नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेखात आपण यूपीएससी पूर्वपरीक्षा पेपर २ म्हणजेच ‘सीसॅट’ मधील ‘उतारे आकलन’ हा घटक समजून घेणार आहोत. सीसॅट मधील ८० प्रश्नांपैकी जवळपास २५ ते २७ प्रश्न हे उताऱ्यांवर असतात. पात्रतेचे ६६ गुण मिळविण्यासाठी या घटकावर आपली पकड असणे अपेक्षित आहे. यासाठी गेल्या ५ वर्षातील सीसॅटचे उतारे आपण अभ्यासायला हवेत.
आयोगाला सीसॅट मधील उताऱ्यांच्या माध्यमातून उमेदवाराच्या भाषेचे नव्हे तर तर्कशक्तीचे परिक्षण करावयाचे आहे. युपीएससीला परीक्षेच्या माध्यमातून उमेदवाराची युक्तिवाद समजून घेण्याची, अनुमान काढण्याची, सूचित अर्थ ओळखण्याची व लेखकाचा दृष्टिकोन समजण्याची क्षमता तपासायची आहे, जी प्रशासकीय निर्णयक्षमतेशी थेट संबंधित आहे. चला तर मग उतारे सोडविण्याची रणनीती समजून घेवू –
सर्वप्रथम सीसॅट मधील उताऱ्यांचे स्वरूप नीट समजून घ्या – सीसॅट मधील उतारे विश्लेषणात्मक व अमूर्त स्वरूपाचे असतात; ते तथ्याधारित नसतात. विषय सामान्यतः नीतिशास्त्र, प्रशासन, अर्थव्यवस्था, तत्त्वज्ञान, विज्ञान किंवा सामाजिक प्रश्नांवर आधारित असतात. इथे सर्व उत्तरे उताऱ्यातूनच निघतात, बाह्य ज्ञान वा स्वतःच्या धारणा वापरणे इथे चुकीचे ठरते. अतिशयोक्त, भावनिक किंवा मूल्यनिर्णय करणारे पर्याय बहुधा सापळे असतात. उतारा वाचताना तपशील नव्हे तर उताऱ्याचा उद्देश समजून घ्या. वाचताना पुढील गोष्टींवर लक्ष केंद्रित करा:
उताऱ्याची मुख्य संकल्पना
लेखकाचा नेमका हेतू – स्पष्टीकरण देणे, समर्थन करणे वा टीका करणे.
उताऱ्याचा नेमका स्वर – तटस्थ, चिकित्सक, सावध वा आशावादी.
उताऱ्यातील थेट तथ्यांपेक्षा तार्किक निष्कर्ष अधिक विचारले जातात त्यामुळे आपल्याला उताऱ्याची रचना समजून घेणे गरजेचे आहे. उताऱ्याची खालीलप्रमाणे एक मानसिक रूपरेषा तयार करा जेणेकरून यामुळे संपूर्ण उतारा पुन्हा वाचण्याची गरज कमी होते. वेळ वाचतो.
उताऱ्याचा प्रारंभिक परिच्छेद → पार्श्वभूमी समजून घेणे.
उताऱ्याचा मधला भाग → उताऱ्यातील युक्तिवाद, उदाहरणे, कारणमीमांसा समजून घेणे.
उताऱ्याचा शेवट → उताऱ्याचा निष्कर्ष, सूचित अर्थ, उपाय किंवा इशारा समजून घेणे.
प्रथम उताऱ्याचे जलद वाचन करा त्यानंतर प्रश्न वाचा; मग उतारा पुन्हा पहा. त्यामुळे आवश्यक भागावर लक्ष केंद्रित करता येते व वेळ वाचतो. प्रत्येक प्रश्नासाठी उताऱ्यातील संबंधित ओळ किंवा विचार शोधा. पर्याय वगळण्याची कला इथे महत्त्वाची भूमिका बजावते. उत्तर निवडण्याऐवजी चुकीचे पर्याय वगळल्यास उत्तरे शोधणे सोपे होते. यात खालील बाबी लक्षात घ्या –
‘नेहमी’, ‘कधीच नाही’, ‘पूर्णपणे’, ‘केवळ’ असे शब्द बहुतेक वेळा चुकीच्या पर्यायात वापरले जातात.
उताऱ्याबाहेरील नवीन कल्पना पर्यायात असल्यास तो पर्याय वगळा.
फारच व्यापक किंवा फारच संकुचित पर्याय वगळणे संयुक्तीक ठरते कारण यूपीएससी साधारणतः संयमित, संतुलित व मर्यादित विधान पसंत करते.
अनुमान, गृहितक आणि निष्कर्ष यांतील फरक समजून घ्या –
अनुमान : उताऱ्यातून तार्किकरित्या निघणारा अर्थ.
गृहितक : लेखकाने गृहीत धरलेली बाब.
निष्कर्ष : लेखकाची अंतिम भूमिका.
२०२५ च्या सीसॅट पेपरमधील उतारा व त्यावर आधारित प्रश्न बघा –
केवळ जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी परिसंस्था टिकवून ठेवल्यास, तिच्या व्यावसायिक क्षमतेवर तसेच त्या परिसंस्थेवर अवलंबून असलेल्या उपजीविकेवरही परिणाम होईल. परिसंस्थेचा वापर केवळ उपजीविकेसाठी, व्यावसायिक शोषणासाठी किंवा केवळ संरक्षणासाठी करण्यामध्येही संघर्ष आहे. व्यावसायिक शोषणामुळे होणाऱ्या जंगलतोडीमुळे, जंगलांवर अवलंबून असलेल्या उपजीविकेवर प्रतिकूल परिणाम होण्याव्यतिरिक्त पूर, गाळ साचण्याच्या समस्या आणि सूक्ष्म-हवामानातील अस्थिरता यांसारखे अप्रत्यक्ष नुकसान होते. हे संघर्ष विशेषतः विकसनशील देशांमध्ये अधिक तीव्र आहेत, जिथे लोकांचे परिसंस्थेवरील अवलंबित्व लक्षणीय आहे आणि व्यावसायिक शोषणामुळे राष्ट्रीय उत्पन्न वाढवण्याची क्षमता आहे.
१. खालीलपैकी कोणते विधान उताऱ्याच्या लेखकाने दिलेल्या महत्त्वाच्या संदेशाचे सर्वोत्तम प्रतिबिंब दर्शवते?
(अ) जेव्हा काही लोक त्यांच्या उपजीविकेसाठी परिसंस्थेवर अवलंबून असतात, तेव्हा जैवविविधतेचे संरक्षण ही काळजी करण्याची बाब नाही.
(ब) जंगलांचे व्यावसायिक शोषण हे अन्न आणि निवाऱ्यासाठी जंगलांवर अवलंबून असलेल्या लोकांच्या मूलभूत हक्कांच्या विरोधात जाते.
(क) उपजीविकेचे सातत्य आणि परिसंस्थेचा ऱ्हास हे दोन्ही एकत्र आल्यास एकमेकांना अधिक तीव्र करतात, ज्यामुळे संघर्ष आणि असंतुलन निर्माण होते.
(ड) परिसंस्थेचे व्यावसायिक शोषण पूर्णपणे थांबवले पाहिजे.
२. वरील उताऱ्याच्या संदर्भात, खालील गृहितके मांडली गेली आहेत:
I. कोणत्याही देशाला राष्ट्रीय उत्पन्न वाढवण्यासाठी परिसंस्थेवर अवलंबून राहण्याची गरज नाही.
II. परिसंस्थेचा ऱ्हास रोखण्यासाठी संसाधन-समृद्ध देशांनी आपली संसाधने कमी संसाधने असलेल्या देशांसोबत सामायिक केली पाहिजेत.
वरीलपैकी कोणते गृहितक/गृहितके वैध आहे/आहेत?
(अ) केवळ I
(ब) केवळ II
(क) I आणि II दोन्ही
(ड) I किंवा II दोन्हीही नाही
हा उतारा सोडविण्यासाठी आपल्याकडे केवळ ३ मिनिटे आहेत (८० प्रश्नांसाठी १२० मिनिटे). वेळेचे नियोजन उतारा सोडविताना यामुळेच महत्त्वाचे ठरते. दोन पर्यायांमध्ये अडकल्यास उताऱ्याशी अधिक सुसंगत पर्याय निवडा व पुढे जा. अचूकता ही प्रयत्नांपेक्षा महत्त्वाची आहे. उतारा सोडविताना हे लक्षात घ्या की, उत्तर तुमच्या मतात नाही, तर उताऱ्यात आहे. भाषातज्ज्ञासारखा नव्हे, तर प्रशासकासारखा विचार केल्यास सीसॅट मधील उतारे आपण सहज सोडवू शकतो.
sushilbari10@gmail.com
