या लेखात आपण यूपीएससी मुख्य परीक्षेतील भारतीय समाज या विषयाविषयी जाणून घेणार आहोत. या विषयात तुमचे भारतीय समाजाविषयीचे आकलन व त्यासंबंधीच्या संकल्पना या दोघांचा विचार अपेक्षित आहे. यासाठी भारतीय समाजाची वैशिष्ट्ये व त्यात काळानुरूप होणारे बदल आपण समजून घ्यायला हवेत. केवळ पुस्तकी ज्ञान इथे अपेक्षित नसून तुम्ही आपल्या समाजाला कशाप्रकारे समजून घेता हे इथे महत्त्वाचे आहे.
भारतातील सामाजिक रचना, तिची विविधता आणि संबंधित समस्यांबद्दल उमेदवारांच्या समजुतीचे मूल्यांकन आयोगाद्वारे इथे केले जाते. यात समाजाची मुख्य वैशिष्ट्ये जसे की भारतीय समाजातील विविधता, महिलांची भूमिका, लोकसंख्येची गतिशीलता, दारिद्र्य व त्याचे परिणाम, शहरीकरण व शहरीकरणाचे परिणाम, जागतिकीकरणाचा भारतीय समाजावर प्रभाव, सामाजिक सक्षमीकरण, सांप्रदायिकता, प्रादेशिकवाद, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक समस्या यांचा समावेश होतो.
भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये
विविधता : धार्मिक, भाषिक, प्रादेशिक, आर्थिक, जाती-जमाती, सांस्कृतिक प्रथा आणि लिंग आधारित विविधता. या विविधतेतील बारकावे समजून घेणे आवश्यक आहे. तसेच विविधतेतील एकता हे आपल्या समाजाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
बहुवाद : भारतात आपण विविध श्रद्धा, जीवनशैली, आणि भाषांना स्वीकारतो व सहअस्तित्वास प्रोत्साहन देतो.
बहुसंस्कृतीवाद : भारतात आपण अनेक संस्कृतींच्या जतन आणि संवर्धनाला प्रोत्साहन देतो. प्रत्येक समुदायाला आपले सण साजरे करण्याची, परंपरा; कला आणि लोकजीवन जपण्याची आणि राष्ट्रीय ओळखीमध्ये स्वत:चा ठसा उमटवण्याची मुभा आहे.
भारतीय समाजातील महिलांची भूमिका : भारतीय समाजातील लिंग असमानता, महिला संघटना आणि महिला सक्षमीकरणासंबंधीची धोरणे यांचा अभ्यास. महिलांसंबंधी कार्यरत असणार्या संस्था व बिगर शासकीय संस्था (एनजीओ) यांचे कार्य.
लोकसंख्या : लोकसंख्या वाढ व नियंत्रण उपाय आणि लोकसंख्या लाभांश इथे महत्त्वाचे आहेत. भारतासारख्या देशासाठी लोकसंख्या लाभांश महत्त्वाची भूमिका बजावतो.
दारिद्र्य आणि विकास : दारिद्रयाची कारणे आणि प्रकार, गरिबी निर्मूलन कार्यक्रम व त्यांचे परिणाम.
शहरीकरण : ग्रामीण-शहरी स्थलांतर, झोपडपट्टी वाढ आणि गृहनिर्माण समस्या याबाबतचे विश्लेषण. जागतिकीकरण: सांस्कृतिक मूल्ये, परंपरा आणि जीवनशैलीवर त्याचा प्रभाव.
सामाजिक सक्षमीकरण : वंचित समुदायांचे सक्षमीकरण आणि सामाजिक न्यायासाठी कायदेशीर उपाय.
सामाजिक समस्या : जातीय भेदभाव, एलजीबीटीकयू समुदायाचे अधिकार आणि इतर समकालीन सामाजिक समस्या.
सामाजिक चळवळी : भक्ती आणि सुफी चळवळी, दलित आणि सुधारणा चळवळी व वर्तमानातील चळवळी.
भारतीय डायस्पोरा : परदेशात राहणार्या भारतीय समुदायाला आणि त्यांच्या प्रभावाला समजून घेणे.
जातीयवाद, प्रादेशिकवाद आणि धर्मनिरपेक्षता : जातीय हिंसाचाराची कारणे आणि परिणाम, प्रादेशिकवादाचा राजकीय आणि सामाजिक प्रभाव आणि भारतातील धर्मनिरपेक्षतेची संकल्पना.
२०२५ च्या मुख्य परीक्षेत आधुनिक भारतीय समाजाला समोर ठेवून पुढील प्रश्न विचारला आहे-
आधुनिक समाजात आरोग्याविषयी वाढत्या चिंता लक्षात घेता, फास्ट फूड उद्योगांच्या वाढीचे तुम्ही स्पष्टीकरण कसे द्याल? भारतीय अनुभवाच्या आधारे तुमच्या उत्तराचे स्पष्टीकरण द्या. (उत्तर २५० शब्दांत द्या)
आरोग्याविषयी वाढत्या चिंतांनंतरही फास्ट फूड उद्योगाचा होणारा विकास हा एक मोठा विरोधाभास दर्शवतो. आधुनिक समाज हा जीवनशैलीशी संबंधित आजारांबद्दल अधिक जागरूक होत असला, तरी फास्ट फूड क्षेत्र सातत्याने भरभराटीस येत आहे. अशा घटना प्रामुख्याने संरचनात्मक सामाजिक-आर्थिक बदल, कॉर्पोरेट क्षेत्राची धोरणात्मक अनुकूलता आणि ग्राहकांच्या बदलत्या मानसिकतेमुळे घडत आहे.
विकासाची कारणे : भारतीय अनुभव
सामाजिक-आर्थिक बदल आणि शहरीकरण : भारतातील जलद शहरीकरण आणि वाढत्या तरुण लोकसंख्येमुळे (डेमोग्राफिक डिव्हिडंड) नोकरदार वर्गाचा एक मोठा गट तयार झाला आहे. दोन्ही भागीदार कमावते असलेली कुटुंबे आणि व्यस्त दिनचर्या यांमुळे वेळेच्या कमतरतेपुढे आरोग्याच्या चिंता दुय्यम ठरतात. फास्ट फूड हे अत्यंत सोयीस्कर, जलद आणि परवडणारे असल्याने, शहरी मध्यमवर्गासाठी तो एक सहज पर्याय बनला आहे.
कॉर्पोरेट अनुकूलता आणि स्थानिक मेनू रचना : फास्ट फूड कंपन्यांनी ‘अस्वास्थ्यकर’ असा शिक्का पुसण्यासाठी स्वत:मध्ये हुशारीने बदल केले आहेत. भारतात, जागतिक कंपन्यांनी स्थानिक आवडीनुसार मेनूचे ‘भारतीयीकरण’ (उदा. मॅकआलू टिक्की) केले आहे. याशिवाय, त्यांनी होल-व्हीट रॅप्स, ग्रील्ड पर्याय आणि झिरो-शुगर पेये यांसारखे आरोग्यदायी पर्याय उपलब्ध करून दिले आहेत, ज्यामुळे आरोग्याविषयी जागरूक ग्राहकांना मानसिक समाधान मिळते.
डिजिटल क्रांती आणि सुलभ उपलब्धता : ‘झोमॅटो’ आणि ‘स्विगी’ सारख्या फूड-डिलिव्हरी ॲप्सचा वाढता प्रसार, भरघोस सवलती (डिस्काउंट्स) आणि आक्रमक जाहिरातींमुळे फास्ट फूड प्रत्येकाच्या आवाक्यात पोहोचले आहे. ‘डार्क किचन्स’ आणि क्विक-कॉमर्स मॉडेल्समुळे डिलिव्हरीचा वेळ अवघ्या काही मिनिटांवर आला आहे.
प्रिमियमिझेशन आणि हेल्थ वॉश : या उद्योगाने आरोग्याच्या वाढत्या ट्रेंडचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर करून ‘प्रिमियम हेल्थ’ सेगमेंट सुरू
केले आहे. कंपन्या आता ‘ऑरगॅनिक’, ‘हाय-प्रोटिन’ किंवा ‘मल्टीग्रेन’ अशा दाव्यांसह उत्पादनांचे मार्केटिंग करत आहेत, ज्यामुळे अन्नपदार्थ उच्च प्रक्रिया केलेले असूनही ग्राहक कोणतीही तमा न बाळगता त्याचे सेवन करतात.
निष्कर्ष
फास्ट फूड उद्योगाची सोय, आक्रमक विपणन (मार्केटिंग) आणि बदलता मेनू हे आरोग्याच्या अमूर्त चिंतांवर नेहमीच मात करतात. भारतात फास्ट फूड केवळ एक खाद्य नसून, वेगवान समाजाच्या गरजेनुसार तयार केलेला एक परवडणारा आणि सहज उपलब्ध असणारा जीवनशैलीचा भाग म्हणून सादर करून हा उद्योग सातत्याने प्रगती करत आहे.
वरील सर्व घटक हे आपणास वर्तमान संदर्भात अभ्यासायचे आहेत, हे लक्षात ठेवून अभ्यास करा.
sushilbari10@gmail.com
