२०२६ च्या यूपीएससी मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषय ‘वैद्यकीय विज्ञान’ या पेपरचे विश्लेषण आपण या लेखात बघणार आहोत.

पेपर १ तथ्यात्मक स्मरण आणि विश्लेषणात्मक व उपयोजित ज्ञानाचा समतोल साधतो. क्लिनिकल विगनेट्स, कार्यपद्धतीवर आधारित प्रश्न, प्रयोगशाळा निदान आणि उपचारात्मक निर्देश हा या पेपरचा एक महत्त्वाचा भाग आहे. पेपर २ मध्ये क्लिनिकल समस्या निवारण, पुराव्यावर आधारित व्यवस्थापन, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम मार्गदर्शक तत्त्वे आणि कायदेशीर-वैद्यकीय जागरूकतेवर भर दिला गेला. या दोन्ही पेपरचे विश्लेषण बघूया –

वैद्यकीय विज्ञान वैकल्पिक विषय पेपर १

पेपर १ हा उमेदवारांचे संकल्पनात्मक आकलन, क्लिनिकल उपयोजन तसेच ॲनाटॉमी (शारीरिक रचनाशास्त्र), फिजिओलॉजी (शरीरक्रियाशास्त्र), बायोकेमिस्ट्री (जैवरासायनिक शास्त्र), पॅथॉलॉजी (विकृतीशास्त्र), फार्माकॉलॉजी (औषधनिर्माणशास्त्र), मायक्रोबायॉलॉजी (सूक्ष्मजीवशास्त्र) आणि फॉरेन्सिक मेडिसिन (न्यायवैद्यकशास्त्र) यांचे एकात्मीकरण तपासतो.

विभाग ‘अ’ हा ॲनाटॉमी, फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्रीवर लक्ष केंद्रित करतो; ज्यामध्ये हिप जॉइंटची स्थिरता, डायफ्रामॅटिक पॅरालिसिस, ब्रेकियल प्लेक्ससची दुखापत, ओव्हेरियन टॉर्शन, व्हिज्युअल पाथवेच्या विकृती, कार्डियाक आउटपुट, रीनल फंक्शन टेस्ट्स आणि हार्मोनल प्रक्रिया यांसारख्या क्लिनिकल दृष्टिकोनातून विचारलेल्या प्रश्नांचा समावेश आहे. आण्विक जीवशास्त्र विषयांमध्ये जेनेटिक कोड, पोस्ट-ट्रान्सलेशनल मॉडिफिकेशन्स आणि पीसीआर उपयोजन यांचा समावेश आहे. क्लिनिकल केसवर आधारित प्रश्नांमध्ये उमेदवारांनी ॲनाटॉमिकल व फिजिओलॉजिकल तत्त्वांचा संबंध रुग्णाच्या लक्षणांशी जोडणे आवश्यक असते.

विभाग ‘ब’ मध्ये फार्माकॉलॉजी, पॅथॉलॉजी, मायक्रोबायॉलॉजी, वैद्यकीय संकल्पना आणि फॉरेन्सिक मेडिसिन यांचा समावेश होतो. महत्त्वाच्या विषयांमध्ये मेथोट्रेक्झेट, फ्युरोसेमाइड, मेटफॉर्मिन, ॲंटिमायक्रोबियल रेझिस्टन्स, ॲक्युट इन्फ्लेमेशन, क्षयरोग, ल्युकेमिया, भाजणे, बुरशीजन्य संसर्ग, मलेरिया, डेंग्यू आणि गुंतागुंतीचा प्लाझमोडियम फाल्सीपॅरम संसर्ग यांचा समावेश आहे. फॉरेन्सिकमधील प्रश्न भारतीय न्याय संहितेअंतर्गत दुखापती, ओळख पटवणे आणि ॲटिपिकल ड्राउनिंग यांवर आधारित आहेत.

आयोगाद्वारे विचारलेले प्रश्न

* तीव्र लिम्फोब्लास्टिक ल्युकेमियाचे प्रयोगशालेय निदान आणि इम्युनोफेनोटाइपिक वर्गीकरण वर्णन करा. १०

* दुय्यम क्षयरोगाच्या रोगनिर्मिती प्रक्रियेचे वर्णन करा. एड्स मधील क्षयरोगाची सूक्ष्मदर्शकाखालील पाच वैशिष्ट्ये सांगा. १०

* चेताविषारी (न्यूरोटॉक्सिक) विषांचे वर्गीकरण करा. ‘ओपिएट्स’मुळे होणार्‍या तीव्र विषबाधेची नैदानिक वैशिष्ट्ये, उपचार आणि शवविच्छेदन निष्कर्ष यांवर थोडक्यात चर्चा करा. १०         

हा पेपर संकल्पनात्मक स्पष्टता, क्लिनिकल तर्कशुद्धता, अचूक परिभाषा आणि संरचित उत्तरांना महत्त्व देतो. सर्व प्रमुख विषयांची केंद्रित उजळणी आणि वेळेचे नियोजन करून केलेला उत्तरलेखनाचा सराव यामुळे वैद्यकीय विज्ञान वैकल्पिक

विषय पेपर १ मधील कामगिरी सुधारू शकते.

वैद्यकीय विज्ञान वैकल्पिक विषय पेपर २ 

हा पेपर क्लिनिकल उपयोजन, निदानाची अचूकता आणि भारतीय आरोग्य सेवा कार्यक्रमांच्या व्यावहारिक ज्ञानाला महत्त्व देतो.

विभाग अ प्रामुख्याने जनरल मेडिसिन, पेडियाट्रिक्स (बालरोगशास्त्र), डर्मेटोलॉजी (त्वचारोगशास्त्र) आणि समुदायासाठीच्या क्लिनिकल प्रॅक्टिसचा समावेश करतो. महत्त्वाच्या विषयांमध्ये क्षयरोगासाठी थुंकीवर आधारित निदान चाचण्या, कुत्रा चावल्यावरील व्यवस्थापन, नवजात आणि बालपणीच्या आजारांचे एकात्मिक व्यवस्थापन, नवजात बालकांमधील हायपरबिलिरुबिनेमिया, तीव्र कुपोषण, ब्रोन्कियल अस्थमा, नवजात सायनोसिस, हिपॅटायटीस- सी आणि मधुमेहाशी संबंधित सूक्ष्मवाहिन्यांसंबंधी गुंतागुंत यांचा समावेश आहे. डर्मेटोलॉजीमधील प्रश्न पॅप्युलोस्क्वॅमस विकार, सोरायसिस, लायकेन प्लॅनस, एक्झिमा आणि कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस यांचे परीक्षण करतात. अनेक प्रश्नांमध्ये पद्धतशीर क्लिनिकल मूल्यांकन, विभेदक निदान, तपासण्या आणि उपचारांची आवश्यकता असते.

विभाग ब हा शस्त्रक्रिया, प्रसूती आणि स्त्रीरोगशास्त्र, सार्वजनिक आरोग्य आणि संबंधित क्लिनिकल विषयांशी संबंधित बाबींवर केंद्रित आहे. महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये लोअर गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ब्लीडिंग, हायडॅटिड सिस्ट, प्लेसेंटाच्या विकृती, प्रायमरी ॲमेनोरिया, आरोग्य सेवा कचरा विल्हेवाट, गॅस्ट्रो-एसोफेजियल रिफ्लक्स डिसीज, एचआयव्ही पोस्ट-एक्सपोजर प्रोफिलेक्सिस, एक्यूट पॅनक्रियाटायटिस, पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम आणि कोलोनचा कर्करोग यांचा समावेश आहे. सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा, टीबी निर्मूलनासाठी राष्ट्रीय धोरणात्मक योजना आणि प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान यांसारख्या विषयांवरील प्रश्नांद्वारे सार्वजनिक आरोग्यावर लक्षणीय भर दिला गेला आहे.

आयोगाद्वारे विचारलेला प्रश्न

० तीव्र, उपतीव्र आणि दीर्घकालीन एक्झिमाची नैदानिक आणि ऊतकवैज्ञानिक वैशिष्ट्ये वर्णन करा.

० एअरबोर्न कॉन्टॅक्ट डर्माटायटिस म्हणजे काय? त्याची कारणमीमांसा आणि नैदानिक वैशिष्ट्यांवर चर्चा करा. ५+ ५=१०

* ४० वर्षीय पुरुषांमधील ‘गॅस्ट्रो-इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज’ ची क्लिनिकल लक्षणे, आवश्यक तपासण्या आणि उपचार पद्धती यांचे वर्णन करा.

५ + ५+ ५=१५

* ‘प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियाना’चे क्षयरोग दूर करण्यासाठीचे महत्त्व स्पष्ट करा. १०

उमेदवारांनी प्रमाणित क्लिनिकल प्रोटोकॉल, डायग्नोस्टिक अल्गोरिदम, आपत्कालीन व्यवस्थापन, विभेदक निदान आणि उपचार मार्गदर्शक तत्त्वांना प्राधान्य दिले पाहिजे.

केस-आधारित प्रश्न, फ्लोचार्ट आणि संरचित उत्तरांचा सराव केल्याने वेळेचे व्यवस्थापन आणि सादरीकरण सुधारेल. अनेक प्रश्नांमध्ये स्पष्टपणे आकृत्या काढण्याची आवश्यकता नमूद केली आहे, ज्यामुळे सादरीकरण हा गुण मिळवण्याचा एक महत्त्वाचा घटक ठरतो. दीर्घ क्लिनिकल केस स्टडीजसाठी लक्षणीय गुण असतात, ज्यासाठी सर्वसमावेशक आणि सुव्यवस्थित उत्तरांची आवश्यकता असते.

उमेदवारांनी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करावा, कार्यपद्धती, निदान निकष, औषधांचे उपयोग आणि दुष्परिणाम यांवर संक्षिप्त टिप्पण्या तयार कराव्यात, तसेच नामनिर्देशित आकृत्या आणि फ्लोचार्ट्स यांचा  नियमित सराव करायला हवा. क्लिनिकल केस स्टडीज सोडवताना निदान, पॅथोजेनेसिस (रोगनिर्मिती प्रक्रिया), तपासण्या आणि गुंतागुंत अशा पद्धतशीर मांडणीचा अवलंब केला पाहिजे.

sushilbari10@gmail.com