India Restricted Import of Gold Jewellery : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

१) चित्तांच्या निवासासाठी गांधीसागर वन्यजीव अभयारण्याची निवड

कुनो राष्ट्रीय उद्यानानंतर आता गांधीसागर वन्यजीव अभयारण्य भारतातील चित्त्यांचा नवा अधिवास असणार आहे. मध्य प्रदेश सरकारने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची तयारी पूर्ण केल्याचे जाहीर केले आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील जैवविविधतेचे प्रकार, पर्यावरण, संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण आणि ऱ्हास, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

महत्त्वाचे मुद्दे :

गांधीसागर वन्यजीव अभयारण्य कुठं आहे.

चित्तांच्या निवासासाठी याच अभयारण्याची निवड का?

चित्त्यांच्या या नव्या अधिवासात कोणती आव्हाने असतील?

तुमच्या माहितीसाठी :

गांधीसागर वन्यजीव अभयारण्य पश्चिम मध्य प्रदेशातील मंदसौर (१८७.१२ वर्ग किलोमीटर) आणि नीमच (१८१.५ वर्ग किलोमीटर) जिल्ह्यांमध्ये राजस्थानच्या सीमेवर ३६८.६२ चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेले आहे.

या अभयारण्याच्या मधून चंबळ नदी वाहते. १९६० मध्ये नदीवर बांधलेले गांधीसागर धरण अभयारण्याच्या क्षेत्रात आहे. हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे धरण आहे. या परिसरातील भूभाग खडकाळ आहे. हे अभयारण्य गांधीसागरच्या सवाना परिसंस्थेच्या मागे आहे. या परिसरात कोरडे पानझडी झाडे आणि झुडपांनी वेढलेला खुला गवताळ प्रदेश आहे.

नदीखोर्‍यातील भाग मात्र सदाहरित आहे. मध्य प्रदेशचे वन्यजीव अधिकारी सांगतात की, गांधीसागर अभयारण्य चित्त्यांसाठी योग्य निवासस्थान आहे.

सध्या ६४ चौरस किलोमीटरचे क्षेत्र चित्त्यांसाठी विकसित करण्यात आले आहे, त्यासाठी १७.७२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. वन्यजीव अधिकारी सॉफ्ट रिलीझ एन्क्लोजर (बोमा) बांधत आहेत. या क्षेत्रात चित्त्यांसाठी एक रुग्णालयदेखील आबांधण्यात येत आहे.

वन्यजीव अधिकारी सध्या अभयारण्यातील तृणभक्षी आणि भक्षक प्राण्यांच्या स्थितीचे सर्वसमावेशक मूल्यमापन करत आहेत. चित्त्यांना स्थानांतरीत करण्यासाठी अभयारण्य पुरेसे सुसज्ज आहे, याची खात्री करण्यासाठी अभयारण्याच्या एकूण तयारीचे निरीक्षण आणि मूल्यांकन करण्याचे काम चित्ता प्रकल्प सुकाणू समितीच्या अध्यक्षांना देण्यात आले होते.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

२) सोन्याच्या दागिन्यांच्या आयातीवर बंदी

सरकारने विशिष्ट प्रकारच्या सोन्याच्या दागिन्यांच्या आयातीवर बंदी घातली आहे. हे दागिने भारतात आणायचे असल्यास सरकारकडून मान्यता किंवा परवाना घ्यावा लागणार आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील विविध क्षेत्रातील विकासासाठी सरकारी धोरणे आणि हस्तक्षेप आणि त्यांची रचना आणि अंमलबजावणीमुळे उद्भवणारे मुद्दे, या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

महत्त्वाचे मुद्दे :

सरकारचा नेमका निर्णय काय?

दागिन्यांच्या आयातीवर बंदी का घालण्यात आली?

या निर्णयाचे नेमके परिणाम काय होतील?

तुमच्या माहितीसाठी :

मोती, विशिष्ट प्रकारचे हिरे आणि इतर मौल्यवान आणि अर्ध-मौल्यवान रत्नांनी जडलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या आयात धोरणात काही बदल करण्यात आले आहेत. आता प्रतिबंधित श्रेणीतील दागिन्यांसाठी सरकारकडून परवाना/परवानगी आवश्यक आहे. सोन्याच्या आयातीवर १५ टक्के कर आकारला जातो.

एका रिपोर्टनुसार आता बंदी असलेल्या दागिन्यांच्या आयातीत गेल्या वर्षभरात ३० पट वाढ झाली आहे. २०२२-२३ मध्ये ५२ दशलक्ष डॉलर्स असलेला हा आकडा २०२३-२४ मध्ये १.५ अब्ज डॉलर्स इतका वाढला. हिरे आणि मोत्यांसारख्या मौल्यवान आणि अर्ध-मौल्यवान रत्नांनी जडलेल्या दागिन्यांसह इतर प्रतिबंधित श्रेणींमध्ये दागिन्यांची आयात गेल्या आर्थिक वर्षात प्रथमच झाली.

भारताच्या एकूण सोन्याच्या आयातीतही वाढ होत आहे. सोन्याच्या आयातीत झालेल्या वाढीमुळे एप्रिलमध्ये व्यापार तूट पाच महिन्यांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने वृत्त दिले आहे की, काही सोन्याच्या वस्तू भारतात शुल्कमुक्त आणल्या जात आहेत आणि दागिने तयार करण्यासाठी वितळवल्या जात आहेत.

सोन्याच्या आयातीत अचानक झालेल्या वाढीमुळे सरकार चिंतेत आहे. परिणामी, या निर्णयामुळे आयात कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे आणि म्हणूनच सोन्याचे भाव वाढणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

यूपीएससी सूत्र संदर्भातील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा…