UPSC EPFO Recruitment 2023: केंद्रीय लोकसेवा आयोगाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये (ईपीएफओ) एकूण ५७७ जागांसाठी मेगाभरती करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यातील एनफोर्समेंट ऑफिसर (EO)/ अकाउंट्स ऑफिसर (AO) यांच्या ४१८ जागांसाठी आणि असिस्टंट प्रोविडंट फंड कमिश्नरच्या (APFC) १५९ जागांसाठी नव्या अधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे. या संबंधित घोषणापत्रक लवकरच आयोगाच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर प्रकाशित करण्यात येणार आहे. वेबसाइटसह वृत्तपत्रकांमध्येही भरतीबद्दलच्या जाहिराती दिल्या जाणार आहेत. २५ फेब्रुवारी २०२३ पासून एकूण प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमधील रिक्त पदांकरिता अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया २५ फेब्रुवारी रोजी सुरु होणार आहे. यातील एनफोर्समेंट ऑफिसर / अकाउंट्स ऑफिसर यांच्या ४१८ जागांची विभागणी २०४ जागा खुल्या वर्गासाठी, ५७ जागा एससी, २८ जागा एसटी, ७८ जागा ओबीसी आणि ५१ जागा दिव्यांग अशा प्रकारे करण्यात आली आहे. तर असिस्टंट प्रोविडंट फंड कमिश्नर पदाच्या १५९ जागा या ६८ जागा खुला/ओपन वर्ग, २५ जागा एससी, १२ जागा एसटी, ३८ जागा ओबीसी, १६ जागा दिव्यांग अशा पद्धतीने विभागल्या आहेत. upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात. तेथे याबद्दलची अन्य माहितीदेखील उपलब्ध आहे. डिजिटल मार्केटमध्ये टिकून राहायचे असल्यास शिका ‘या’ गोष्टी; एक्सपर्ट बनून कमवाल बक्कळ पैसे २०२० मध्ये आयोगाद्वारे अशा प्रकारच्या मेगाभरतीचे आयोजन करण्यात आले होते. करोना काळामध्ये या प्रक्रियेला फार उशीर झाला होता.तेव्हा ४२१ पदांसाठी भरती करण्यात आली होती. २०२० च्या भरतीनुसार यंदाच्या निवड प्रक्रियेच्या पात्रतेचा निकष लावला जाऊ शकतो. एकूण रिक्त पदांकरिता अर्ज करायचा असल्यास वयवर्ष ३० असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे कोणत्याही महाविद्यालयाची किंवा विद्यापीठाची कोणत्याही विषयाची पदवी असायली हवी. लिखीत स्वरुपातील परीक्षा आणि मुलाखत अशा दोन टप्प्यांमध्ये ही निवड प्रक्रिया विभागलेली आहे. या दोन्हींमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. उमेदवारांना हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये परीक्षा देण्याची मुभा आहे.