सागर भस्मे मागील लेखातून आपण पर्यावरणीय समस्यांविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण संपूर्ण जगासमोर उभी राहिलेली अतिशय गंभीर समस्या म्हणजे हवामानात होणारा बदल व जागतिक तापमानवाढ याविषयी जाणून घेऊ. पृथ्वीचे हवामान तसे स्थिर नाही. पृथ्वीच्या अस्तित्वाच्या अब्जावधी वर्षांमध्ये सूर्यप्रकाश, हिमयुगातील हिमनग इत्यादीसारख्या नैसर्गिक कारणांमुळे अनेक वेळा बदल झाला आहे. 'हवामान बदल' म्हणजे जागतिक वातावरणाची रचना तुलनात्मक कालावधीत आढळणाऱ्या नैसर्गिक हवामानातील परिवर्तनशीलतेव्यतिरिक्त मोठ्या बदलाशी संबंधित आहे; ज्याचे श्रेय प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मानवी क्रियाकलापांना दिले जाते. तथापि, आज जेव्हा लोक ‘हवामान बदला’बद्दल बोलतात, तेव्हा त्याचा अर्थ गेल्या १०० वर्षांतील हवामानातील बदल; जे प्रामुख्याने मानवी क्रियाकलापांमुळे झाले आहेत, असा होतो. हेही वाचा - UPSC-MPSC : पर्यावरणीय समस्या म्हणजे काय? त्याची मुख्य कारणे कोणती? ‘हवामान बदल’ हा वाक्यांश दीर्घकालीन हवामानाच्या नमुन्यांमधील बदल दर्शवतो. हवामानातील बदल म्हणजे एखाद्या विशिष्ट दिवसातील हवामानातील बदल नव्हे; हा दीर्घकालीन हवामान पद्धतीचा एकत्रित बदल आहे. मानव मोठ्या प्रमाणात जीवाश्म इंधन (कोळसा, तेल, नैसर्गिक वायू) जाळून हवामान बदल घडवत आहे. हरितगृह परिणाम (Greenhouse Effect) : सर्वप्रथम हरितगृह परिणाम म्हणजे नेमके काय हे समजावून घेणे गरजेचे आहे. ग्रीनहाऊस इफेक्ट ही नैसर्गिकरीत्या घडणारी घटना आहे; जी पृथ्वीच्या खालच्या वातावरणाला उबदार करून सजीवांना जगण्यासाठी योग्य तापमान राखते. ज्याप्रमाणे हरितगृह खोलीत हवा गरम ठेवते, त्याचप्रमाणे पाण्याची वाफ आणि हरितगृह वायू पृथ्वीला उबदार ठेवतात. हरितगृह वायू पृथ्वीच्या थंड आणि तापमानवाढीच्या समतोलात महत्त्वाची भूमिका बजावतात. एका अंदाजानुसार नैसर्गिकरीत्या उदभवणाऱ्या हरितगृह परिणामाच्या अनुपस्थितीत, पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान सध्याच्या १५° सें.ऐवजी -१९° सें.असेल आणि पृथ्वी एक गोठलेला निर्जीव ग्रह असेल, असे सांगितले जाते. हरितगृह परिणाम प्रक्रिया पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान वाढविण्यात आणि ती राहण्यायोग्य बनविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. तथापि, मानवनिर्मित हरितगृह वायुउत्सर्जन नैसर्गिक समतोल बिघडवते आणि वाढीव उष्णता निर्माण करते. त्यामुळेच जागतिक तापमानवाढीची समस्या उदभवत आहे. हरितगृह वायू (Greenhouse Gases) – १) मिथेन (CH4)२) कार्बन डाय-ऑक्साईड (CO2)३) कार्बन मोनॉक्साईड (CO)४) क्लोरोफ्लुरोकार्बन्स (CFC)५) ट्रायफ्लुरो-मिथाईल सल्फर-पेंटाफ्लोराईड६) नायट्रस ऑक्साईड (N2O)७) फ्लोरिनेटेड वायू (HFCs, PFCs, SF6)८) वातावरणाच्या खालच्या (तपांबर) थरातील ओझोन (O3)९) ब्लॅक कार्बन / काजळी (Soot)१०) बाष्प (Water Vapour ) जागतिक तापमानवाढ (Global Warming) : गेल्या १०० वर्षांत आणि विशेषत: गेल्या दोन दशकांत पृथ्वी अभूतपूर्व वेगाने उष्ण झाली आहे. २०१६ हे जगभरातील रेकॉर्डवरील सर्वांत उष्ण वर्ष होते. जंगलातील आग, उष्णतेच्या लाटा व तीव्र उष्णकटिबंधीय वादळ यांसारख्या हवामानाच्या घटनांच्या प्रमाणात वाढ होण्याचे कारण तापमानवाढ आहे. 'ग्लोबल वॉर्मिंग' म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ आणि तपांबरमधील वातावरणाच्या तापमानात सरासरी वाढ होय. जागतिक तापमानवाढ नैसर्गिक आणि मानवी अशा दोन्ही कारणांमुळे होऊ शकते. जागतिक तापमानवाढीमुळे अनेक गंभीर पर्यावरणविषयक समस्या निर्माण झालेल्या आहेत. हेही वाचा - UPSC-MPSC : भूस्खलन आणि हिमस्खलनाची नेमकी कारणे कोणती? भारतातील कोणत्या भागात सर्वाधिक घटना घडतात? जागतिक तापमानवाढीचे परिणाम पुढीलप्रमाणे : १) भूभागावरील परिणाम – बर्फ नैसर्गिक गतीपेक्षा जास्त प्रमाणात वितळतो.वाळवंटीकरण होण्याची शक्यता असतेमृदेतील आर्द्रतेचा समतोल बिघडतो.जास्त तापमानामुळे बाष्पीभवन आणि वनस्पतीमधील बाष्पोत्सर्जनाचा (Transpiration) दर वाढून मृदा शुष्क बनते. २) वातावरणावरील परिणाम- एल निनो (El-Nino) परिणामाच्या वारंवारतेत वाढ आणि त्याचा मान्सूनवर प्रतिकूल परिणाम होतो.उष्ण कटिबंधीय वादळांची वारंवारता वाढते.वार्षिक पावसाच्या प्रमाणात बदल होतो.पूर, दुष्काळ, उष्णतेची लाट यांसारख्या संकटांमध्ये वाढ होते. ३) समुद्रावर होणारा परिणाम – समुद्राच्या पातळीत वाढ होऊन किनारी प्रदेश पाण्याखाली जाण्याची शक्यता असते.नद्या, उपसागराच्या क्षारतेमध्ये वाढ होऊ शकते.तापमानवाढीमुळे प्लवंग नष्ट होते.प्रवाळ परिसंस्था नाश पावते. ४) मानवांवर होणारा परिणाम- रोगांचा जसे की मलेरिया इ. यांचा प्रसार होण्याची शक्यता असते.तीव्र आणि जास्त काळासाठी असणाऱ्या उष्मालहरींमुळे उष्माघात होण्याची शक्यता वाढते. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक संस्था कार्य करीत आहेत. उदाहरणार्थ, इंटरगव्हर्न्मेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (IPCC), वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड (WWF), संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP/United Nations Environment Programme), निसर्ग आणि नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय संघटना (International Union for Conservation of Nature & Natural Resources / IUCN) इ.