सागर भस्मे मागील लेखातून आपण भारतीय भांडवली बाजारामध्ये महत्त्वाची भूमिका असणारा घटक म्हणजेच परकीय आर्थिक गुंतवणूक या विषयी माहिती घेतली. या लेखातून आपण एंजल गुंतवणूकदार म्हणजे कोण? परकीय पात्र गुंतवणूकदार कोणाला म्हणायचे? याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊया. एंजल गुंतवणूकदार म्हणजे असा गुंतवणूकदार जो व्यवसाय सुरू करण्याकरिता उद्योजकांना आर्थिक सहाय्य पुरवितो. एंजल गुंतवणूकदार या संकल्पनेत सर्वसाधारणपणे उद्योजकांचे कुटुंब आणि मित्रमंडळातील गुंतवणूकदार आढळून येतात. परंतु, काही वेळेस ही व्यक्ती बाहेरचीसुद्धा असू शकते. एंजल गुंतवणूकदार हा उद्योजकाला एकदाच उद्योग स्थापन करण्याकरिता मदत करतो किंवा वेळोवेळी जेव्हा उद्योजकाला अडचणीचा सामना करावा लागत असेल, त्याकाळीसुद्धा मदत करू शकतो. या मदतीच्या बदल्यात गुंतवणूकदार कंपनीचे शेअर्स घेऊ शकतो किंवा हे भांडवल कर्जाच्या स्वरूपामध्येसुद्धा देऊ शकतो. परंतु, हे कर्ज साधारण कर्जाप्रमाणे नसून सामान्य कर्जांपेक्षा सौम्य असतात. कारण हे कर्ज नफा या उद्देशाने दिलेले नसून ते आपल्या संबंधित व्यक्तीच्या हिताकरिता, तसेच व्यवसायाच्या व्यवहार्यतेपेक्षा त्या व्यक्तीकडे बघून ही गुंतवणूक करण्यात आलेली असते. हेही वाचा - UPSC-MPSC : परकीय आर्थिक गुंतवणूक म्हणजे काय? एंजल गुंतवणूकदार या भारतीय वित्त बाजारांमधील नवीन संज्ञेची ओळख सन २०१३-१४ च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये करून देण्यात आली. या अर्थसंकल्पामध्ये अशी घोषणा करण्यात आली की, ''सेबी लवकरच काही तरतुदींची घोषणा करेल, ज्यांच्या आधारे एंजल गुंतवणूकदारांना पर्यायी गुंतवणूक असे ओळखण्यात येईल. असा पर्यायी गुंतवणूक निधी, ज्याचा अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होतो आणि यासाठी सेबी किंवा भारत सरकार किंवा भारतामधील इतर कोणत्याही नियामक संस्थेमार्फत विशिष्ट प्रोत्साहन भत्ता किंवा सवलत देण्याचा विचार केला जाऊ शकतो.'' एंजल गुंतवणूकदार हे त्यांच्या गुंतवणुकीचा मोठा मोबदला मिळवण्यापेक्षा व्यवसाय कसा यशस्वी होईल, यावर लक्ष केंद्रित करतात. एंजल गुंतवणूकदार व व्हेंचर कॅपिटॅलिस्ट यांचा हेतू हा परस्पर विरुद्ध असतो. म्हणजेच व्हेंचर कॅपिटॅलिस्टचा भर हा मोठा नफा कमवण्यावर असतो. परंतु, तसा एंजल गुंतवणूकदाराचा हेतू नसतो. पण, एंजल गुंतवणूकदार आणि व्हेंचर गुंतवणूकदार या दोघांमुळे उद्योजकाचा एक समान हेतू साध्य होतो, तो म्हणजे गुंतवणूक योग्य भांडवलाची अत्यंत तातडीची गरज भागविली जाते. पात्र परकीय गुंतवणूकदार कोणाला म्हणायचे? : पात्र परकीय गुंतवणूकदार ही परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदाराची एक उपश्रेणी आहे. पात्र परकीय गुंतवणूकदारांमध्ये कोणताही परदेशी व्यक्तीगट किंवा संघटना किंवा फायनान्शिअल ॲक्शन टास्क फोर्सचे सदस्य असलेल्या देशातील रहिवासी यांचा समावेश होतो. यामध्ये फायनान्शिअल ॲक्शन टास्क फोर्स गटाचा सदस्य असलेला देश तसेच आंतरराष्ट्रीय सुरक्षा आयोगाच्या बहुपक्षीय मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंगवर स्वाक्षरी करणारा देशदेखील समाविष्ट आहे. पात्र परकीय गुंतवणूकदार या संकल्पनेची घोषणा रिझर्व्ह बँक आणि सेबी यांच्या सहकार्याने भारत सरकारद्वारे २०११ च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली. या अर्थसंकल्पाद्वारे भारत सरकारने पहिल्यांदाच केवायसी निकषांची पूर्तता करणाऱ्या पात्र परकीय गुंतवणूकदारांना भारतीय फंडामध्ये थेट गुंतवणूक करण्याची परवानगी दिली. पात्र परकीय गुंतवणूकदाराला थेट गुंतवणूक करण्याची परवानगी देण्याचे उद्दिष्ट भारतीय भांडवली बाजारामध्ये अधिकाअधिक परकीय निधी गुंतविणे तसेच भारतामध्ये अस्थिरता कमी करणे हे आहे. याचे कारण म्हणजे व्यक्तींना संस्थात्मक गुंतवणूकदारांपेक्षा दीर्घकालीन गुंतवणूकदार अधिक सोयीस्कर तसेच सुरक्षित वाटतात. पुढे योजनेचा आणखी विस्तार करण्याकरिता २०१२ मध्ये सरकारने पात्र परकीय गुंतवणूकदारांना भारतीय समभाग बाजारांमध्येसुद्धा थेट गुंतवणूक करण्याची परवानगी दिली. हेही वाचा - UPSC-MPSC : डिमॅट खाते म्हणजे काय? ते कसे कार्य करते? पात्र परकीय गुंतवणुकीचे फायदे : पात्र परकीय गुंतवणूकदारांद्वारे शेअर बाजारामध्ये प्रवेश केल्याने बाजाराचा विस्तार होऊन भारतामध्ये भांडवलाचा ओघ वाढेल, असा अंदाज होता.पात्र परकीय गुंतवणूकदार हा गुंतवणूकदारांचा असा एक वैविध्यपूर्ण गट असल्यामुळे त्यांच्या सहभागामुळे परकीय संस्थात्मक गुंतवणूकदाराच्या अचानक आलेल्या प्रवाहामुळे होणारी भारतीय शेअर बाजारांमधील अस्थिरता कमी होण्यास मदत होते.पार्टीसिपेटरी नोट्स वापरण्याची आवश्यकता दूर करण्याबरोबरच ते पारदर्शकता सुधारण्यासदेखील मदत करते.पात्र परकीय गुंतवणूकदाराने शेअर बाजारामध्ये प्रवेश केल्याने अनेक क्षेत्रांमध्ये न वापरलेली गुंतवणूक क्षमतासुद्धा कार्यरत होण्यामध्ये मदत होणे अपेक्षित आहे.