सुवर्णरेहा जाधव
आपण वापरत असलेल्या कपड्यांपासून घरातील फर्निशिंगपर्यंत असंख्य वस्तूंमागे टेक्स्टाइल डिझायनरचे योगदान असते. टेक्स्टाइल डिझाइन हेही सर्जनशीलता, तंत्रज्ञान आणि उद्योग यांचा सुंदर संगम असलेले क्षेत्र ठरते.
टेक्स्टाइल डिझाइन हा केवळ एक अभ्यासक्रम किंवा व्यवसाय नाही; तो धागे, रंग, पोत, परंपरा आणि सततच्या प्रयोगांचा एक अखंड प्रवास आहे. आजही एखादे नवीन कापड हातात घेतले, एखादा अनोखा पोत अनुभवला किंवा एखादी नवी रंगछटा दिसली की मनात कुतूहल जागे होते.
आपण वापरत असलेल्या कपड्यांपासून घरातील फर्निशिंगपर्यंत असंख्य वस्तूंमागे टेक्स्टाइल डिझायनरचे योगदान असते. टेक्स्टाइल डिझाइन म्हणजे तंतूपासून तयार वस्त्रापर्यंतचा प्रवास समजून घेऊन त्याला उपयोगिता, सौंदर्य आणि वेगळेपण देण्याची प्रक्रिया.
याचे दोन प्रमुख भाग मानले जातात – फॅब्रिक कन्स्ट्रक्शन आणि सरफेस ऑर्नामेंटेशन. विणकाम, निटिंग आणि विविध तंतूंच्या साहाय्याने कापडाची निर्मिती केली जाते, तर डाईंग, प्रिंटिंग, भरतकाम आणि इतर अलंकरण तंत्रांद्वारे त्या कापडाला स्वतंत्र ओळख दिली जाते.
भारतीय टेक्स्टाइल परंपरेत अलंकरणाला विशेष स्थान आहे. फुलकारी, चिकनकारी, मिरर वर्क, गोटा पट्टी, कांथा, कसूती आणि कशिदा यांसारख्या शैली केवळ भरतकामाचे प्रकार नसून त्या त्या प्रदेशाच्या संस्कृतीचे प्रतिबिंब आहेत. आजही या परंपरा आधुनिक फॅशन आणि टेक्स्टाइल डिझाइनला प्रेरणा देत आहेत.
माझ्या व्यावसायिक प्रवासात अनेक अनुभवांनी मला घडवले. मुंबईतील ‘श्याम आहुजा कार्पेट्स अँड धरीज’ येथे पहिली नोकरी करताना युरोपियन बाजारपेठेसाठी तयार होणार्या उत्पादनांमधून रंगांकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाली. पुढे कलरिस्ट म्हणून जे काही काम करता आले आहे , त्याची बीजे याच काळात रोवली गेली. त्यानंतर दुसर्या एका डिझाईन स्टुडिओमध्ये एका पाश्चात्त्य वधूच्या वेडिंग गाऊनसाठी जवळपास २१ फूट, म्हणजे सुमारे ७ मीटर लांबीच्या डिझाईनचे ट्रेसिंग तयार करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. आजच्या डिजिटल युगात हे साधे वाटेल, पण एकेका रेषेत जीव ओतून काम करावे लागत होते, अचूकता आणि चिकाटीची परीक्षाच जणू. दिलेल्या वेळेत ते पूर्ण केल्याचे समाधान आजही आठवते. त्यानंतर भारतातील आणि अमेरिका, फ्रान्स, फिजी, ऑस्ट्रेलिया येथील काही नामवंत डिझायनरसाठी कपडा बनवण्याची संधी मला मिळाली, तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठ चांगल्या प्रकारे समजता आली.
डायिंग अँड प्रिंटिंग या विषयातील विशेष अभ्यासक्रमामुळे माझा कल नैसर्गिक रंगांकडे वळला. वनस्पती, फुले, साली आणि इतर सेंद्रिय स्रोतांपासून रंग विकसित करण्याचे प्रयोग करता आले. नैसर्गिक रंग उत्पादन युनिट्स उभारण्यासाठी मार्गदर्शन करता आले. अलीकडेच आम्ही नैसर्गिक रंगांचा वापर करून मशीन डायिंग यशस्वीरीत्या करून पाहिले. त्यामुळे मोठ्या लांबीच्या कापडाला नैसर्गिक रंग देणे शक्य झाले असून हा प्रयोग व्यावसायिकदृष्ट्याही महत्त्वाचा ठरू शकतो. उद्योगाच्या गरजा आणि पर्यावरणीय जबाबदारी यांच्यातील दरी कमी करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयोग करत आहोत.
नैसर्गिक रंगांचे महत्त्व आज विशेष अधोरेखित करावे लागते. वनस्पतीजन्य सेंद्रिय कचर्याचा पुनर्वापर करून रंगनिर्मिती करता येते आणि कृत्रिम रंगांमुळे निर्माण होणारे विषारी सांडपाणी मोठ्या प्रमाणात टाळता येते. पर्यावरणपूरक आणि शाश्वत वस्त्रोद्योगाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
आज भारतातील ठकाळ, ठकऊ, सोफिया पॉलिटेक्निक, पर्ल अकॅडमी, ककअऊ आणि सृष्टी मणिपाल यांसारख्या संस्थांमध्ये टेक्स्टाइल डिझाइनचे शिक्षण उपलब्ध आहे. या क्षेत्रात प्रवेशासाठी चित्रकलेची आवड आणि मूलभूत रेखाटन कौशल्ये महत्त्वाची असली, तरी तेवढ्यावरच भागत नाही. रंग, पोत आणि आकार यांविषयीची संवेदनशीलता, सौंदर्यदृष्टी आणि बारकाईने निरीक्षण करण्याची सवय तितकीच आवश्यक असते. रंगकाम आणि प्रिंटिंग यांचा अभ्यास करताना रसायनशास्त्राची प्राथमिक समज उपयोगी ठरते, तर आजच्या काळात संगणकाधारित डिझाइन ,संवाद कौशल्ये, समस्या सोडवण्याची क्षमता आणि बाजारपेठेचे भान या गुणांमुळे विद्यार्थ्यांना या क्षेत्रात अधिक संधी उपलब्ध होतात.
टेक्स्टाइल डिझाइनमध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. टेक्स्टाईल किंवा प्रटिं डिझायनर, सरफेस ऑर्नामेंटेशन स्पेशालिस्ट आणि होम फर्निशिंग डिझायनर म्हणून कापड, प्रट्सिं, भरतकाम आणि गृहसजावटीसाठी डिझाईन्स विकसित करता येतात. फॅशन आणि स्टायलिंग क्षेत्रात फॅशन स्टायलिस्ट, ट्रेंड फोरकास्टर आणि व्हिज्युअल मर्चंडायझर म्हणून काम करता येते. तसेच तांत्रिक आणि कॉर्पोरेट क्षेत्रात फॅब्रिक डेव्हलपर, रिटेल बायर किंवा टेक्स्टाईल प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून संशोधन, उत्पादन व्यवस्थापन आणि बाजारपेठेशी संबंधित भूमिका पार पाडता येतात.
या विविध संधींमुळे टेक्स्टाइल डिझाइन हेही सर्जनशीलता, तंत्रज्ञान आणि उद्योग यांचा सुंदर संगम असलेले क्षेत्र ठरते.
माझ्यासाठी मात्र टेक्स्टाइल डिझाइन ही केवळ करिअरची वाट नाही, तर सतत शिकत राहण्याची प्रक्रिया आहे. प्रत्येक धागा, प्रत्येक रंग आणि प्रत्येक कापड काहीतरी नवीन शिकवून जात असते. अनेक दशकांनंतरही या क्षेत्राबद्दलचे कुतूहल आणि प्रेम तितकेच जिवंत आहे. तंतूपासून वस्त्रापर्यंतचा हा प्रवास अजूनही सुरूच आहे.
suvarnareha@gmail.com
(लेखिका दृश्य कलाकार /रंगतज्ज्ञ आहेत.)
