विचाराने रामेश्वर यांनी क्लिनिक बंद केले आणि रिअल इस्टेटचे काम पूर्णवेळ करण्यास सुरुवात केली. १९८१ मध्ये त्यांनी ‘माय होम कन्स्ट्रक्शन’ नावाची एक रिअल इस्टेट कंपनी सुरू केली. त्याअंतर्गत त्यांनी अनेक सोसायट्या आणि इमारती बांधल्या.

दुसऱ्या व्यवसायालाही सुरुवात

रिअल इस्टेट क्षेत्रात यश मिळविल्यानंतर रामेश्वर यांनी २० एप्रिल १९८७ रोजी महा सिमेंट ही कंपनी सुरू केली. महा सिमेंट कंपनी हा रामेश्वर यांच्या आयुष्यातील दुसरा टर्निंग पॉइंट ठरला. महा सिमेंट हा दक्षिण भारतातील अग्रगण्य सिमेंट ब्रॅण्ड आहे. सध्या रामेश्वर राव यांची एकूण संपत्ती ११,४०० कोटी रुपये आहे.