UPSC Key : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

१) वॉटरस्पाउट म्हणजे काय?

१९ ऑगस्ट रोजी वॉटरस्पाउटमुळे इटलीच्या सिसिलीच्या किनाऱ्यावर हिंसक वादळ येऊन धडकले. वादळाचा तडाखा बसल्याने समुद्रातील एक लक्झरी जहाज बुडाले.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच जागतील महत्त्वाच्या घटना आणि मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मधील भूगोल या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

महत्त्वाचे मुद्दे :

वॉटरस्पाउट म्हणजे काय?
वॉटरस्पाउट नक्की कसे तयार होतात?
वॉटरस्पाउट संख्या का वाढली आहे का?

तुमच्या माहितीसाठी :

वॉटरस्पाउट म्हणजे पाण्यावर तयार होणारे हवेचे आणि धुक्याचे चक्रीवादळ होय. मोठमोठ्या चक्रीवादळांच्या तुलनेत ती कमकुवत असतात. सामान्यत: वॉटरस्पाउट सुमारे पाच ते १० मिनिटांच्या कालावधीपर्यंत टिकू शकतात. वॉटरस्पाउट सुमारे १६५ फूट व्यासाचे असू शकते. या परिस्थितीत वाऱ्याचा वेग ताशी १०० किलोमीटर असू शकतो.

उष्ण कटिबंधीय पाण्यात वॉटरस्पाउट अधिक सामान्य आहेत; मात्र तरी ते कुठेही दिसू शकतात. जेव्हा हवेत जास्त आर्द्रता आणि तुलनेने उबदार पाण्याचे तापमान असते तेव्हा वॉटरस्पाउट उदभवतात.

सामान्यतः दोन प्रकारचे वॉटरस्पाउट आहेत. पहिले म्हणजे टॉर्नॅडिक वॉटरस्पाउट आणि दुसरे फेअर-वेदर वॉटरस्पाउट. टॉर्नेडिक वॉटरस्पाउट हे वास्तविक चक्रीवादळ असते; जे पाण्यावर तयार होते किंवा जमिनीवरून पाण्यात जाते.

“हे चक्रीवादळ गडगडाटी वादळांशी संबंधित आहे आणि त्यांच्याबरोबर अनेकदा जोराचा वारा, गारपीट आणि वारंवार वीज कोसळण्याच्या घटना घडतात,” असे यूएस एजन्सी नॅशनल ओशनिक अॅण्ड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (NOAA)च्या अहवालात म्हटले आहे.

टॉर्नेडिक वॉटरस्पाउटमध्ये समुद्र रौद्र रूप धारण करतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात विनाश होऊ शकतो.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

वॉटरस्पाउट म्हणजे काय? त्यामुळे इटलीतील समुद्रात जहाज कसे बुडाले?

UPSC-MPSC : चक्रीवादळ म्हणजे काय? ते कसे तयार होते?

२) डॉक्टरांना केंद्रीय संरक्षण कायद्याची गरज काय़?

कोलकाता येथील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये एका तरुण प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची आणि हत्या केल्याची घटना घडली आहे. त्यापार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच ‘एम्स’मधील निवासी डॉक्टर्स असोसिएशन (आरडीए)ने रविवारी (१८ ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून देशातील आरोग्य सेवा कर्मचारी आणि संस्थांच्या संरक्षणासाठी अध्यादेशाद्वारे केंद्रीय कायदा लागू करण्याची विनंती केली.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच सामान्य अध्ययन पेपर २ मधील असुरक्षित विभागांचे संरक्षण आणि सुधारणा करण्यासाठी यंत्रणा, कायदे, संस्था आणि संस्था या घटकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे.

तुमच्या माहितीसाठी :

आरोग्य सेवा कर्मचार्‍यांवर सेवा देत असताना झालेल्या हिंसाचाराचा कोणताही डेटा भारताकडे नाही. कोलकाता येथील क्रूर बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे देशभरात संताप निर्माण झाला आहे. डॉक्टरांनी पीडितेला न्याय आणि आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

भारतात आरोग्य, कायदा आणि सुव्यवस्था हे राज्यघटनेचे अंतर्गत विषय आहेत. त्यामुळे हिंसाचार रोखण्याची जबाबदारी राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश प्रशासनाची आहे. आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी अनेक राज्यांचे स्वतःचे कायदे आहेत. परंतु, नवी दिल्लीतील एम्सच्या रुग्णालय प्रशासन विभागाचे वरिष्ठ निवासी डॉक्टर हमाद बिन खालिद यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’साठी लिहिले, “या समस्येकडे लक्ष देण्याच्या वैयक्तिक राज्यांच्या दृष्टिकोनामुळे अनेकदा अडचणी निर्माण होतात.”

केंद्राने २०१९ मध्ये आरोग्य सेवा कर्मचारी आणि वैद्यकीय आस्थापना (हिंसा प्रतिबंध आणि मालमत्तेचे नुकसान) विधेयक प्रस्तावित केले होते; ज्यामध्ये शिफारशी मागविण्यात आल्या. परंतु, इतर व्यावसायिक समुदायांद्वारे समान संरक्षणाची मागणी केली जाऊ शकते, अशी चिंता व्यक्त करून गृह मंत्रालयाने हे विधेयक स्थगित केले.

२०२२ मध्ये हेल्थकेअर प्रोफेशनल्स आणि क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट्स, २०२२ विरुद्ध हिंसाचार प्रतिबंधक विधेयक, २०२२ लोकसभेत सादर करण्यात आले. आरोग्य सेवा कर्मचार्‍यांविरुद्ध हिंसक कृत्ये परिभाषित करणे आणि अशा कृत्यांसाठी शिक्षेची तरतूद करणे, असे या प्रस्तावित कायद्याचे उद्दिष्ट आहे. परंतु, या विधेयकाचा पाठपुरावा केला गेला नाही. कारण- तत्कालीन आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, ‘महासाथीविरोधातील अध्यादेश (सुधारणा) -२०२०’ कायद्यात त्याची बहुतेक उद्दिष्टे समाविष्ट आहेत.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

Kolkata Doctor Rape and Murder : भारतातील डॉक्टरांना केंद्रीय संरक्षण कायद्याची गरज का आहे?

यूपीएससी सूत्र संदर्भातील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा…