सागर देवेंद्र भस्मे मागील लेखातून आपण हिमालय पर्वत निर्मिती आणि विस्तार याबाबत माहिती घेतली. या लेखामधून आपण हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या, त्यांची निर्मिती आणि विस्तार याबाबत माहिती जाणून घेऊ या. हिमालय पर्वतरांगांमध्ये भारतातील अनेक महत्त्वाच्या नद्यांची उगमस्थानं आहेत. या नद्या पूर्वप्रस्थापित स्वरूपाच्या व हिमालयापेक्षाही जुन्या आहेत. कारण हिमालयाची निर्मिती ज्या वेळी अतिशय मंदगतीने होत होती, त्या वेळी हिमालयातील नद्यांनी त्यांच्या पात्राचे शरण करून आपला प्रवाह मार्ग कायम राखला आणि त्यामुळे हिमालयात खोल गळ्याची निर्मिती झाली. हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांचे वर्गीकरण प्रामुख्याने दोन गटांत केले जाते. एक म्हणजे अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या आणि दुसरे म्हणजे बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या. यापैकी अरबी समुद्राला मिळणारी हिमालयातील प्रमुख नदी म्हणजे सिंधू नदी प्रणाली आणि बंगालच्या उपसागराला मिळणारी नदी म्हणजे प्रामुख्याने गंगा नदी प्रणाली आणि ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली. या तीन नदी प्रणालींची माहिती आपण विस्तृतपणे जाणून घेणार आहोत. सिंधू नदी प्रणाली सिंधू नदीचा उगम तिबेटमध्ये मानसरोवर जवळ झाला आहे. सिंधू नदीची एकूण लांबी २८८० किमी असून तिची भारतातील लांबी ८०० किमी आहे. जम्मू आणि काश्मीर राज्यातून पुढे ती पाकिस्तानमध्ये प्रवेश करून शेवटी अरबी समुद्राला जाऊन मिळते. भारतात सिंधू नदीच्या प्रवाहाची लांबी कमी आहे. श्योक व गिलगिट या सिंधू नदीच्या उत्तर काश्मीरमधील उपनद्या आहेत. रावी, बियास आणि सतलज या हिमाचल प्रदेश व पंजाब राज्यातील प्रमुख नद्या आहेत. झेलम, चिनाब या उपनद्या काश्मीरच्या दक्षिण भागातून वाहतात. सतलज नदी व तिच्या उपनद्या पुढे पाकिस्तानात वाहतात व पुढे एकत्रितपणे सिंधू नदीस मिळतात. १९ सप्टेंबर १९६० रोजी झालेल्या सिंधू पाणी वाटप करारानुसार भारत सिंधू खोऱ्यातील फक्त २० टक्के पाणी वापरू शकतो. गंगा नदी प्रणाली गंगा नदी ही भारतातील सर्वात जास्त लांबीची व सर्वात मोठे खोरे असणारी नदी आहे. या नदीची भारतातील लांबी ही २५२५ किमी आहे, तर गंगा नदीच्या पाणलोट क्षेत्राने भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे २६ टक्के क्षेत्र व्यापले असून तिचे पाणलोट क्षेत्र ८,६१,४०४ चौ. किमी आहे. देशातील एकूण लोकसंख्येच्या ४० टक्के लोकसंख्या गंगा नदी खोऱ्यात राहते. या नदीचा उगम हा कुमाऊँ हिमालयातील गंगोत्री या हिमनदीतून होतो. पुढे तिला देवप्रयाग येथे अलकनंदा व भागीरथी प्रवाह एकत्र येतात तेव्हा त्या जलौघाला गंगा म्हणतात. पुढे उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांतून वाहत जाऊन बांगलादेशमध्ये बंगालच्या उपसागराला मिळते. यमुना हिची प्रमुख उपनदी असून तिचा उगम हिमालयात यमुनोत्री येथे होतो आणि इतर उपनद्यांमध्ये रामगंगा, गोमती, घागरा, गंडक, कोसी, महानंदा आणि सोन या नद्यांचा समावेश होतो. ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली ब्रह्मपुत्रा नदीचे उगमस्थान भारताबाहेर तिबेटमध्ये कैलास पर्वतश्रेणीत मानसरोवर येथे आहे. ब्रह्मपुत्रा नदीची एकूण लांबी २९०० किमी असून भारतात तिची लांबी ८१६ किमी आहे. ब्रह्मपुत्रा नदीचा विस्तार भारत, चीन, भूतान आणि बांगलादेश या देशांमध्ये तर भारतातील अरुणाचल प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये झालेला आहे. सुरुवातीला ती उगम स्थानापासून पूर्वेला वाहते व नंतर दक्षिणेकडे वळून ती दिहांग नावाने अरुणाचल प्रदेशात वाहते. आसाम राज्यातून वाहताना तिला ब्रह्मपुत्रा म्हणतात. ब्रह्मपुत्रा उत्तर किनाऱ्यावर सुबनसिरी, कामेंग, जयभोरेली, मानस आणि तीस्ता या उपनद्या तर दक्षिण किनाऱ्यावरून बुरूही, दिहांग आणि खोपोली या उपनद्या मिळतात. तीस्ता नदी ही आधी गंगेची उपनदी होती, पण महापुरामुळे पात्र बदलल्यामुळे ती ब्रह्मपुत्रा नदीला येऊन मिळाली. पावसाळ्यात ब्रह्मपुत्राला येणाऱ्या पुरामुळे आसाममध्ये मोठी वित्त आणि जीवितहानी होते. ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात आसाममध्ये अनेक बेटं तयार झालेली आहेत. यापैकी माजुली हे बेट नदीपात्रातील जगातील सर्वात मोठे बेट आहे. शेवटी आसाममधून ती बांगलादेशमध्ये प्रवेश करते व गंगेस जाऊन मिळते.