scorecardresearch

Premium

UPSC-MPSC : दुष्काळ म्हणजे नेमके काय? त्याची कारणे कोणती?

भूगोल : या लेखातून आपण दुष्काळ म्हणजे काय? याबाबत जाणून घेऊ या.

Drought
दुष्काळ म्हणजे नेमके काय? त्याची कारणे कोणती? ( फाईल फोटो, लोकसत्ता ग्राफीक्स टीम )

सागर भस्मे

मागील लेखातून आपण भूस्खलन आणि हिमस्खलन म्हणजे काय? त्याची नेमकी कारणे कोणती? याबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण दुष्काळ म्हणजे काय? याबाबत जाणून घेऊ या. दुष्काळ म्हणजे विशिष्ट कालावधीसाठी सामान्य किंवा अपेक्षित प्रमाणापेक्षा लक्षणीय प्रमाणात कमी पाणी किंवा आर्द्रतेत घट होणे. आपत्ती व्यवस्थापनाच्या उच्चाधिकार (NDMA) समितीच्या अहवालानुसार, “शेती, पशुधन, उद्योग किंवा मानवी लोकसंख्येच्या सामान्य गरजा पूर्ण करण्यासाठी पाण्याच्या अभावाला दुष्काळ, असे म्हटले जाऊ शकते.” ही स्थिती एक तर अपुऱ्या पावसामुळे उदभवते किंवा सिंचन सुविधांचा अभाव, अति बाष्पीभवन, उच्च तापमान, मातीची कमी पाणीधारण क्षमता इ.मुळेही उदभवते.

Environmental Issues
UPSC-MPSC : पर्यावरणीय समस्या म्हणजे काय? त्याची मुख्य कारणे कोणती?
Causes of Flood
UPSC-MPSC : पूरस्थिती म्हणजे काय? त्याची नेमकी कारणे कोणती?
Disaster Management
UPSC-MPSC : आपत्ती म्हणजे नेमके काय? त्याचे किती प्रकार पडतात?
Air Mass
UPSC-MPSC : वायू राशी म्हणजे काय? त्याचा हवामानावर कसा परिणाम होतो?

हेही वाचा – UPSC-MPSC : एल. डी. स्टॅम्पने केलेल्या भारताच्या हवामान वर्गीकरणाचा आधार नेमका काय होता?

दुष्काळाचे खालील मुख्य प्रकार ओळखले जाऊ शकतात–

१) हवामानशास्त्रीय दुष्काळ (Meteorological Drought) : हा दुष्काळ अशा परिस्थितीचे वर्णन करतो की, जेथे विशिष्ट कालावधीसाठी (दिवस, महिने, ऋतू किंवा वर्ष) पावसाचे सरासरी प्रमाण कमी होते. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD)ने दुष्काळाची व्याख्या, “कोणत्याही भागात उदभवणारी अशी परिस्थिती जेव्हा सरासरी वार्षिक पाऊस सामान्य पावसाच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी असतो”, अशी केली आहे. IMD ने पुढे दुष्काळाचे दोन मोठ्या श्रेणींमध्ये वर्गीकरण केले आहे. गंभीर दुष्काळ( Severe Drought) जेव्हा पावसाची कमतरता सामान्य पावसाच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त असते. मध्यम दुष्काळ (Moderate Drought) म्हणजे पावसाची कमतरता सामान्य पावसाच्या २५ ते ५० टक्क्यांदरम्यान असते. भारतामध्ये सरासरी ११८ सेंमी वार्षिक पाऊस पडतो. परंतु, नैर्ऋत्य मान्सूनच्या पावसाचे अनिश्चित, अविश्वसनीय व अनियमित स्वरूप आणि देशातील भौगोलिक विविधता यांमुळे काही भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होते.

हवामानशास्त्रीय दुष्काळाची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे :

  • भारतावरील कमी दाबाचा पट्टा कमजोर असणे आणि त्यामुळे येणारे मान्सून वारे कमजोर असणे.
  • मान्सून उशिरा सुरू होणे किंवा लवकर माघार घेणे.
  • पावसाळ्यात दीर्घकाळासाठी खंड (Monsoon Break) पडणे.
  • जेट प्रवाहाच्या दक्षिणेकडील शाखेची पुनर्स्थापना म्हणजेच हिमालयाच्या पायथ्याशी जेट वारे स्थापन होऊन उच्च दाबाचा पट्टा निर्माण होणे.

२) जलशास्त्रीय दुष्काळ (Hydrological Drought) : हा दुष्काळ पाणीकपातीशी संबंधित आहे. हवामानशास्त्रीय दुष्काळामुळे अनेकदा जलशास्त्रीय दुष्काळ पडतो. जलशास्त्रीय दुष्काळ पडण्यापूर्वी साधारणपणे दोन सलग हवामानशास्त्रीय दुष्काळ पडतात. दोन प्रकारचे जलशास्त्रीय दुष्काळ उदा.

१) भूपृष्ठावरील पाण्याचा दुष्काळ (Surface-Water Drought) : याचा संबंध पृष्ठभागावरील जलस्रोत; जसे नद्या, नाले, तलाव, जलाशय इ. कोरडे होण्याशी आहे. मोठ्या प्रमाणावर होणारी जंगलतोड हे भूपृष्ठावरील पाण्याच्या दुष्काळाचे मुख्य कारण आहे. महत्त्वाचे म्हणजे पर्यावरणीयदृष्ट्या धोकादायक खाणकाम, अंदाधुंद रस्तेबांधणी यांमुळे जमिनीची पाणी शोषण क्षमता कमी होते. त्याचप्रमाणे निसर्गाविरुद्ध चाललेल्या मानवी कार्यामुळे परिणाम म्हणून अनेक बारमाही नद्या (Perennial Rivers) पावसाळ्यानंतर कोरड्या पडून त्या पावसाळी नद्यांमध्ये (Seasonal Rivers) रूपांतरित झाल्या आहेत.

२) भूजल दुष्काळ (Ground Water Drought) : भूगर्भातील दुष्काळाचा संबंध भूजल पातळीत घट होण्याशी आहे. हे भूजलाच्या अत्याधिक पंपिंगमुळे होते. तसेच पावसाच्या कमी प्रमाणामुळेही भूजल दुष्काळ निर्माण होतो. भूगर्भातील पाण्याची पूर्तता पावसाच्या पाण्याच्या उपलब्धतेवर आणि जमिनीच्या पाणीधारण क्षमतेवर अवलंबून असते. भारताच्या उत्तरेकडील मैदानात गाळयुक्त माती (Alluvial Soil) आहे. या मातीत पावसाचे पाणी चांगल्या प्रकारे झिरपते आणि त्यामुळे भूगर्भातील पाणी भरण्यास मदत करते. याउलट द्वीपकल्पीय पठार क्षेत्र कठीण अभेद्य खडकांनी बनलेले आहे; जे पाणी झिरपण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणतात.

३) कृषी दुष्काळ (Agricultural Drought) : कृषी दुष्काळ हा हवामानशास्त्रीय/जलशास्त्रविषयक दुष्काळाच्या पिकांच्या उत्पन्नाच्या परिणामाशी संबंधित आहे. जेव्हा जमिनीतील ओलावा आणि पावसाची स्थिती पिकांची निरोगी वाढ व परिपक्वतेसाठी पुरेशी नसते, तेव्हा पिकांवर जास्त ताण येऊन ती कोमेजून जातात. शेतीच्या या स्थितीला कृषी दुष्काळ म्हणतात. हवामानशास्त्रीय दुष्काळ असतानाही शेतीवर दुष्काळ पडू शकतो. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, शेतीतील दुष्काळ हा वनस्पतीचा प्रकार, मातीचा प्रकार व मूल्यांवर अवलंबून असतो. एकाच वेळी तांदूळ लागवडीसाठी दुष्काळी स्थिती असू शकते; तर गव्हासाठी ती योग्य स्थिती असू शकते. अशा प्रकारे हवामान आणि परिस्थितीच्या फरकानुसार पिकांची निवड करणे आवश्यक ठरते. तथापि, पडीक जमिनीच्या परिस्थितीत कोणतीही वनस्पती जगू शकत नाही आणि या स्थितीला वाळवंटीकरण (Desertification) म्हणतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : त्सुनामीची निर्मिती कशी होते? त्याची नेमकी कारणे कोणती?

पावसाची अनियमितता आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्यामागील कारणे–

  • जेव्हा पाऊस सरासरी पर्जन्याच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी असतो, तेव्हा दुष्काळ पडतो.
  • पावसाचे आगमन त्याच्या सामान्य तारखेपासून जास्तीत जास्त तीन आठवडे लांबणे, त्या प्रदेशासाठी दुष्काळी परिस्थिती निर्माण करते.
  • मान्सून वेळेवर सुरू होऊनसुद्धा जास्तीत जास्त दोन आठवड्यांचा अचानक खंड पडल्यामुळे दुष्काळ पडतो.
  • ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात ईशान्य भारतातून मान्सून माघार घेतो. जर पावसाने लवकर माघार घेतली, तर दुष्काळ पडू शकतो.

अवर्षणप्रवण क्षेत्र म्हणजे असे क्षेत्र जिथे दुष्काळ पडण्याची दाट शक्यता असते. दुष्काळी वर्षाची शक्यता जर २० टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तर ते दुष्काळप्रवण क्षेत्र मानले जाते. जिथे दुष्काळी वर्षाची शक्यता ४० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, त्याला तीव्र दुष्काळप्रवण क्षेत्र म्हणतात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Upsc mpsc indian geography what is drought and its types and reason mpup spb

First published on: 26-09-2023 at 16:57 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×