यूपीएससी मुख्य परीक्षेतील दोन अनिवार्य पेपर असतात. त्यापैकी एका अनिवार्य पेपरबाबत आपण या लेखात जाणून घेणार आहोत; तो म्हणजे इंग्रजी अनिवार्य होय. या दोन अनिवार्य पेपरमध्ये दुसरा पेपर प्रादेशिक भाषांतून लिहिण्याची विद्यार्थ्यांना मुभा असते. उदा. मराठी, गुजराती, तेलगू इ. महाराष्ट्रातील विद्यार्थी हे मराठी भाषेचा अनिवार्य पेपर लिहितात. त्याबाबत आपण आगामी लेखात जाणून घेवू. या पेपरचा मेरिट लिस्टवर प्रभाव पडत नाही; परंतु विद्यार्थ्यांचा विचार मेरिट लिस्टसाठी करावा याकरिता भाषेचे दोन्ही पेपरमध्ये ३०० पैकी ७५ गुण (२५%) मिळविणे गरजेचे असते.
बऱ्याचदा मुख्य परीक्षेच्या वेळी या पेपरला विद्यार्थी गांभीर्याने घेत नाहीत. जर भाषेच्या अनिवार्य पेपरमध्ये आपल्याला किमान ७५ गुण मिळाले नाहीत, तर इतर सात पेपर जे मेरिट लिस्टमधील आपले स्थान ठरवत असतात त्यात मिळणाऱ्या गुणांना काही एक अर्थ राहत नाही. याचाच अर्थ असा होतो की, आपली सर्व मेहनत व प्रयत्न भाषेचे हे दोन पेपर वाया घालवू शकतात. या पेपरचे स्वरूप जाणून घेतले, तर एक बाब विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल की, जर गांभीर्याने हा संपूर्ण पेपर सोडवला तर या पेपरमध्ये ७५ गुण मिळविणे या पेपरमध्ये अवघड नाही.
पेपरचे स्वरूप –
१) गुण : ३०० (इतर सर्व जीएस पेपर हे २५० गुणांचे होते.)
२) वेळ : तीन तास
३) भाषा : हा पेपर फक्त इंग्रजी भाषेतूनच असतो.
इतर जीएसचे पेपर हे द्वैभाषिक असतात. जीएसच्या पेपरमधील प्रश्न हे इंग्रजी व हिंदी या दोन्ही भाषेत दिलेले असतात. परंतु इंग्रजी अनिवार्य पेपरमध्ये जर शब्दांचा वा प्रश्नांचा अर्थ कळला नाही, तर गोंधळ होऊ शकतो. उदा. इंडियन्स आर हिप्पोक्राईटस् असा निबंध २०१३ मध्ये विचारला होता; परंतु बहुतेक मुलांना हिप्पोक्राईटस् या शब्दाचा अर्थ नीट माहीत नसल्याने निबंध लिहिण्यात अडचण आली होती. त्यामुळे बहुतेक विद्यार्थी त्या वर्षी यूपीएससी मुख्य परीक्षेतून मुलाखतीसाठी केवळ या पेपरमुळे पात्र ठरले नव्हते. यानंतरच या पेपरची पात्रता २५% इतकी करण्यात आली.
या पेपरमध्ये समाविष्ट अभ्यासक्रम –
१) निबंध : १०० गुणांसाठी ६०० शब्दांत एक निबंध लिहावा लागतो. यात बदल होऊ शकतो. कारण २०१३ मध्ये ५० गुणांसाठी दोन निबंध विचारले होते. याकरिता खासकरून भाषेचा घटक म्हणून निबंध लिहिणे आवश्यक असते. २०१४ ते २०२५ चा विचार केल्यास एकच विषय निवडणे आवश्यक असते.
२०२५ च्या मुख्य परीक्षेतील निबंधाचे विषय बघा – खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे ६०० शब्दांत निबंध लिहा: १०० गुण
(अ) चित्रपटाचा कच्चा माल म्हणजे जीवन
(ब) कोणताही माणूस बेट नाही
(क) समकालीन भारतातील खाण्याच्या सवयी आणि जीवनशैली
(ड) ज्ञान प्रणाली म्हणून लोककथा
२) उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा हा घटक ७५ गुणांसाठी असून, यात १५ गुणांपैकी ५ प्रश्न दिलेल्या उताऱ्यावर विचारलेले असतात. उतारा नीट वाचून, समजून स्वतःच्या शब्दांत ही उत्तरे लिहावीत. उताऱ्यातील ओळी उचलून उताऱ्यात लिहिणे टाळावे.
३) सारांश लेखन हा घटक ७५ गुणांसाठी असून, दिलेल्या उताऱ्याचे स्वतःच्या शब्दांत एक तृतीयांश इतके सारांशलेखन अपेक्षित असते. इथेही उतारा नीट वाचून त्याचा मतीतार्थ स्वतःच्या शब्दांत सारांशलेखन म्हणून लिहिणे आवश्यक असते. सारांश लेखनात उताऱ्यातील वाक्ये जशीच्या तशी लिहू नयेत.
४) व्याकरण : इंग्रजी व्याकरण हा घटक ५० गुणांसाठी असून, त्यात व्याकरणातील पुढील घटकांचा समावेश होतो
आवश्यक त्या दुरुस्त्या करून खालील वाक्ये पुन्हा लिहा.
- मूळ वाक्यात अनावश्यक बदल करू नका. १० गुण
- गहाळ शब्द लिहा. ५ गुण
- कंसात दिलेल्या क्रियापदाचे योग्य रूप वापरा. ५ गुण
- खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा: ५ गुण
- अर्थ न बदलता निर्देशित केल्याप्रमाणे खालील वाक्ये पुन्हा लिहा: १० गुण
- अर्थ स्पष्टपणे बाहेर काढणारी वाक्ये बनवण्यासाठी खालील शब्द वापरा. शब्दांचे स्वरूप बदलू नका. (अस्पष्ट आणि अस्पष्ट वाक्यांसाठी कोणतेही गुण दिले जाणार नाहीत) ५ गुण
- रिकाम्या जागा भरण्यासाठी योग्य शब्द निवडा. ५ गुण
- खालील वाक्प्रचार त्यांचा अर्थ स्पष्टपणे बाहेर काढण्यासाठी तुमच्या स्वतःच्या वाक्यांमध्ये वापरा. ५ गुण
या पेपरसाठी गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका पाहून विद्यार्थ्यांनी चांगले आकलन करून त्यानुसार लिहिण्याचा सराव व व्याकरणातील संकल्पनांचा सराव करणे उपकारक ठरेल. ज्या विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात इंग्रजी व्याकरण व इतर घटकांचा चांगला अभ्यास केला असेल, त्यांना ७५ गुण मिळविण्यासाठी विशेष मेहनत घेण्याची गरज पडत नाही; परंतु त्याच वेळी या विषयाला कमी लेखून वा त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विद्यार्थ्यांनी गांभीर्याने पूर्ण पेपर सोडवावा. खोट्या आत्मविश्वासाची किंमत फार मोठी चुकवावी लागते, हे या पेपरने बऱ्याचदा दाखवून दिले आहे. तेव्हा विद्याथ्यांनी इंग्रजी अनिवार्य या पेपरकडे सकारात्मक पद्धतीने बधावे.
sushilbari10@gmail.com
