यूपीएससी मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषय ‘समाजशास्त्र’ या पेपरचे विश्लेषण आपण या लेखात बघणार आहोत. समाजशास्त्र वैकल्पिक पेपर-I हा प्रामुख्याने संकल्पनात्मक आणि विश्लेषणात्मक स्वरूपाचा होता. उमेदवारांना समाजशास्त्रीय सिद्धांत समजले आहेत का? आणि ते समकालीन सामाजिक मुद्द्यांवर ते कसे लागू होवू शकतात, याची चाचणी या पेपरमध्ये घेण्यात आली. समाजशास्त्र वैकल्पिक पेपर-II हा प्रामुख्याने भारतीय समाज, विचारवंत, सामाजिक बदल आणि समकालीन सामाजिक समस्यांवर केंद्रित होता. समाजशास्त्रीय संकल्पनांचा भारतीय उदाहरणांशी संबंध जोडणे या पेपरमध्ये अपेक्षित होते.
समाजशास्त्र वैकल्पिक पेपर-I
१. मूलभूत समाजशास्त्रीय संकल्पनांवर भर:
विभाग ‘अ’ मध्ये वर्ग आणि जात, अनौपचारिक अर्थव्यवस्था, भौगोलिक घटक, सामाजिक चळवळी, भांडवलशाही, सामाजिक उतरंड, सामाजिक बहिष्कार, धर्म आणि विज्ञान, प्रत्यक्षवाद आणि अन्वयार्थवाद, सत्ता, स्थलांतर आणि समाजशास्त्रीय पद्धती यासारख्या मूलभूत विषयांचा समावेश होता. यावरून संकल्पनात्मक स्पष्टतेचे सातत्यपूर्ण महत्त्व स्पष्ट होते.
२. विचारवंत अत्यंत महत्त्वाचे ठरले
डुरखिम, वेबर आणि व्यापक सैद्धांतिक दृष्टिकोनांवर यात थेट प्रश्न विचारण्यात आले होते. डुरखिम यांची ‘सामाजिक तथ्य म्हणून धर्म’ ही संकल्पना आणि अधिकार, नोकरशाही, वर्ग, दर्जा आणि सत्ता याविषयी वेबर यांचे विचार यावर विचारवंतांच्या संदर्भासह अचूक उत्तरे लिहिणे अपेक्षित होते.
३. विभाग ब मध्ये व्यापक सैद्धांतिक आकलनाची गरज
विभाग ‘ब’ मध्ये परिस्थितीची व्याख्या, पितृसत्ताक तडजोड, सामाजिक चळवळी, समाजशास्त्राचा बौद्धिक उगम, उत्पादन पद्धती, पंथ आणि उपपंथ, ग्राउंडेड थिअरी, वेबरची विषमतेची चौकट, औद्योगिक विरुद्ध प्लॅटफॉर्म भांडवलशाही, राष्ट्र-राज्य-नागरिकत्व, सामाजिक बदलाचा चक्रीय सिद्धांत आणि आंतरविभागीयता यांचा समावेश होता.
४. उपयोजन आणि तुलनात्मक विश्लेषणाला प्राधान्य
प्रश्न विचारताना “समीक्षात्मक विश्लेषण करा”, “मूल्यमापन करा”, “तुलना करा”, “चर्चा करा” आणि “सविस्तर स्पष्ट करा” अशा निर्देशात्मक शब्दांचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे केवळ सैद्धांतिक व्याख्या देणे पुरेसे ठरत नाही तर; उमेदवारांना ठोस युक्तिवाद, विचारवंतांचे संदर्भ, उदाहरणे आणि समीक्षात्मक दृष्टिकोन मांडणे आवश्यक होते.
५. भावी तयारीसाठी सर्वंकष संदेश
२०२७ साठी विद्यार्थ्यांनी पेपर-I च्या संकल्पना, विचारवंत, परस्परसंबंध, समकालीन उदाहरणे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. सिद्धांत, संशोधन पद्धती, विषमता, सामाजिक बदल, सत्ता, भांडवलशाही, सामाजिक चळवळी आणि आंतरविभागीयता या घटकांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. या पेपरवरून हे स्पष्ट होते की, समाजशास्त्र वैकल्पिक विषयात उत्तम गुण मिळवण्यासाठी संकल्पनात्मक समज आणि विश्लेषणात्मक उत्तरलेखन हेच कळीचे घटक आहेत.
आयोगाने विचारलेले प्रश्न
प्र. विवाह संस्थेच्या संदर्भात ‘पितृसत्ताक तडजोड’ ही संकल्पना कशा प्रकारे लागू केली जाऊ शकते? भाष्य करा. १०
प्र. वेबर यांच्या मते, सामाजिक विषमता निर्माण करण्यात आणि ती टिकवून ठेवण्यात वर्ग, प्रतिष्ठा आणि सत्ता यांचा परस्परसंबंध कसा असतो? २०
समाजशास्त्र वैकल्पिक पेपर-II
१. भारतीय समाजशास्त्रीय विचारवंतांवर विशेष भर
या पेपरमध्ये जी. एस. घुर्ये, एम. एन. श्रीनिवास आणि ए. आर. देसाई यांना विशेष महत्त्व देण्यात आले होते. भारतविद्याविषयक दृष्टिकोन, ग्राम अभ्यास, राष्ट्रवाद, सामाजिक वर्ग आणि उत्पादन पद्धती या विषयांवर प्रश्न विचारण्यात आले होते.
२. पारंपरिक मुद्द्यांची समकालीन समस्यांशी सांगड
प्रश्नांमध्ये जात, कुटुंब, धर्म, महिला, आदिवासी समाज, कृषी समाज, शहरीकरण आणि लोकसंख्या या घटकांचा समावेश होता. मात्र, हे प्रश्न सद्यस्थितीच्या परिप्रेक्ष्यातून विचारले गेले होते. उदा. आभासी सामाजिक चळवळी, कुटुंब नियोजन, महिलांवरील हिंसाचार, अतिरिक्त शहरीकरण आणि अनौपचारिक क्षेत्राचे औपचारिकीकरण.
३. ऐतिहासिक आकलनाचे महत्त्व
शेतकरी चळवळी, “गुन्हेगार जमात” ही वर्गवारी आणि वसाहतवादी राजवटीत भारतीय समाजात झालेला बदल यांसारख्या प्रश्नांद्वारे पेपरमध्ये वसाहतवादाच्या प्रभावाची चाचणी घेण्यात आली. यावरून भारतीय समाजातील निरंतरता आणि बदल समजून घेण्याचे महत्त्व अधोरेखित होते.
४. उपयोजनावर आधारित प्रश्न
अनेक प्रश्नांमध्ये निव्वळ सैद्धांतिक ज्ञानापेक्षा अधिक विश्लेषणाची मागणी होती. उमेदवारांना जमीन सुधारणा, विकास कार्यक्रम, लोकसंख्याविषयक गतिशीलता, शिक्षण, महिला चळवळी आणि अनौपचारिक क्षेत्राचे औपचारिकीकरण यावर चर्चा करावी लागली. त्यामुळे समर्पक उदाहरणे आणि समकालीन घडामोडी उत्तरांना अधिक प्रभावी बनवू शकल्या.
५. भावी तयारीसाठी सर्वंकष संदेश
२०२७ साठी विद्यार्थ्यांनी विचारवंत, भारतीय उदाहरणे, सरकारी कार्यक्रम, चालू सामाजिक घडामोडी यांचा एकत्रित अभ्यास केला पाहिजे. या पेपरवरून दिसून येते की प्रश्न स्टॅटिक अभ्यासक्रमातून समकालीन उपयोजनाकडे वळू शकतात. म्हणूनच उत्तरलेखनात संकल्पना, विचारवंत, भारतीय उदाहरण, विश्लेषण आणि संतुलित निष्कर्षाचा समावेश असायला हवा. एकंदरीत, संकल्पनात्मक स्पष्टता, समाजशास्त्रीय दृष्टिकोन आणि सिद्धांतांची भारतीय समाजाशी सांगड घालण्याच्या क्षमतेला या पेपरमध्ये चांगले महत्त्व मिळाले होते.
आयोगाने विचारलेले प्रश्न
प्र. भारतीय सामाजिक वर्गांचा अभ्यास ‘वसाहतवादी उत्पादन पद्धती’च्या आधारे केला पाहिजे, असा युक्तिवाद ए. आर. देसाई कसा करतात? स्पष्ट करा. १०
प्र. जी. एस. घुर्ये यांनी प्रतिपादन केलेला ‘भारतविद्याविषयक दृष्टिकोन’ भारतीय ग्रंथांच्या माध्यमातून भारतीय समाजाचा अभ्यास करण्यावर भर देतो. इतर समाजांच्या अभ्यासात हा दृष्टिकोन कसा उपयुक्त ठरू शकतो? सविस्तर भाष्य करा. २०
२०२६ च्या मुख्य परीक्षेतील या वैकल्पिक विषयाचे प्रश्न समजून त्यांना आपण अभ्यासक्रमाशी जोडून अभ्यासाने अपेक्षित आहे. २०२७ साठी या बाबी लक्षात घेवून आपण विश्लेषणात्मक पद्धतीने यासाठी रणनीती आखली पाहिजे.
