आजच्या धावपळीच्या युगात प्रगती आणि निसर्ग यांचा समतोल राखणे हे जगासमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. केवळ कायदे बनवून किंवा तंत्रज्ञान विकसित करून हे शक्य नाही, तर अशा तज्ज्ञांची गरज आहे जे सरकारी धोरणे, कंपनीचे नियम आणि पर्यावरणाचे रक्षण यांचा मेळ घालू शकतील. यालाच ‘शाश्वत विकास धोरण विश्लेषक’ किंवा ‘सस्टेनेबिलिटी पॉलिसी ॲनॅलिस्ट’ असे म्हणतात. हे क्षेत्र सध्याच्या काळातील अत्यंत प्रतिष्ठित आणि प्रभावी करिअर म्हणून उदयाला येत आहे.
शाश्वत विकास धोरण विश्लेषक हा व्यावसायिक प्रामुख्याने सरकार, खासगी कंपन्या किंवा आंतरराष्ट्रीय संस्थांसाठी काम करतो. त्यांचे मुख्य काम म्हणजे पर्यावरणावर परिणाम करणार्या धोरणांचे विश्लेषण करणे आणि भविष्यातील धोके ओळखून सुधारणा सुचवणे.
विश्लेषकाचे काम
माहितीचे संकलन : कार्बन उत्सर्जन, ऊर्जेचा वापर आणि कचरा व्यवस्थापन यावर डेटा गोळा करणे.
धोरण निर्मिती : सौर ऊर्जा, इले्ट्रिरक वाहने किंवा प्लास्टिक बंदी यांसारख्या विषयांवर सरकारी धोरणे कशी असावीत, याचा मसुदा तयार करणे.
परिणाम मोजणे : एखादा नवीन प्रकल्प (उदा. हायवे किंवा धरण) उभारताना त्याचा पर्यावरणावर आणि स्थानिक समाजावर काय परिणाम होईल, याचे ऑडिट करणे.
आवश्यक कौशल्ये
या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची गरज असते,
संशोधन आणि डेटा विश्लेषण : मोठ्या प्रमाणावरील माहितीचे विश्लेषण करून त्यातून निष्कर्ष काढण्याची क्षमता.
लेखन कौशल्य : तांत्रिक माहिती साध्या आणि प्रभावी भाषेत ‘पॉलिसी रिपोर्ट’च्या स्वरूपात मांडता येणे.
क्रिटिकल थिंकिंग : एखाद्या निर्णयाचे दीर्घकालीन परिणाम काय होतील, याचा विचार करण्याची दृष्टी.
नेटवर्किंग : सरकारी अधिकारी, शास्त्रज्ञ आणि सामान्य नागरिक यांच्याशी संवाद साधण्याचे कौशल्य.
वास्तवातील उदाहरणे
धोरण विश्लेषकांनी केलेल्या कामाचे उत्तम उदाहरण म्हणजे भारताचे ‘नॅशनल सोलर मिशन’. तज्ज्ञांनी अभ्यास केला की भारताकडे सूर्यप्रकाश मुबलक आहे, पण धोरणाअभावी सौर ऊर्जेचा वापर कमी होतोय. त्यांच्या शिफारसींनुसार सरकारने सवलती जाहीर केल्या आणि आज भारत सौर ऊर्जेत जगात आघाडीवर आहे. तसेच, शहरातील ‘इले्ट्रिरक बस’ प्रकल्प किंवा ‘सिंगल यूज प्लास्टिक बंदी’ मागे या विश्लेषकांचा मोठा वाटा असतो.
करिअरच्या संधी
शाश्वत विकास हे क्षेत्र आता केवळ एनजीओपुरते मर्यादित राहिलेले नाही.
कॉर्पोरेट सेक्टर : टाटा, रिलायन्स यांसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये ‘सस्टेनेबिलिटी ऑफिसर’ म्हणून जागा असतात.
थिंक टँक्स : नीती आयोग किंवा ‘टेरी’ सारख्या संस्थांमध्ये धोरण ठरवण्यासाठी तज्ज्ञांची गरज असते.
आंतरराष्ट्रीय संस्था : संयुक्त राष्ट्र, जागतिक बँक किंवा जागतिक आरोग्य संघटना मध्ये जागतिक स्तरावर काम करण्याची संधी मिळते.
सल्लागार : पीडब्ल्यूसी (PwC) किंवा डेलॉइटसारख्या कंपन्यांमध्ये सल्लागार म्हणून काम करता येते.
शिक्षणाची वाटचाल
पदवी : पर्यावरण विज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र किंवा पब्लिक पॉलिसीमध्ये पदवी.
पदव्युत्तर शिक्षण : मास्टर्स इन पब्लिक पॉलिसी (टढढ) किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये एम.ए. /एम.एस्सी. करणे फायदेशीर ठरते.
अभ्यासक्रम : आयआयटी किंवा टाटा इ्स्टिटट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये या संदर्भातील उत्तम कोर्सेस उपलब्ध आहेत.
या क्षेत्रातील फायदे
जबरदस्त मागणी : हवामान बदलामुळे जगभरातील सरकारे आता पर्यावरणाला प्राधान्य देत आहेत, त्यामुळे या नोकर्या कधीही कमी होणार नाहीत.
आर्थिक प्रगती : अनुभवी धोरण विश्लेषकांना कॉर्पोरेट क्षेत्रात अतिशय आकर्षक पगार मिळतो.
सामाजिक समाधान : तुमचे एक धोरण लाखो लोकांचे जीवन सुधारू शकते आणि पृथ्वीला विनाशापासून वाचवू शकते, हे समाधान मोठे असते.
‘सस्टेनेबिलिटी पॉलिसी ॲनॅलिस्ट’ हे केवळ एक करिअर नसून ती काळाची गरज आहे. जर तुम्हाला समाज आणि निसर्ग यांच्यात सकारात्मक बदल घडवून आणायचा असेल, तर या क्षेत्राची निवड करणे हा एक दूरदृष्टीचा निर्णय ठरेल.
medhat235@gmail.com
(लेखिका शाश्वत विकास उद्योजक आहेत.)
