२०२६ च्या यूपीएससी मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषय ‘मानसशास्त्र’ या पेपरचे विश्लेषण आपण या लेखात बघणार आहोत.

मानसशास्त्र वैकल्पिक पेपर १ संकल्पनात्मक स्पष्टता, सैद्धांतिक समज, संशोधन पद्धती आणि मानसशास्त्रीय तत्त्वांचा व्यावहारिक उपयोग यांचे मूल्यमापन करण्याचा एक संतुलित दृष्टिकोन दर्शवतो. मानसशास्त्र वैकल्पिक पेपर २ भारतीय समाज, मानसिक आरोग्य, शिक्षण, संस्था आणि समकालीन सामाजिक आव्हानांमध्ये मानसशास्त्रीय सिद्धांतांच्या उपयोजनावर भर देतो. या दोन्ही पेपरचे विश्लेषण बघूयात

मानसशास्त्र वैकल्पिक पेपर १ चे विश्लेषण

विभाग अ: मूलभूत तत्त्वे आणि संशोधन पद्धती

विभाग अ मध्ये आकलनशक्ती, स्मृती, अध्ययन, बोधात्मक विकास, संशोधन पद्धती, ग्राउंडेड थेअरी आणि प्रतिगमन विश्लेषण यावरील प्रश्नांचा समावेश आहे. टॉप-डाऊन आणि बॉटम-अप प्रोसेसिंग, सॅम्पलिंग बायस, अभिजात अभिसंधान आणि पियाजेच्या अवस्थांवरील प्रश्न हे संकल्पनात्मक समज आणि सिद्धांतांची दैनंदिन उदाहरणांशी सांगड घालण्याच्या क्षमतेची चाचणी घेतात.

विभाग ब : बोधन, व्यक्तिमत्त्व आणि वर्तन

विभाग ब हा निगमन तर्क, भावना आणि बोधन, पूर्वग्रह, संरक्षण यंत्रणा, ह्युरिस्टिक्स, बुद्धिमत्ता, प्रेरणा, भाषा, मनोव्यापारांवर परिणाम करणारी औषधे आणि व्यक्तिमत्त्व मूल्यमापन यावरील प्रश्नांवर लक्ष केंद्रित करतो. अभिवृत्ती आणि मूल्ये, बुद्धिमत्ता आणि वृद्धत्व तसेच प्रक्षेपण तंत्रे विरुद्ध मानसोपचार चाचण्या यांवरील प्रश्नांसाठी तुलनात्मक विश्लेषण आणि सैद्धांतिक एकत्रीकरणाची आवश्यकता आहे.

ट्रेंड्स

’     संकल्पनात्मक स्पष्टता : प्रश्नांमध्ये परस्परसंबंधित संकल्पनांमधील अचूक फरक स्पष्ट करणे आवश्यक आहे.

’     उपयोजन-केंद्रित दृष्टिकोन: अनेक प्रश्नांमध्ये स्पष्टपणे समर्पक उदाहरणांची मागणी करण्यात आली आहे.

’     संशोधनाभिमुखता: सॅम्पलिंग बायस, ग्राउंडेड थेअरी आणि प्रतिगमन विश्लेषण यांद्वारे संशोधन पद्धतींच्या कौशल्याची चाचणी घेण्याची आयोगाची वृत्ती दिसून आली.

’     आंतरविद्याशाखीय समज: जैविक, बोधात्मक, सामाजिक आणि विकासात्मक दृष्टिकोनांना पुरेसे महत्त्व या पेपरमध्ये दिले गेले आहे.

’     संतुलित व्याप्ती: दोन्ही विभाग पेपर १ च्या अभ्यासक्रमाचा विस्तृत भाग व्यापतात.

आयोगाद्वारे विचारलेले प्रश्न

नमुना निवडीतील पूर्वग्रह संशोधनाच्या निष्कर्षांच्या अचूकतेवर कशा प्रकारे परिणाम करू शकतात? अर्थपूर्ण संशोधन निष्कर्ष मिळवण्यात डेटाचे विश्लेषण आणि अर्थनिर्वचन यांची भूमिका स्पष्ट करा.

‘संरक्षण यंत्रणा’ म्हणजे काय? निरोगी आणि अस्वास्थ्यकर संरक्षण यंत्रणांमधील फरक स्पष्ट करा. या यंत्रणा एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर कसा प्रभाव पाडतात, ते सांगा.

‘प्रेरणा चक्र’ म्हणजे काय? प्रेरणेच्या मानसशास्त्रीय आणि शारीरिक आधारांच्या संदर्भात याचे विश्लेषण करा.

आपली स्वप्ने म्हणजे अचेतन मनातील इच्छांची पूर्तता असतात का? स्वप्नांचा अर्थ आणि त्यांची कार्ये यावर चर्चा करा.

उमेदवारांनी प्रमाण सिद्धांत, मानसशास्त्रज्ञांचे योगदान, संशोधन पद्धती, प्रायोगिक पुरावे आणि समकालीन उपयोजन यांना प्राधान्य द्यायला हवे. आकृत्या, उदाहरणे, तुलना आणि योग्य मानसशास्त्रीय संज्ञांचा वापर करून संरचित विश्लेषणात्मक उत्तरे लिहिण्याचा सराव करा.

मानसशास्त्र वैकल्पिक पेपर २ चे विश्लेषण

विभाग अ: वैद्यकीय, शैक्षणिक आणि संघटनात्मक मानसशास्त्र विभाग अ मध्ये चिंता विकार, मानसिक आरोग्याचा प्रतिबंध आणि पुनर्वसन, विशेष प्रतिभावान मुले, माजी गुन्हेगारांचे पुनर्वसन, नेतृत्व, मानसशास्त्रीय उपचारपद्धती, वैयक्तिक भिन्नता, मूल्यमापन आणि समुदाय हस्तक्षेप यांवरील प्रश्नांचा समावेश आहे. मानसिक विकारांच्या जैविक, मानसिक आणि सामाजिक निर्धारकांवरील प्रश्नांसाठी बायोसायकोसोशल दृष्टिकोनाची सर्वसमावेशक समज असणे आवश्यक आहे. तसेच, सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील उपचारपद्धती आणि पुनर्वसनावरील प्रश्न संदर्भ-विशिष्ट उपयोजनांचे महत्त्व अधोरेखित करतात.

विभाग ब: सामाजिक आणि उपयोजित मानसशास्त्र

विभाग ब हा सामाजिक संघर्ष, मूलतत्त्ववाद, लैंगिक संवेदनशीलता, महिला उद्योजकता, बालपणातील वंचितता, सामाजिक एकात्मता, पर्यावरणीय ताणतणाव, क्रीडा मानसशास्त्र, संपादन प्रेरणा, असुरक्षित घटक, ग्राहक वर्तन आणि डिजिटल मीडिया यांवरील प्रश्नांचा समावेश या विभागात आहे. उमेदवारांनी ग्लास सीलिंग, गोंगाट व गर्दी, तसेच डिजिटल मीडियाचा प्रभाव यांवरील प्रश्नांसाठी मानसशास्त्रीय संकल्पनांचा समकालीन सामाजिक समस्यांशी संबंध जोडून उत्तरे लिहिणे अपेक्षित आहे.

ट्रेंड्स

’     उपयोजन-केंद्रित प्रश्न: वास्तविक जीवनातील समस्या आणि व्यावहारिक हस्तक्षेप यावर आयोगाद्वारे विशेष भर देण्यात आला.

’     चिकित्सक विश्लेषण: अनेक प्रश्नांमध्ये तर्काधिष्ठित मूल्यमापनाची मागणी करण्यात आली आहे.

’     समकालीन प्रासंगिकता: लैंगिक समानता, तंत्रज्ञान, मानसिक आरोग्य आणि सामाजिक संघर्ष यावर भर देण्यात आला होता.

’     आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन: मानसशास्त्राचा शिक्षण, प्रशासन, अर्थशास्त्र आणि सामाजिक विकासाशी असलेला संबंध समजून घ्या. यासंदर्भात आयोगाद्वारे प्रश्न विचारण्यात आले आहेत.

’     संतुलित अभ्यासक्रम व्याप्ती: दोन्ही विभाग उपयोजित मानसशास्त्राच्या विविध शाखांचा समावेश करतात.

आयोगाद्वारे विचारलेले प्रश्न

पुनर्वसन मानसशास्त्रज्ञाच्या आवश्यक गुणांचे परीक्षण करा आणि अंमली पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण रोखण्यासाठी (प्राथमिक प्रतिबंध) सर्वोत्तम पद्धतींवर चर्चा करा.

जैविक, मानसिक आणि सामाजिक घटक मानसिक विकारांवर कसा प्रभाव पाडतात? मानसिक आरोग्य आणि सुस्थिती या संकल्पनेचे चिकित्सक परीक्षण करा.

महिला उद्योजकतेचे मुख्य

पैलू कोणते आहेत? महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली आहेत?

‘टीम कोहेजन’ (संघ एकोपा/संघ बांधिलकी) च्या वैचारिक प्रारूपाचे स्पष्टीकरण देऊन, खेळाडूंमधील संघ एकोपा घडवून आणणार्‍या आणि तो निर्माण करणार्‍या पूर्वगामी घटकांची यादी द्या.

पेपर २ साठी प्रमाण सिद्धांत, प्रायोगिक पुरावे, भारतीय केस स्टडीज, सरकारी उपक्रम आणि हस्तक्षेपाचे मॉडेल्स यांना प्राधान्य द्या. समर्पक उदाहरणे, मानसशास्त्रीय संज्ञा आणि व्यावहारिक शिफारशींचा वापर उत्तर लिहिताना करा.

मानसशास्त्र वैकल्पिक विषयामध्ये उत्तम गुण मिळवण्यासाठी मजबूत संकल्पनात्मक पाया, समकालीन उदाहरणे आणि विश्लेषणात्मक उत्तरलेखन अत्यंत आवश्यक आहे.