डॉ. सुशील बारी
२०२६ च्या यूपीएससी मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषय ‘वनस्पतीशास्त्र’ या पेपरचे विश्लेषण आपण या लेखात बघणार आहोत.
वनस्पतीशास्त्र वैकल्पिक विषय पेपर १ हा संकल्पनात्मक स्पष्टता, वस्तुस्थितीजन्य अचूकता, विश्लेषणात्मक समज आणि वनस्पतीशास्त्रीय तत्त्वांचा वापर या बाबींची चाचणी घेतो. वनस्पतीशास्त्र वैकल्पिक विषय पेपर २ मध्ये तथ्यात्मक, संकल्पनात्मक आणि उपयोजनावर आधारित प्रश्न आयोगाद्वारे विचारण्यात आले आहेत. या दोन्ही पेपरचे विश्लेषण बघूयात –
वनस्पतीशास्त्र वैकल्पिक विषय पेपर १ विश्लेषण
अभ्यासक्रम व्याप्ती
विभाग ‘अ’ हा सूक्ष्मजीवशास्त्र, अबीजी वनस्पती, वनस्पती रोगशास्त्र, वर्गीकरणशास्त्र, उत्क्रांती आणि वर्गीकरण या घटकांवर केंद्रित आहे. यामध्ये नील-हरित शैवाल, विषाणू, नायट्रोजन स्थिरीकरण, जीवाश्मीकरण, रसायनवर्गीकरण, अँथोसिरॉस, लॅमिनेरिया, अनावृत्तबीजी वनस्पतींचे बीजांड आणि एपीजी-४ वर्गीकरण हे महत्त्वाचे घटक समाविष्ट आहेत.
विभाग ‘ब’ हा वनस्पती शरीररचनाशास्त्र, बाह्यस्वरूपशास्त्र, भ्रूणशास्त्र, शरीरक्रियाशास्त्र आणि उपयोजित वनस्पतीशास्त्र यांवर भर देतो. यातील प्रश्न बहुभ्रूणता, पेशी निलंबन संवर्धन, वनस्पतींचे पाळीवीकरण, आर्थिकदृष्ट्या उपयुक्त वनस्पतींची कुळे, जलवाहिनी, हर्बेरियम तयार करणे, पूर्णशक्तता, अगुणित निर्मिती, सूक्ष्मप्रवर्धन आणि लोकवनस्पतीशास्त्रीय संशोधन या विषयांवर आधारित आहेत.
विशेषत: ज्या उमेदवारांनी संकल्पनात्मक बाबी समजून घेतलेल्या नाहीत त्यांच्यासाठी हा पेपर कठीण आहे. अनेक प्रश्नांमध्ये सविस्तर स्पष्टीकरणे, तुलना आणि नामनिर्देशित आकृत्यांची आवश्यकता आहे. मक्याच्या खोड कुजण्याच्या रोगाचे चक्र आणि त्याचे व्यवस्थापन, एपीजी-४ वर्गीकरण, प्रायोगिक भ्रूणशास्त्र आणि सूक्ष्मप्रवर्धन यांवरील प्रश्नांसाठी पद्धतशीर व तांत्रिकदृष्ट्या अचूक उत्तरांची गरज आहे. हा पेपर वनस्पतींची शास्त्रीय नावे, वनस्पतींची कुळे, निदानात्मक वैशिष्ट्ये आणि आर्थिक उपयोग यांद्वारे तथ्यात्मक स्मरणशक्तीची देखील चाचणी घेतो. त्यामुळे केवळ संकल्पनात्मक तयारी पुरेशी ठरणार नाही तथ्यांवरही आपली पकड हवी.
नवीन ट्रेंडस
हा पेपर उपयोजित वनस्पतीशास्त्र आणि जैवतंत्रज्ञानाला लक्षणीय महत्त्व देतो. यात वनस्पती ऊती संवर्धन, पूर्णशक्तता, समयुग्मजी द्विगुणित लाईन्स, वनस्पती रोग व्यवस्थापन आणि आधुनिक वर्गीकरण पद्धती यावरून मूलभूत वनस्पतीशास्त्रीय संकल्पनांना संशोधन आणि प्रत्यक्ष उपयोगांशी जोडण्याचे महत्त्व दिसून येते. त्याच वेळी वनस्पती उत्क्रांती, जीवाश्म, अनावृत्तबीजी वनस्पती आणि वनस्पतींचे पाळीवीकरण यांसारखे पारंपरिक घटकही आयोगाद्वारे विचारण्यात आले आहेत.
आयोगाद्वारे विचारलेले प्रश्न
* खनिजीकरण, सहजीवी आणि असहजीवी नायट्रोजन स्थिरीकरण यांचे वर्णन करा. शेतीसाठी जमिनीचा दर्जा सुधारण्यास ते कसे मदत करतात?
* मक्यामध्ये खोडकुज रोग (स्टॉकरॉट) निर्माण करणार्या जीवाचे नाव सांगा. त्याची लक्षणे, रोगचक्र, नियंत्रण आणि व्यवस्थापन यांचे वर्णन करा.
* सूक्ष्मप्रसारणामध्ये माध्यम (मीडिया) आणि वाढ नियंत्रक (ग्रोथ रेग्युलेटर्स) यांची भूमिका काय असते?
* सूक्ष्मप्रसारणादरम्यान होणारा स्त्राव (एक्स्युडेशन) आणि दूषिततेच्या (कंटॅमिनेशन) समस्यांवर नियंत्रण कसे मिळवावे?
* रसायनी वर्गीकरणशास्त्र म्हणजे काय? वनस्पती वर्गीकरणातील वर्गीकरणविषयक समस्या सोडवण्यासाठी रासायनिक पुरावे कशा प्रकारे योगदान देतात, याचे विश्लेषण करा.
वैकल्पिक विषय पेपर २ विश्लेषण
अभ्यासक्रम व्याप्ती
विभाग ‘अ’ प्रामुख्याने जनुकशास्त्र, पेशीशास्त्र, रेण्वीय जीवशास्त्र आणि उत्क्रांती या घटकांवर केंद्रित आहे. महत्त्वाच्या घटकांमध्ये फ्रेम-शिफ्ट उत्परिवर्तन, लॅम्पब्रश गुणसूत्रे, रिपोर्टर जीन्स, सेल सिग्नलिंग, डीएनए फिंगरप्रिंटिंग, लिंग-संलग्न अनुवांशिकता, गुणसूत्रीय बदल, सूक्ष्मनलिका, निष्क्रिय वहन, रेण्वीय मार्कर, बहुगुणितता, पीसीआर, फिश आणि हेटेरोसिस यांचा समावेश आहे. उत्परिवर्तनाचा जैवरासायनिक व रेण्वीय आधार आणि सेंद्रिय उत्क्रांतीचे पुरावे यांवरील प्रश्न संकल्पनात्मक स्पष्टता आणि विश्लेषणात्मक क्षमतेची चाचणी घेतात.
विभाग ‘ब’ वनस्पती कार्यशास्त्र, जैवरसायनशास्त्र, परिस्थितिकी आणि उपयोजित वनस्पतीशास्त्र या घटकांवर भर देतो. प्रमुख घटकांमध्ये मंच परिकल्पना, सहसंबंध आणि समाश्रयण, हीट-शॉक प्रथिने, जैव-भूरासायनिक चक्रे, एनआयएफ जनुक नियमन, मूळ गाठी निर्मिती, नायट्रोजन चयापचय, प्रकाशसंश्लेषण, फळे पिकणे, विकर कार्यक्षमता, बी सुप्तावस्था, वनस्पती भूगोल, शेतकरी हक्क आणि वनसंपत्ती यांचा समावेश आहे.
या पेपरमधील संक्षिप्त टीपांसाठी अचूक व्याख्या आणि समर्पक उदाहरणांची आवश्यकता आहे, तर इतर गुणांच्या प्रश्नांसाठी तपशीलवार स्पष्टीकरणे, प्रक्रिया आणि सुव्यवस्थित तर्कांची आवश्यकता आहे. पिसीआर आणि फिश, नायट्रोजन चयापचय, विकरांची कार्यपद्धती आणि बीज अंकुरण यांसारख्या घटकांसाठी टप्प्याटप्प्याने मांडणी आणि वैज्ञानिक अचूकतेची गरज भासते.
नवीन ट्रेंडस
हा पेपर रेण्वीय जीवशास्त्र, जनुकशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान—विशेषत: रेण्वीय मार्कर, बहुगुणितता, संकर तेज आणि जनुक नियमन यांना लक्षणीय महत्त्व देतो. प्रकाशसंश्लेषण, नायट्रोजन चयापचय, विकर आणि फळे पिकणे यांवरील प्रश्नांद्वारे वनस्पती कार्यशास्त्र हा एक महत्त्वाचा भाग राहिला आहे. पर्यावरणीय चिंता, वनसंपत्ती आणि बौद्धिक संपदा हक्क हे घटक वनस्पतीशास्त्रीय ज्ञानाला समकालीन शेती आणि संवर्धनाच्या मुद्द्यांशी जोडतात.
आयोगाद्वारे विचारलेले प्रश्न
* प्रकाश-फॉस्फोरिलीकरण आणि ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलीकरण यांमधील फरक स्पष्ट करा.
* भारतातील वनसंपदेच्या सद्यस्थितीवर चर्चा करा. जंगलतोडीसाठी कारणीभूत असणारे घटक सांगा.
* बियांच्या अंकुरण प्रक्रियेदरम्यान होणारे जैवरासायनिक बदल स्पष्ट करा.
* फळे पिकण्याच्या प्रक्रियेदरम्यान होणार्या जैवरासायनिक आणि शारीरिक बदलांवर चर्चा करा.
* शेतकर्यांचे अधिकार आणि बौद्धिक संपदा अधिकारांविषयी माहिती द्या.
विद्यार्थ्यांनी संकल्पनात्मक उजळणी, फ्लोचार्ट, नामनिर्देशित आकृत्या, जैवरासायनिक पाथवे आणि तुलनात्मक तक्त्यांना प्राधान्य दिले पाहिजे. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करणे आणि विहित शब्दमर्यादेचे पालन करणे अपेक्षित आहे. उत्तरांची रचना तार्किक असावी: जिथे आवश्यक असेल तिथे व्याख्या, स्पष्टीकरण, उदाहरणे, आकृत्या आणि महत्त्व यांचा समावेश करा. sushilbari10@gmail.com
