साहेबराव धनवटे
उद्योगात तयार होणार्या प्रत्येक वस्तूमागे अचूकता, कौशल्य आणि तंत्रज्ञान यांचा संगम असतो. मोटार, फ्रिज, वॉशिंग मशीन, भ्रमणध्वनी या प्रत्येक उत्पादनाच्या निर्मितीमागे अत्यंत अचूक साचे आणि साधने कार्यरत असतात. या साधनांची निर्मिती करणारा कुशल तंत्रज्ञ म्हणजे टूल अँड डायमेकर.
देशात उत्पादन क्षेत्राचा झपाट्याने विस्तार होत असताना कुशल टूल अँड डायमेकर्सची गरजही वाढत आहे. वाहननिर्मिती, विद्युत व इलेक्ट्रॉनिक उपकरणे, संरक्षण, रेल्वे, वैद्यकीय उपकरणे, प्लास्टिक, पत्राधातू (शीट मेटल) प्रक्रिया, तसेच घरगुती उपकरणांच्या निर्मितीमध्ये या कौशल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उद्योगातील प्रत्येक उत्पादन एकसारख्या आकाराचे, अचूक मापाचे आणि उच्च दर्जाचे असावे, यासाठी विशेष प्रकारचे साचे (डाय), दाबसाधने (प्रेस टूल्स), धरक साधने (जिग्ज) आणि आधार साधने (फिक्स्चर्स) तयार केली जातात. त्यांची रचना (डिझाइन), निर्मिती, जुळणी (असेंब्ली), चाचणी, देखभाल (मेंटेनन्स) आणि दुरुस्ती हे टूल अँड डायमेकरचे प्रमुख कार्य असते.
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी हा दोन वर्षांचा कौशल्याधारित अभ्यासक्रम उपलब्ध आहे. गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम विशेष उपयुक्त ठरतो. प्रशिक्षणामध्ये सुरुवातीला मोजमापशास्त्र (मेट्रोलॉजी), अभियांत्रिकी रेखाचित्र (इंजिनिअरिंग ड्रॉइंग), बेंचवर्क, धातूकाम, घासकाम (ग्राइंडिंग), छिद्र पाडणे (ड्रिलिंग), टर्निंग, मिलिंग, उष्णताप्रक्रिया (हीट ट्रीटमेंट) आणि विविध मापन साधनांचा वापर शिकविला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अचूकतेची सवय आणि गुणवत्तेची जाणीव निर्माण होते.
दुसर्या वर्षात प्रशिक्षण अधिक प्रगत स्वरूपाचे असते. विविध प्रकारच प्रेस टूल्स, पत्रा कापणी साचे, छिद्र पाडणी साचे (पिअर्सिंग डाय), संयुक्त साचे, क्रमिक साचे (प्रोग्रेसिव्ह डाय), धरक साधने (जिग्ज), आधार साधने (फिक्स्चर्स), संगणक नियंत्रित खराद यंत्र (सीएनसी लेथ), संगणक नियंत्रित यंत्रसंच, विद्युत ठिणगी प्रक्रिया, तार कापणी प्रक्रिया, द्रवदाब, वायुदाब तसेच संगणकीय रचना व उत्पादन (सीएडी/सीएएम) यांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे आधुनिक उत्पादन उद्योगाच्या गरजांनुसार काम करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित होते.
या प्रशिक्षणामुळे अचूक मोजमाप, अभियांत्रिकी रेखाचित्र समजून घेणे, गुणवत्ता नियंत्रण, उत्पादन नियोजन, यंत्रसाधनांची देखभाल (मेंटनंन्स), समस्या निराकरण आणि सुरक्षित कार्यपद्धती यांसारखी कौशल्ये विकसित होतात. त्यामुळे ते उद्योगाच्या उत्पादन प्रक्रियेतील महत्त्वाचे तांत्रिक मनुष्यबळ म्हणून तयार होतात.
वाहन उद्योग, रेल्वे, संरक्षण, वैद्यकीय उपकरणे, प्लास्टिक, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि इतर उत्पादन क्षेत्रांमध्ये टूल अँड डाय मेकर, प्रेस टूल मेकर, टूल रूम तंत्रज्ञ, सीएनसी ऑपरेटर, सीएनसी प्रोग्रामर, गुणवत्ता निरीक्षक (क्वालिटी इन्स्पेक्टर) अशा विविध पदांवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. याशिवाय काही वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर स्वयंरोजगाराचाही मार्ग खुला होतो.
(लेखक औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोखाडा येथे शिल्प निदेशक आहेत.)
