डॉ. सुशील बारी
या लेखात आपण यूपीएससी मुख्य परीक्षेतील जीएस १ पेपर मधील ‘आधुनिक भारताचा इतिहास’ हा विषय समजून घेणार आहोत. यात अभ्यासक्रमाचा उद्देश म्हणजे उमेदवाराला भारताच्या ऐतिहासिक विकासाची समज किती? व कशी? आहे; तसेच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय शक्ती ज्यांनी त्यांना आकार दिला आहे, त्याचे मूल्यांकन उमेदवार कशाप्रकारे करतो ते पाहणे आवश्यक आहे. इथे केवळ पुस्तकी ज्ञान आवश्यक नसून इतिहासाचा विश्लेषणात्मक अभ्यास करणे आयोगाला अपेक्षित आहे. आयोगाने जीएस १ च्या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात खालील बाबींचा समावेश केला आहे –
आधुनिक भारताचा इतिहास (१८ व्या शतकाच्या मध्यापासून ते आजपर्यंत) महत्त्वाच्या घटना, व्यक्ती आणि मुद्दे.
स्वातंत्र्य लढा : टप्पे, महत्त्वाचे योगदानकर्ते आणि देशाच्या विविध भागांचे योगदान.
स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण आणि पुनर्रचना.
आधुनिक भारताच्या इतिहासात सामाजिक व धार्मिक सुधारणा यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यावर विचारलेला २०२५ च्या मुख्य परीक्षेतील प्रश्न व त्याचे अपेक्षित उत्तराचे मुद्दे बघूयात –
महात्मा जोतीराव फुले यांचे लेखन आणि समाजसुधारणेचे प्रयत्न यांनी जवळजवळ सर्वच शोषित (सबअल्टर्न) वर्गांच्या प्रश्नांना स्पर्श केला. चर्चा करा.
(२५० शब्दांत उत्तर द्या) १५
महात्मा जोतीराव फुले हे एक आद्य समाजसुधारक होते ज्यांची सामाजिक न्यायाची दृष्टी कोणत्याही एका मुद्द्यापुरती मर्यादित नव्हती. आपल्या साहित्यातून आणि प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी महिला, शोषित-वंचित जाती, शेतकरी आणि कामगार वर्ग अशा प्रत्येक शोषित घटकाच्या पद्धतशीर शोषणाला वाचा फोडली. महिला मुक्ती व सक्षमीकरण महात्मा फुले यांनी स्त्री-शोषणाला पितृसत्ताक आणि जातिव्यवस्थेशी जोडलेले मानले:
शिक्षण व अधिकार : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या साथीने १८४८ मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यांनी शिक्षणाला मुक्तीचे मुख्य साधन मानले.
विधवांसाठी कार्य : गरोदर विधवा आणि अनाथ बालकांसाठी ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ स्थापन केले आणि विधवा पुनर्विवाहाला सक्रिय पाठिंबा दिला.
अस्पृश्यता निवारण
महात्मा फुले यांनी समाजातील विशिष्ट समाजाचे वर्चस्व आणि विषम जातिव्यवस्थेला थेट आव्हान दिले:
साहित्यिक योगदान : ‘गुलामगिरी’ आणि ‘तृतीय रत्न’ यांसारख्या साहित्यातून त्यांनी शोषित जातींच्या शोषणाची मीमांसा केली आणि त्याची तुलना अमेरिकेतील कृष्णवर्गीयांच्या गुलामगिरीशी केली.
सत्यशोधक समाज
(१८७३) : पौरोहित्याशिवाय विवाह व इतर विधी करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तसेच अस्पृश्य समाजासाठी स्वत:चा पाण्याचा हौद खुला करून मानवी प्रतिष्ठा आणि समान हक्कांचा आग्रह धरला.
शेतकर्यांचे प्रश्न आणि लढा
शेतकर्यांच्या दुर्दैवाची आणि शोषणाची मांडणी करणार्या आद्य विचारवंतांमध्ये फुले यांचा समावेश होतो.
शोषणावर प्रहार : ‘शेतकर्याचा असूड’ या ग्रंथात त्यांनी ब्रिटिश करप्रणाली, सावकार आणि नोकरशाहीच्या भ्रष्टाचारामुळे शेतकरी कसा उद्ध्वस्त झाला, याचे वास्तववादी वर्णन केले.
सुधारणांची मागणी : त्यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञान, सिंचन प्रकल्प आणि शेतमालाला योग्य भाव देण्याची जोरदार मागणी केली.
कामगार वर्गाचे कैवारी
उदयोन्मुख औद्योगिक कामगार वर्गाचे प्रश्न ओळखून त्यांनी कामगारांनाही आपला पाठिंबा दिला:
कामगार हक्क : गिरणी कामगारांना संघटित करण्यासाठी आपले सहकारी नारायण मेघाजी लोखंडे यांना पूर्ण सहकार्य केले, ज्यातून भारतातील कामगार चळवळीची पायाभरणी झाली.
निष्कर्ष
माहिती आणि समाजसुधारणेचे महात्मा फुलेंचे मॉडेल हे सर्वांगीण होते. त्यांनी जात, लिंग, शेती आणि कामगार शोषणाला संरचनात्मक विषमतेच्या एकाच धाग्यात बांधून त्याचा विरोध केला. त्यांच्या या वैचारिक दृष्टिकोनाने भारतातील आधुनिक सामाजिक न्याय चळवळींची पायाभरणी केली.
यूपीएससी मुख्य परीक्षेसाठी आधुनिक भारताचा इतिहास घटनांचे केवळ पाठांतर न करता विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून समजून घेणे आवश्यक आहे. अभ्यासाची सुरुवात मुघल साम्राज्याच्या र्हासापासून स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतचा कालक्रम स्पष्टपणे समजून घेण्यापासून करा. त्यानंतर ब्रिटिश सत्तेचा विस्तार, प्रशासकीय व आर्थिक धोरणे, सामाजिक-धार्मिक सुधारणा चळवळी, १८५७चा उठाव, घटनात्मक विकास, स्वातंत्र्यलढा, गांधीवादी चळवळी, क्रांतिकारी राष्ट्रवाद, शेतकरी व आदिवासी उठाव आणि फाळणी अशा विषयनिहाय अभ्यासाचे नियोजन करा. स्पष्ट कालानुक्रमामुळे घटना, त्यांची कारणे आणि परिणाम यांचा परस्परसंबंध समजून घेणे सोपे जाते. प्रत्येक विषयाचा अभ्यास करताना घटना का घडली?, ती कशी विकसित झाली? आणि तिचे दीर्घकालीन परिणाम काय झाले? यावर भर द्या. प्रत्येक विषयासाठी पार्श्वभूमी, कारणे, वैशिष्ट्ये, प्रमुख नेतृत्त्व, महत्त्व, टीका आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदान या उपशीर्षकांखाली संक्षिप्त नोंदी तयार करा. उत्तर अधिक विश्लेषणात्मक करण्यासाठी बिपन चंद्र, सुमित सरकार आणि शेखर बंद्योपाध्याय यांसारख्या इतिहासकारांचे विचार योग्य ठिकाणी समाविष्ट करा. स्पॉटलाईट प्रकाशनचे ‘जीएस १ झ्र् मेन्स बुस्टर सिरिज’ यासाठी तुम्हाला उपयोगी ठरेल.
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित उत्तरलेखनाचा नियमित सराव करा. प्रत्येक उत्तराची रचना प्रभावी प्रस्तावना, सुसंगत मुख्य भाग आणि संतुलित निष्कर्ष अशा स्वरूपात असावी. उत्तर अधिक आकर्षक व गुणप्राप्तीसाठी उपयुक्त करण्यासाठी कालानुक्रम, फ्लोचार्टस्, नकाशे यांचा योग्य वापर करा. आवश्यक त्या ठिकाणी महत्त्वाचे कायदे, समित्या आणि घटनात्मक घडामोडींचा संदर्भ द्या.
अनेक वेळा पुनरावृत्ती करण्यासाठी विस्तृत पुस्तकांऐवजी स्वत:च्या संक्षिप्त नोंदींचा वापर करा. महत्त्वाच्या व्यक्ती, कायदे, काँग्रेस अधिवेशने, आयोग, वर्तमानपत्रे, संस्था आणि ऐतिहासिक घटनांसाठी स्वतंत्र नोट्स तयार असाव्यात. शेवटी, आधुनिक भारताचा इतिहास हा राज्यशास्त्र, समाजशास्त्र, नीतिशास्त्र आणि निबंध या विषयांशी जोडून अभ्यास करा. असा आंतरविषयक दृष्टिकोन यूपीएससी मुख्य परीक्षेत उच्च गुण मिळविण्यास अत्यंत उपयुक्त ठरतो.
sushilbari10@gmail.com
