Success Story: आयुष्यात इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आणि संपूर्ण परिस्थिती बदलून जाईल, असं करण्याची इच्छा असणारे अनेक लोक आहेत. अनेक जण या गोष्टी मिळवण्यासाठी काहीतरी शॉर्टकट शोधतात; तर काही जण या गोष्टी मिळविण्यासाठी खूप मेहनत घेतात. आज आम्ही अशाच एका मेहनती, यशस्वी व्यक्तीचा प्रवास तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत.

छत्तीसगढमधील मुंगेली जिल्ह्यात राहणाऱ्या एका मेंढपाळाने प्रबळ इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम घेऊन आपले स्वप्न साकार केले आहे. मुंगेली जिल्ह्यातील पथरिया विकासखंडमधील बदरा गावातील रहिवासी विश्वनाथ यादव एकेकाळी एक सामान्य मेंढपाळ होता; पण काळानुसार त्याने आपला व्यवसाय आणि तंत्रज्ञान बदलले, ज्यामुळे आज तो दरमहा लाखो रुपये कमवत आहे.

यशस्वी दुग्ध उद्योजक म्हणून ओळख

विश्वनाथ यादव यांची गणना आज जिल्ह्यातील एक यशस्वी दुग्ध उद्योजक म्हणून केली जाते. त्यांच्या मते, २०१६-१७ मध्ये त्यांच्याकडे फक्त १.५ एकर जमीन होती, ज्यामध्ये त्यांचे वडिलोपार्जित घर होते. पारंपरिक पद्धतीने १-२ देशी गाई पाळून आणि ३-४ लिटर दूध विकून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांना पशुवैद्यकीय सेवा विभागाच्या उपसंचालकांमार्फत कर्ज मिळण्यासंबंधीची माहिती मिळाली. त्यानुसार मग विश्वनाथ यादव यांनी बँकेकडून १२ लाख रुपयांचे कर्ज घेतले. कर्ज घेतल्यानंतर त्याने डेअरी उघडली आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

त्यांनी दुग्धशाळेत गाईंसह म्हशींचाही समावेश केला आणि हळूहळू दूध उत्पादन वाढवले. आज त्यांच्याकडे २६ गाई आणि ५० म्हशी आहेत, ज्या दररोज १५० लिटर दूध देतात. म्हशीचे दूध बाजारात ६० रुपये प्रति लिटर दराने विकले जाते.

यादव यांनी बँकेकडून घेतलेले सर्व कर्ज फेडून दुग्धशाळेतून मिळणाऱ्या उत्पन्नातून ४.५ एकर जमीन खरेदी केली. त्यावर त्यांनी दुग्धशाळेसाठी छप्पर आणि सिमेंट-काँक्रीटचे घर बांधले. शेतीसाठी ट्रॅक्टर खरेदी केला आणि दूध वाहतुकीसाठी मोटरसायकलही खरेदी केली.

अनेकांसाठी प्रेरणादायी

विश्वनाथ यादव एक समृद्ध शेतकरी आणि एक प्रसिद्ध दुग्ध उद्योजक बनले आहेत. त्यांच्या यशाने प्रेरित होऊन, इतर अनेक तरुणही दुग्ध व्यवसायाकडे आकर्षित होत आहेत.