यूपीएससी मुख्य परीक्षेतील दोन अनिवार्य पेपरपैकी इंग्रजी या अनिवार्य पेपरबाबत आपण मागील लेखात जाणून घेतले आहे. या दोन अनिवार्य पेपरपैकी दुसरा पेपर प्रादेशिक भाषांतून लिहिण्याची विद्यार्थ्यांना मुभा असते. उदा. मराठी, गुजराती, तेलगू इ. महाराष्ट्रातील विद्यार्थी हे मराठी अनिवार्य हा पेपर निवडतात, तेव्हा या लेखात या पेपरबाबत जाणून घेवू. या पेपरचा मेरिट लिस्टवर प्रभाव पडत नाही; परंतु विद्यार्थ्यांचा विचार मेरिट लिस्टसाठी करावा याकरिता या पेपरमध्ये ३०० पैकी ७५ गुण (२५%) मिळविणे गरजेचे असते. बऱ्याचदा मुख्य परीक्षेच्या वेळी या पेपरला विद्यार्थी गांभीर्याने घेत नाहीत.

जर भाषेच्या अनिवार्य पेपरमध्ये आपल्याला किमान ७५ गुण मिळाले नाहीत, तर इतर सात पेपर जे मेरिट लिस्टमधील आपले स्थान ठरवत असतात त्यात मिळणाऱ्या गुणांना काही एक अर्थ राहत नाही. याचाच अर्थ असा होतो की, आपली सर्व मेहनत व प्रयत्न भाषेचे हे दोन पेपर वाया घालवू शकतात हे आपण मागील लेखात जाणून घेतले होते. या पेपरचे स्वरूप जाणून घेतले, तर एक बाब विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल की, जर गांभीर्याने हा संपूर्ण पेपर सोडवला तर या पेपरमध्ये ७५ गुण मिळविणे या पेपरमध्ये अवघड नाही.

मराठी भाषा अनिवार्य. पेपरचे स्वरूप –

१) गुण : ३०० (इतर सर्व जीएस पेपर हे २५० गुणांचे होते.)
२) वेळ : तीन तास
३) भाषा : हा पेपर फक्त मराठी भाषेतूनच असतो.
इतर जीएसचे पेपर हे द्वैभाषिक असतात. जीएसच्या पेपरमधील प्रश्न हे इंग्रजी व हिंदी या दोन्ही भाषेत दिलेले असतात. परंतु मराठी अनिवार्य पेपरमध्ये सर्व प्रश्न हे मराठी भाषेतच असतात.

या पेपरमध्ये समाविष्ट अभ्यासक्रम –

१) निबंध : १०० गुणांसाठी ६०० शब्दांत एक निबंध लिहावा लागतो. यात बदल होऊ शकतो. यात विचारले जाणारे विषय हे चालू घडामोडींशी संबंधित असतात. त्यामुळे हे विषय आपण चालू घडामोडींच्या आधारे समजून घेवू शकतो. अपेक्षित विषय काढून त्यांच्यावर काम केल्यास यात विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही. २०२५ च्या मुख्य परीक्षेतील निबंधाचे विषय बघा –
खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे ६०० शब्दांत निबंध लिहा: १०० गुण
(अ) भारतीय ज्ञानपरंपरेची प्रासंगिकता
(ब) विश्वयुद्धाचे वाढते संकट
(क) डिजीटल आर्थिक देवाण-घेवाणीचे फायदे
(ड) भारतीय महिलांचा खेळातील वाढता सहभाग

२) उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा हा घटक ६० गुणांसाठी विचारला जातो. यात १२ गुणांसाठी पाच प्रश्न दिलेल्या उताऱ्यावर विचारलेले असतात. उतारा नीट वाचून, मतीतार्थ समजून स्वतःच्या शब्दात उत्तरे लिहावीत. उताऱ्यातील ओळी जशाच्या तशा लिहू नयेत. १२ गुणांचा एक प्रश्न असल्याने किमान १२० शब्दांत उत्तर लिहायला हवे.

३) सारांश लेखन सारांश लेखन हा घटक ६० गुणांसाठी विचारला जातो. इथेही उतारा नीट वाचून त्याचा मतीतार्थ स्वतःच्या शब्दांत सारांशलेखन म्हणून लिहिणे आवश्यक असते. एकूण शब्द नमूद केलेले असल्यास त्याचे एकतृतीयांश वा जर नसेल तर विद्याथ्यांनी मोजून घ्यावेत. सारांश लेखनात उताऱ्यातील वाक्ये जशीच्या तशी लिहू नयेत. या प्रश्नात स्पष्टपणे नमूद केलेले आहे की उताऱ्याला शीर्षक देवू नये. त्यामुळे इथे शीर्षक देवू नये.

४) भाषांतर यासाठी ४० गुण असतात. ‘मराठीतील उताऱ्याचे इंग्रजीत’ व ‘इंग्रजीतील उताऱ्याचे मराठीत’ प्रत्येकी २० गुण यासाठी असतात. भाषांतर करताना अर्थ समजून भाषांतर करणे अपेक्षित आहे.

५) व्याकरण : मराठी व्याकरण हा घटक ४० गुणांसाठी असून, त्यात व्याकरणातील पुढील घटकांचा समावेश होतो –

पुढील वाक्प्रचारांचा म्हणींचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. १० गुण
उदा. २०२५ मध्ये पुढील वाक्प्रचार व म्हणी विचारण्यात आल्या आहेत – पाणी सोडणे, पाय मोकळे करणे, पाळतीवर असणे, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा.

पुढे दिलेल्या कल्पनांचा 10 वाक्यांत विस्तार करा. ५ गुण
उदा. २०२५ मध्ये पुढील विषय दिले होते – जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे व नाही निर्मळ जीवन, काय करील साबण ?

पुढे दिलेल्या विषयावर 20 वाक्यांचा संवाद लिहा. १० गुण
उदा. २०२५ मध्ये पुढील विषय दिला होता – बोलीभाषांचे महत्त्व.

पुढे दिलेल्या शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. ५ गुण
उदा.२०२५ मध्ये पुढील शब्द दिले होते – पाणि, गवाक्ष, अंबुद, मिष, नुपुर.

पुढे दिलेल्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. ५ गुण
उदा.२०२५ मध्ये पुढील शब्द दिले होते – मान, टणक, निर्माही, चोर, आरोग्य.

या पेपरसाठी गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका पाहून विद्यार्थ्यांनी चांगले आकलन करून त्यानुसार लिहिण्याचा सराव व व्याकरणातील संकल्पनांचा सराव करणे उपकारक ठरेल. ज्या विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात मराठी व्याकरण व इतर घटकांचा चांगला अभ्यास केला असेल, त्यांना ७५ गुण मिळविण्यासाठी विशेष मेहनत घेण्याची गरज पडत नाही; परंतु त्याच वेळी या विषयाला कमी लेखून वा त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विद्यार्थ्यांनी गांभीर्याने पूर्ण पेपर सोडवावा. खोट्या आत्मविश्वासाची किंमत फार मोठी चुकवावी लागते, हे या पेपरने बऱ्याचदा दाखवून दिले आहे. तेव्हा विद्याथ्यांनी मराठी अनिवार्य या पेपरकडे सकारात्मक पद्धतीने बघावे.
sushilbari10@gmail.com