आजच्या लेखात आपण ‘यूपीएससी मुख्य परीक्षा २०२६’ साठीची ‘रणनीती’ बघणार आहोत. आपली मुख्य परीक्षा २१ ऑगस्ट २०२६ रोजी सुरू होणार असून यासाठी आपल्याकडे २४ मे ते २१ ऑगस्ट असा ८८ दिवसांचा कालावधी आयोगाने दिला आहे. या कालावधीकडे एक पूर्णवेळ उत्तर-लेखन आणि उजळणी म्हणून पाहिले पाहिजे.

पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यामधील काळ हा यूपीएससी प्रवासातील सर्वात निर्णायक टप्पा असतो. यात साधारणपणे ९० ते १०० दिवस उपलब्ध असतात. आपली मुख्य परीक्षा २१ ऑगस्ट २०२६ रोजी सुरू होणार असून यासाठी आपल्याकडे २४ मे ते २१ ऑगस्ट असा ८८ दिवसांचा कालावधी आयोगाने दिला आहे. या कालावधीकडे एक पूर्णवेळ उत्तर-लेखन आणि उजळणी म्हणून पाहिले पाहिजे, नवीन वाचनाचा टप्पा हा नाही.

जर तुमचा स्कोअर आयोगाच्या विश्वसनीय उत्तरतालिकेनुसार सुरक्षित श्रेणीत असेल, तर ताबडतोब मुख्य परीक्षेची तयारी सुरू करा. अनेक उमेदवार निकालाची वाट पाहण्यात आपला मौल्यवान वेळ वाया घालवतात. यात प्रमुख प्रश्न येतो, तो म्हणजे नेमका ‘कट ऑफ’ किती लागू शकतो. जीएस १ पेपरमध्ये ७० पेक्षा अधिक गुण असणार्‍या सर्व विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षेची तयारी सुरू करायला हवी. सीसॅट मध्ये ६६ गुण अपेक्षित आहेत.

मुख्य परीक्षेची तयारी सुरू करण्यापूर्वी मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम समोर घेऊन त्यातील तुमच्या स्थितीचे प्रामाणिकपणे विश्लेषण करा. संपूर्ण अभ्यासक्रम समजून घ्या. त्यातील सर्व घटकांच्या नोट्सचे एकत्रीकरण करा. त्याचबरोबर दररोज उत्तर लिहिण्यास सुरुवात करणे अपेक्षित आहे. यात ‘निबंध’ आणि ‘नीतिशास्त्र’ या दोन्ही पेपरवर आपल्याला विशेष काम करायचे आहे.

 अभ्यासासाठी ३ टप्पे बनविले आहेत :-

पहिला टप्पा : ३० दिवस

या पहिल्या ३० दिवसात आपण संपूर्ण अभ्यासक्रम अभ्यासाने अपेक्षित आहे. यात आपल्या ९ पेपरचा समावेश आहे.

जीएस १ : भारतीय समाज, भूगोल, इतिहास.

जीएस २ : भारतीय राज्यव्यवस्था, गव्हर्नन्स, आंतरराष्ट्रीय संबंध.

जीएस ३ : अर्थव्यवस्था, पर्यावरण, सुरक्षा, विज्ञान-तंत्रज्ञान.

जीएस ४ : नीतिशास्त्र

वैकल्पिक विषय / ऑप्शनल विषय : पेपर १ व २

मराठी अनिवार्य व इंग्रजी अनिवार्य

या सर्व पेपरमधील अभ्यासक्रमाचे वेगात रिव्हीजन करणे अपेक्षित आहे. रिव्हीजन करताना गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा आधार घ्या. त्यानुसार अभ्यास केल्यास आपल्याला योग्य दिशा मिळते. आपला अभ्यास हा सटीक असतो. तसेच चालू घडामोडींशी आपल्या अभ्यासक्रमाची सांगड घालून अपेक्षित प्रश्नांची तयारी करणे अपेक्षित आहे. उदा. सध्याची युद्धजन्य परिस्थिती बघता त्यावर जीएस २ मधील आंतरराष्ट्रीय संबंधांवर प्रश्न अपेक्षित आहे. तसेच यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा त्याचा परिणाम आपल्याला जीएस ३ मध्ये विचारला जावू शकतो. तेथील भौगोलिकतेचा विचार करता वा इतिहासाचा विचार करता प्रश्न जीएस १ मध्येही विचारला जावू शकतो. अशा अपेक्षित प्रश्नांच्या उत्तरांचे आराखडे आपण तयार करून ठेवायला हवेत. 

दुसरा टप्पा : ३० दिवस

या ३० दिवसांत आपल्याला लिखाणाचा दररोज सराव करायचा आहे. हा सराव करताना आयोगाच्या प्रश्नानुरूप आपल्याला उत्तरे लिहिण्याचा सराव करावयाचा आहे. उदा. १० गुणांसाठी १५० शब्द व १५ गुणांसाठी २५० शब्द. तसेच नितीशास्त्रातील केस स्टडीवर विशेष काम व्हायला हवे. दर आठवड्याला आपण प्रत्येक जीएसचा १ पूर्ण पेपर (३ तास) लिहिला पाहिजे. उत्तरे प्रभावी होण्यासाठी प्रस्तावनेचे तंत्र, उपशीर्षके, आकृत्या/फ्लोचार्ट्स, बहुआयामी विश्लेषण, वेळ व्यवस्थापन इ. बाबींवर आपल्याला काम करावे लागेल.

निबंधांसाठी आपल्याला विशेष मेहनत घ्यायची असून, या विषयात ‘जीएस’पेक्षा अधिक गुण मिळण्याची खात्री असते. यासाठी दर ५ दिवसाला १ पूर्ण निबंध (असे ४ निबंध) व नंतर ३ तासांत २ निबंध लिहिण्याचा सराव आपल्याला करावयाचा आहे. आयोगाद्वारे प्रामुख्याने ‘ता्त्विवक निबंध’ विचारले जातात त्यामुळे त्यावर विशेष काम करायला हवे. निबंधासाठी संतुलित दृष्टिकोन विकसित करण्यावर आपण भर द्यायला हवा.

‘जीएस’ आणि ‘निबंध’ याबरोबरच तुमचा वैकल्पिक विषय जो असेल त्याचे लिखाण आपल्याला करायचे आहे. वैकल्पिक विषय हा किंगमेकर आहे. यात आपल्याला अधिकाधिक गुण घ्यायचे आहेत. त्यामुळे वैकल्पिक विषयाचा अभ्यासक्रम व त्यावर विचारले गेलेले प्रश्न नीट समजून घ्या. त्यावर आपल्याला अधिकाधिक मॉक टेस्ट द्यायच्या आहेत. जेणेकरून लिखाणात सटीकता येईल.

तिसरा टप्पा : २८ दिवस

यात आपल्याला फुल-लेंथ टेस्ट्स जास्तीत जास्त सोडवायच्या आहेत. आधीचे २ टप्पे जर आपण चांगल्या पद्धतीने पार पाडले असतील तर तुम्ही या ३ तासांच्या टेस्ट चांगल्या पद्धतीने सोडवू शकता. या सोडविलेल्या टेस्ट योग्य मार्गदर्शकाकडून तपासून त्यात सुचविलेल्या सुधारणांवर आपण काम करणे अपेक्षित आहे. सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचे युग आहे. बहुतेक विद्यार्थी केवळ ‘एआय’चा वापर करून हे करत असतील तर त्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की, ‘एआय’ नक्कीच तुम्हाला मदत करेल परंतु मानवी मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच गरजेचे आहे.

लक्षात ठेवा, सातत्य हे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. इथे प्रेरणेपेक्षा दैनंदिन लेखन अधिक महत्त्वाचे आहे. लहान सुधारणा वेगाने मोठ्या परिणामात बदलतात. यूपीएससीचा इतिहास आपल्याला हे सांगतो की, पूर्व परीक्षेनंतर जो उमेदवार सातत्याने लिहितो, तो सहसा फक्त वाचन करणार्‍या उमेदवारापेक्षा चांगली कामगिरी करतो.

sushilbari10@gmail.com