सागर भस्मे मागील लेखातून आपण विमा क्षेत्रामधील भारतीय साधारण विमा निगम आणि भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण या प्राधिकरणांचा अभ्यास केला. या लेखातून आपण विमा क्षेत्रामध्ये धोरणात्मक उपाययोजना करण्याकरिता राबविण्यात आलेल्या महत्त्वाच्या योजनांबाबत जाणून घेऊ. त्यामध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना इत्यादी योजनांचा अभ्यास करू. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY- Pradhan Mantri Suraksha Bima Yojana) आपल्या देशात सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्ती ही विमा काढू शकण्याइतपत आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. अशा व्यक्तीचा एखाद्या अपघातामध्ये मृत्यू झाल्यास, त्या व्यक्तीच्या कुटुंबावर खूप मोठे आर्थिक संकट उदभवू शकते. अशी प्रत्येक व्यक्ती विमा संरक्षणाचा लाभ घेऊ शकेल या दृष्टिकोनातून या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची घोषणा वित्तमंत्री अरुण जेटली यांनी २०१५-१६ च्या अर्थसंकल्पामध्ये केली होती. या योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे ८ मे २०१५ रोजी करण्यात आली होती. हेही वाचा - UPSC-MPSC : भारतातील विमा उद्योगाचे नियमन करणारी ‘आयआरडीएआय’ ही संस्था काय आहे? ती का सुरू करण्यात आली? या योजनेची वैशिष्ट्ये व स्वरूप : योजनेंतर्गत १८ ते ७० वर्षे वयोगटातील प्रत्येक व्यक्ती या योजनेकरिता पात्र असते; परंतु त्याचे बँकेमध्ये खाते असणे गरजेचे असते.या योजनेकरिता वार्षिक १२ रुपये एवढा हप्ता असून, तो दरवर्षी त्याच्या बँक खात्यामधून आपोआप वर्ग केला जातो. या योजनेचा कालावधी १ जून ते ३० मे, असा आहे. म्हणजेच याद्वारे लाभार्थींना दरवर्षी नूतनीकरण करावे लागणारे विमा संरक्षण पुरविण्यात येते.योजनाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपयांचे आर्थिक साह्य़ त्या व्यक्तीच्या वारसदारांना प्राप्त होते. तसेच त्याला अपघातामुळे कायमस्वरूपी अपंगत्व आले असल्यासही दोन लाख रुपयांचे अर्थसाह्य प्राप्त होते आणि अंशतः अपंगत्व आल्यास एक लाख रुपयांचे अर्थसाह्य लाभार्थ्यांना प्राप्त होते. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY- Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojna) प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही योजनासुद्धा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेप्रमाणेच अशा गरीब लोकांना विमा संरक्षण पुरविते; जे आर्थिक अडचणीमुळे मोठ्या खासगी कंपन्यांकडून विमा काढू शकत नाहीत. देशातील अशा प्रत्येक व्यक्तीपर्यंत जीवन विम्याचा लाभ पोहोचविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ९ मे २०१५ रोजी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सुरू केली होती. योजनेचे स्वरूप व वैशिष्ट्ये : या योजनेंतर्गत १८ ते ५० वर्षे या वयोगटातील प्रत्येक व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते.योजनेंतर्गत विमा संरक्षण हे एक वर्ष मुदतीचे असून, त्याकरिता प्रत्येक वर्षी या विम्याचे नूतनीकरण करावे लागते.या योजनेंतर्गत विमा संरक्षित कालावधीदरम्यान विमाधारकाचा कोणत्याही कारणास्तव मृत्यू झाल्यानंतरच दोन लाख रुपयांची रक्कम त्याच्या कुटुंबीयांना प्राप्त होते.त्याकरिता ३३० रुपये प्रतिवर्ष इतका विम्याचा प्रीमियम आहे. ही रक्कम विमाधारकांच्या बँक खात्यामधून परस्पर वर्ग केली जाते.ही योजना वयाच्या ५५ व्या वर्षापर्यंत विमा संरक्षण देते. राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना (NHPS- National Health Protection Scheme) भारतामधील सर्वसामान्य लोकांना सुलभ आणि परवडणारी आरोग्य सेवा पुरविण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना ही केंद्र सरकारपुरस्कृत योजना आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या 'आयुष्यमान भारत मिशन'अंतर्गत २३ सप्टेंबर २०१८ मध्ये ही योजना सुरू करण्यात आली. हेही वाचा - UPSC-MPSC : सामाजिक शेअर बाजार म्हणजे काय? ते सुरू करण्यामागे नेमका उद्देश काय? योजनेचे स्वरूप व वैशिष्ट्ये : या योजनेंतर्गत ५० कोटींपेक्षा जास्त लोकांना म्हणजेच जवळपास १० कोटी गरीब आणि असुरक्षित कुटुंबांना विमा संरक्षण पुरविण्यात येते.या योजनेकरिता पात्र असणार्या प्रत्येक कुटुंबाकरिता पाच लाख रुपये विमा संरक्षण उपलब्ध आहे. म्हणजेच या योजनेंतर्गत येणाऱ्या लाभार्थीला देशभरातील कोणत्याही सार्वजनिक किंवा खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दरवर्षी पाच लाख रुपयांचे संरक्षण त्यांना या योजनेमार्फत देण्यात येते.या योजनेंतर्गत लाभार्थींसाठी सेवेच्या ठिकाणी कॅशलेस व पेपरलेस सेवा प्रदान करण्यात येते.