या लेखात आपण यूपीएससी मुख्य परीक्षेतील ‘निबंध’ या विषयाला समजून त्यासाठी आपली काय रणनीती असावी याची चर्चा करणार आहोत. आपण या पेपरमध्ये ‘जीएस’च्या तुलनेत अधिक गुण घेऊ शकतो.

‘निबंध’ या पेपरसाठी आयोगाने अभ्यासक्रम दिलेला नाही; तेव्हा गतवर्षीचे पेपर बघून त्याच्या विश्लेषणाच्या आधारे आपण यासाठी तयारी करू शकतो.

पेपरचे स्वरूप

एकूण गुण: २५० (प्रत्येक निबंधासाठी १२५ गुण).

कालावधी: ३ तास (प्रत्येक निबंधासाठी अंदाजे ९० मिनिटे).

शब्द मर्यादा: १,००० ते १,२०० शब्द प्रति निबंध.

दिशानिर्देश: प्रश्नपत्रिका विभाग ‘अ’ आणि विभाग ‘ब’ मध्ये विभागलेली असते. प्रत्येक विभागात चार पर्याय असतात आणि तुम्हाला प्रत्येक विभागातून अचूक एक विषय निवडायचा असतो.

निबंध आयोगाचे ट्रेन्ड्स

अलीकडच्या वर्षांत, यूपीएससीने दोन्ही विभागांमध्ये पारंपारिक सामाजिक-आर्थिक किंवा प्रशासनावर आधारित विषयांवरून आपला मोर्चा वेगाने तात्विक आणि अमूर्त संकल्पनांकडे वळवला आहे. दोन्ही विभागातील एकूण ८ निबंधाच्या विषयांपैकी जवळपास ५ ते ६ पर्याय हे याच प्रकारचे असतात. २०२५ च्या मुख्य परीक्षेतील खालील विषय बघा :

‘सत्याला कोणताही रंग नसतो.’

‘युद्धाची सर्वोच्च कला म्हणजे, लढाई न करताच शत्रूला नमवणे होय.’

‘विचार जगाचा शोध घेतो आणि जगाची निर्मितीही करतो.’

‘सर्वोत्तम धडे हे कटू अनुभवांमधूनच शिकले जातात.’

‘जीवनाकडे गंतव्यस्थान म्हणून नव्हे, तर एक प्रवास म्हणून पाहणेच सर्वोत्तम आहे.’

‘गढूळ पाणी केवळ शांत राहू दिल्यानेच स्वच्छ होते.’

‘दिवसांना जे कधीच कळत नाही, ते वर्षांचे अनुभव खूप काही शिकवतात.’

‘समाधान हीच नैसर्गिक संपत्ती आहे; तर चैनीची जीवनशैली ही कृत्रिम गरिबी होय.’

यूपीएससीने आपल्या अभ्यासक्रमात स्पष्टपणे नमूद केले आहे की, निबंधात व्यवस्थित मांडणी, संक्षिप्तता आणि प्रभावी अभिव्यक्ती असायला हवी. ही केवळ ‘जीएस’च्या तथ्यात्मक डेटाची जत्रा नसून, तुमच्या व्यक्तिमत्त्वाची, संरचित विचारांची आणि स्पष्टतेची चाचणी आहे हे समजून घ्या.

एक संतुलित निबंध व त्यासाठीचा आराखडा :

प्रस्तावना (१०० – १५० शब्द) : निबंधाची प्रस्तावना म्हणजेच सुरुवात ही परीक्षकाचे लक्ष वेधून घेणारी असावी. एखादी प्रासंगिक कथा, ऐतिहासिक संदर्भ, चर्चेतील घटना, कविता, सुभाषिते किंवा दिलेल्या विषयाची बहुआयामी व्याख्या आपण येथे वापरू शकतो.

मुख्य भाग (८०० – ९०० शब्द) : परिच्छेदांच्या सुसंगत प्रवाहाचा वापर करून विषयाचे वेगवेगळ्या आयामांमध्ये विश्लेषण करणे इथे अपेक्षित आहे. हे विश्लेषण विविध उदाहरणे व केस स्टडीच्या आधारे व्हायला हवे. याकरिता विविध अपेक्षित विषयांवरील केस स्टडी व उदाहरणे आपण तयार करून ठेवायला हवीत.

निष्कर्ष (१०० – १५० शब्द) : आपल्या निबंधाचा शेवट आशावादी, दूरदर्शी असावा. आपण उपाय-भिमुख दृष्टिकोनासह मुख्य विषयांचा सारांश मांडणे इथे अपेक्षित असते.

लेखनाचा दृष्टिकोन

निबंधावर प्रभुत्व मिळवण्यासाठी ३ तासांच्या कालावधीत धोरणात्मक दृष्टिकोन असणे आवश्यक आहे. वेळेचे काटेकोरपणे विभाजन केल्याने तुमचा लेखनाचा वेग आणि उत्साह शेवटपर्यंत टिकून राहतो.

१. विषय निवड (५ मिनिटे) : तीन फिल्टर्स वापरून ४ पर्यायांचे विश्लेषण करा: कंटेंटची उपलब्धता, तुमच्या युक्तिवादांची विश्वासार्हता, आणि विषयाचा नेमका अर्थ समजून घेण्याचा तुमचा एकूण आत्मविश्वास. एखादा विषय फक्त गुंतागुंतीचा वाटतो म्हणून तो निवडणे टाळा, जर तुमच्याकडे त्यासाठी ठोस युक्तिवाद नसतील.

२. संरचित विचारमंथन आणि माइंड-मॅपिंग (१५ मिनिटे) : तुमच्या उत्तरपत्रिकेच्या रफ पेजेसवर जावून राजकीय, आर्थिक, सामाजिक, तांत्रिक, कायदेशीर, पर्यावरणीय किंवा काळाच्या दृष्टिकोनातून (भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ) यांसारख्या संरचित चौकटींचा वापर करून विषयाचे विश्लेषण करा. संबंधित सुभाषिते, केस स्टडीज आणि कमिटी रिपोर्ट्स (समितीचे अहवाल) नोंदवून घ्या.

३. कथाप्रवाह मसुदा तयार करणे (६५ मिनिटे) : लिखाणाला सुरुवात करा. वाक्ये स्पष्ट ठेवा आणि जड शैक्षणिक शब्दांचा वापर टाळा. परिच्छेदांमध्ये सुरळीतपणा असल्याची खात्री करा; एका परिच्छेदाचे शेवटचे वाक्य पुढच्या परिच्छेदाची पार्श्वभूमी नैसर्गिकरित्या तयार करणारे असावे.

४. पुनरावलोकन आणि व्याकरण तपासणी (५ मिनिटे) : पुढच्या विभागात जाण्यापूर्वी आणि हीच प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यापूर्वी स्पेलिंगच्या चुका, फॉर्मेटिंगच्या समस्या किंवा राहून गेलेले उपमथळे वेगाने तपासून घ्या.

काय करावे :

बहुआयामी बना : विषय जर तंत्रज्ञानाबद्दल असेल, तर फक्त आर्थिक बाजू पाहू नका. मानवी मानसशास्त्र, नैतिकता, आंतरराष्ट्रीय भू-राजकारण आणि उपेक्षित समाजांवर होणाऱ्या त्याच्या प्रभावाचा शोध घ्या.

युक्तिवादांना पुराव्यांचा आधार द्या : तुमच्या दाव्यांचे समर्थन व्यापक डेटा, घटनात्मक कलमे किंवा सुप्रसिद्ध संस्थात्मक उदाहरणांनी करा. उदा. नीती आयोगच्या शिफारसी किंवा ‘युएन’ची शाश्वत विकास उद्दिष्टे.

गद्यात लिहा : लांबलचक, पॉईंट-निहाय याद्या वापरण्याऐवजी संरचित परिच्छेदांचा वापर करा.

काय करू नये :

मुख्य विषयापासून भरकटू नका : परीक्षकाला तुम्ही लक्ष विचलित होऊ दिलेले नाही हे दाखवण्यासाठी तुमचे युक्तिवाद वारंवार विषयाच्या मूळ शब्दांशी जोडा.

अति-राजकीय होऊ नका : सध्याच्या विशिष्ट राजकारण्यांची नावे घेणे किंवा उघडपणे मूलगामी वैचारिक भूमिका घेणे टाळा. एक संतुलित, नोकरशाही तटस्थता राखा.

खोटे कोट्स बनवू नका: एखादे विधान कोणी म्हटले आहे याबद्दल तुम्हाला खात्री नसल्यास, चुकीचे नाव अंदाजून लिहिण्याऐवजी व्यापक संदर्भ वापरा. उदा. ‘एका प्रसिद्ध तत्त्ववेत्त्याने म्हटल्याप्रमाणे..’.

निबंधाचा पेपर तुमच्या प्रशासकीय मानसिकतेचे मूल्यमापन करतो. कोणताही विधायक मार्ग न दाखवता अत्यंत निराशावादी किंवा केवळ टीकात्मक लेखन करणे टाळा. sushilbari10@gmail.com