UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. याअंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

१ ) चीनमधील गूढ न्यूमोनियाचा आजार

चीनमधील बालकांमध्ये ‘एच९एन२’ (एव्हियन इन्फ्लूएंझा व्हायरस) आणि श्वसनविकार यांचा उद्रेक झाला असून करोनासारखाच या आजारांचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गूढ न्यूमोनिया असलेला हा आजार चीनच्या उत्तर भागामध्ये पसरलेला असून अनेक बालकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

jaguar land rover
लवकरच जग्वार लँड रोव्हरचे भारतात उत्पादन; टाटा मोटर्सचे नियोजन; तमिळनाडूमध्ये उभारणार १ अब्ज डॉलरचा प्रकल्प
Vartaknagar Police Colony
प्रकल्प खर्च वसुलीसाठी गृहबांधणीऐवजी भूखंडविक्री, वर्तकनगर पोलीस वसाहत पुनर्विकास; ४०० कोटी अपेक्षित
what is ring of fire
यूपीएससी सूत्र : भूकंपप्रवण क्षेत्र असलेले ‘रिंग ऑफ फायर’ अन् कचाथीवू बेटाचा वादग्रस्त इतिहास, वाचा सविस्तर…
Tigress, Suspicious Death, Pench Tiger Project, Concerns,11 tiger, dead, 3 months, maharashtra, marathi news,
पेंच व्याघ्रप्रकल्पात वाघिणीचा संशयास्पद मृत्यू, राज्यात तीन महिन्यात ११ वाघांचा मृत्यू

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ आणि पेपर ३ मधील आपत्ती व्यवस्थापन या घटकाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

तुमच्या माहितीसाठी :

चीनमधील बालकांमध्ये ‘एच९एन२’ (एव्हियन इन्फ्लूएंझा व्हायरस) आणि श्वसनविकार यांचा उद्रेक झाल आहे. करोनासारखाच हा श्वसनविकार असून अनेक बालकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चीनमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या श्वसनविकारवाढीचा संबंध इन्फ्लूएंझा, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया, बॅक्टेरियाचा संसर्ग यांच्याशी जोडला असून हा आजार विशेषत: लहान मुलांना होतो.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार बालकांमध्ये श्वसन आणि न्यूमोनियाशी संबंधित आजार आढळून आले आहेत, मात्र त्याची लक्षणे न्यूमोनियापेक्षा वेगळी आहेत. मुलांमध्ये तीव्र ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास आदी लक्षणे दिसून येतात. काही मुलांमध्ये फुप्फुसाला सूज येणे, तीव्र ताप आणि श्वसनविकारांसबंधी अन्य लक्षणेही दिसून आली आहेत.ऑक्टोबर महिन्यात उत्तर चीनमध्ये गेल्या तीन वर्षांच्या याच कालावधीच तुलनेत इन्फ्लूएंझासारख्या आजारांमध्ये अधिक वाढ झाली आहे.

डब्ल्यूएचओने चीनला यावर लक्ष ठेवण्याचे आणि अधिकाधिक तपशीलवार माहिती सादर करण्याचे निर्देश दिले. श्वसोच्छवासाच्या आजारांमध्ये वाढ आणि मुलांमध्ये होणारे श्वसनविकार याची अधिकृत आकडेवारी सादर करण्याचेही डब्ल्यूएचओने चीनला सांगितले आहे. सार्वजनिक आरोग्य सल्लागार जारी करून रुग्णांच्या संपर्कात इतर लोकांनी येऊ नये यासाठी पावले उचलावीत. चीनच्या आरोग्य यंत्रणाांनी या आजारांविरुद्ध केलेल्या उपाययोजनांचे पालन करण्याचे डब्ल्यूएचओने चिनी नागरिकांना सांगितले आहे. नवा आजार झालेल्या रुग्णांपासून अंतर राखणे, आजारी असल्यास घरीच राहणे आणि मुखपट्टी वापरणे आदी नियमांचे पालन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

२ ) A23a हिमखंड

जगातील सर्वांत मोठा हिमखंड आता आपल्या जागेवरून पुन्हा एकदा सरकत आहे. स्वत:च्या जागेवरून सरकलेल्या या महाकाय हिमखंडाचे नाव ‘A23a’असे आहे. गेल्या तीस वर्षांपासून तो समुद्राच्या तळात फसला होता. आता मात्र तब्बल ३० वर्षांनंतर या हिमखंडाने आपली जागा बदलली आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील पर्यावरण आणि जैव विविधता या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे ही घटना नेमकी काय आहे? आणि या घटनेचे परिणाम भविष्यात काय होणार? यासंदर्भात माहिती असणे आवश्यक आहे.

तुमच्या माहितीसाठी :

हा हिमखंड जगातील सर्वांत मोठा हिमखंड असून ब्रिटनमधील ग्रेटर लंडन या प्रदेशाच्या आकाराच्या दुप्पट आहे. ग्रेडर लंडन या प्रदेशाचे आकारमान ४ हजार स्क्वेअर किलोमीटर आहे. म्हमजेच A23a हा हिमखंड आकाराने तब्बल ८ हजार स्क्वेअर किलोमीटरपेक्षाही मोठा आहे. याआधी हा हिमखंड १९८६ साली अंटार्क्टिका समुद्रकिनाऱ्यापासून विलग झाला होता. त्यानंतर तो वेडेल समुद्रात अडकला होता. आता मात्र साधारण ३० वर्षांनंतर हा हिमखंड पुन्हा एकदा आपल्या जागेवरून सरकतोय. हा हिमखंड अशाच प्रकारे आपल्या जागेवरून सरकत राहिल्यास भविष्यात तो दक्षिण अटलांटिक महासागराच्या दिशेने जाईल. ज्यामुळे दक्षिण जॉर्जिया बेट संकटात येऊ शकतो. या बेटावर अब्जावधी सील, पेंग्विंन तसेच पक्षांचा अधिवास आहे. त्यामुळे येथील प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

३) सातपाटी मत्स्य बंदर प्रकल्प

पालघर जिल्ह्यात सातपाटी येथे समुद्रकिनाऱ्यालगत नव्याने मासेमारी जेटी उभारण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने शासनाकडे ३५४ कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव सादर केला आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी-एमपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ शासन धोरण या घटकाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा प्रकल्प काय आहे? याचा मच्छिमाऱ्यांना कसा फायदा होईल? सातपाटी येथे मत्स्यबंदर उभारण्याची गरज का निर्माण झाली? आणि या प्रकल्पाचे फायदे कोणते? यासंदर्भात माहिती असणे आवश्यक आहे.

तुमच्या माहितीसाठी :

मच्छीमारांना सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्यात मत्स्यव्यवसाय विभागाची असली तरीही राज्य शासनाने सातपाटीसह भरडखोल, जीवना, हर्णे व साखरीनाटे या ठिकाणी मत्स्यबंदर व पायाभूत सुविधा उभारण्याचे काम महाराष्ट्र सागरी मंडळाकडे जून २०२१ मध्ये सोपवण्यात आले होते. त्यानुसार या ठिकाणी नव्याने मासेमारी जेट्टी उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

मच्छीमारांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून सातपाटी समुद्रकिनारालगत ४०० मीटर लांबीची मासेमारी जेटी प्रस्तावित करण्यात आली आहे. या जेटी प्रकल्पाच्या बॅकवॉटरचा अभ्यास करून भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी) तर्फे अहवाल सादर करण्यात आला आहे. या मत्स्य बंदराच्या उभारणीसाठी पूर्वीच्या २८१ कोटी रुपयांच्या प्रस्तावामध्ये वाढ करून ३५४ कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

हे मत्स्यबंदर किनाऱ्याच्या लगत असल्याने मासेमारी बोटींना सध्या अस्तित्वात असलेल्या व गाळ साचलेल्या बंदराच्या चॅनलमध्ये प्रवेश घेण्याची गरज भासणार नाही. तसेच गाळामुळे मासे उतरवण्यास अथवा बोटीने मासेमारीसाठी बाहेर पडण्यास होणारा विलंब टळणार आहे. मत्स्य बंदर विकसित केल्याने स्थानिक मच्छीमारांना मासेमारी जहाज सुरक्षितपणे नांगरणे, त्याचे लँडिंग करणे, माशांची हाताळणी करणे, खरेदी-विक्री करणे, मासे साठवणे तसेच त्या ठिकाणी बोटींची दुरुस्ती करणे सोयीचे ठरणार असल्याने मासेमारी व्यवसायात वृद्धी होण्यास मदत होणार आहे.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.