अर्थशास्त्र किंवा संख्याशास्त्र या विषयांत पदवी/ पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना केंद्र शासनाच्या सेवेत जाण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी एक स्वतंत्र परीक्षा घेते , त्यासंदर्भात ली माहिती:

केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीची एकच परीक्षा बहुतेकदा माहिती असते ती म्हणजे कलेक्टर बनण्यासाठीची परीक्षा जी की बी ए पासून बी ई पर्यंत कोणतीही पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना देता येते, मात्र याच यूपीएससीची एक स्वतंत्र परीक्षा आहे ज्या परीक्षेला फक्त अर्थशास्त्र किंवा संख्याशास्त्र या विषयांत पदवी/ पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोग दरवर्षी इंडियन इकाॅनाॅमिक सर्व्हिस आणि इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस अशा दोन परीक्षा जून महिन्यात घेते. यंदा ही परीक्षा १९ ते २१ जून या दरम्यान घेण्यात येणार आहे. यासाठीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://upsconline.nic.in या संकेतस्थळावर ११ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२६ या दरम्यान भरता येणार आहेत. परीक्षा देशातील २१ शहरात घेण्यात येणार आहे ज्यात महाराष्ट्रातील फक्त मुंबई चा समावेश आहे. मुंबई केंद्रावरील परीक्षार्थींचा कोटा पूर्ण झाला तर विद्यार्थ्यांना अन्य केंद्रावर परीक्षेसाठी जावे लागेल, प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य असल्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत न थांबता लवकरात लवकर अर्ज भरणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांचं राष्ट्रीयत्व भारतीय आहे आणि ज्यांचं वय २१ ते ३० या दरम्यान आहे त्यांनाच अर्ज करता येईल ( एस सी एस टी उमेदवारांसाठी ५ वर्षे वाढीव मिळतील) .

इंडियन इकाॅनाॅमिक सर्व्हिस या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडे इकाॅनाॅमिक्स / ऍप्लाईड इकाॅनाॅमिक्स/ बिझिनेस इकाॅनाॅमिक्स/ इकाॅनाॅमेट्रीक्स यापैकी एका तरी विषयाची मान्यताप्राप्त विद्यापीठाची मास्टर्स डिग्री असणे आवश्यक आहे तर इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडे स्टॅटिस्टिक्स / मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स/ ऍप्लाईड स्टॅटिस्टिक्स यापैकी एका तरी विषयाची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा मास्टर्स डिग्री असणे आवश्यक आहे. यंदा अंतिम वर्षाची परीक्षा देणारे विद्यार्थी अर्ज करु शकतात. दोन्ही लेखी परीक्षा एक हजार गुणांच्या आहेत. दोन्ही परीक्षांमध्ये इंग्रजी व जनरल स्टडीज हे तीन तासांचे शंभर गुणांचे दोन पेपर्स आहेत . इंडियन इकाॅनाॅमिक सर्व्हिस परीक्षेमध्ये याशिवाय जनरल इकाॅनाॅमिक्स या विषयाचे तीन तासांचे प्रत्येकी दोनशे गुणांचे तीन पेपर आहेत तर इंडियन इकाॅनाॅमिक्स या विषयाचा तीन तासांचा दोनशे मार्कांचा एक पेपर आहे. इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस परीक्षेत इंग्रजी व जनरल स्टडीज या दोन पेपर व्यतिरिक्त स्टॅटिस्टिक्स चे दोन प्रत्येकी दोनशे गुणांचे दोन तासांचे पेपर आहेत जे पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे आहेत , शिवाय स्टॅटिस्टिक्स चे दोन प्रत्येकी दोनशे गुणांचे तीन तासांचे पेपर आहेत जे पूर्णपणे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचे आहेत .

ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे पेपरमध्ये चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्क असतील. जनरल स्टडीजच्या पेपरमध्ये चालू घडामोडी, भारतीय घटना , भारताचा इतिहास व भूगोल, भारतीय राजकीय सिस्टीम यावर प्रश्न असतील.

लेखी परीक्षेतून निवडलेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीला सामोरे जावे लागते ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे विषयाचे ज्ञान, चालू घडामोडींची माहिती अशा गोष्टींचा समावेश होतो. जे विद्यार्थी मुलाखतीमधून निवडले जातील त्यांना केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये क्लास वन अधिकारी म्हणून रुजू करून घेतले जाते. मुलाखतीमध्ये निवडल्या न गेलेल्या विद्यार्थ्यांचा डेटा निवडक सरकारी / निमसरकारी/ खाजगी संस्थांना दिला जातो व त्या संस्था त्यांच्या गरजेनुसार यातील विद्यार्थ्यांना त्यांच्या सेवेत सामावून घेऊ शकतात.

इकाॅनाॅमिक सर्व्हिसेस परीक्षेतून निवडलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक विश्लेषण, धोरणात्मक निर्णय, विविध विकास योजनांची अंमलबजावणी यासाठी केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये काम करावे लागते, याशिवाय आर्थिक संशोधन, अर्थसंकल्प सहाय्य , भाववाढ , आर्थिक सर्वेक्षण, व्यापार/ उद्योग/ शेती/ संसाधने/ आरोग्य/ शिक्षण या क्षेत्रातील धोरणांचा आढावा घेणे या कामांमध्ये सहभागी व्हावे लागते. इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस परीक्षेतून निवडलेल्या विद्यार्थ्यांना डाटा गोळा करणे, त्यांचे पृथःकरण करणे , त्याआधारे धोरणे ठरवणे , धोरणांचा आढावा व पुनरावलोकन, जीडीपी/ औद्योगिक उत्पादन अशा सर्व गोष्टीत माहितीची अचूकता व पडताळणी करणे अशा जबाबदाऱ्या केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये घ्याव्या लागतात.

एकूणातच अर्थशास्त्र व संख्याशास्त्र या विषयांत पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या विशेष परीक्षांद्वारे देशाच्या विविध क्षेत्रातील धोरण निश्चिती मध्ये काम करण्याची बहुमूल्य संधी मिळते.