Importance of Pangong Lake for India : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. १) पॅंगॉन्ग लेकवरील चीनचा पूल दिवसेंदिवस सीमारेषेवर चीनच्या कारवायांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता चीनने पँगॉन्ग लेकवर पूल तयार केला आहे, जो आता वाहतुकीसाठी सुरू झाल्याची माहिती आहे. परीक्षेसाठी महत्त्वाचे का? हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच सामान्य अध्ययन पेपर २ मधील भारत आणि त्याचे शेजारी देशांशी असलेले संबंध या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. महत्त्वाचे मुद्दे : पॅंगॉन्ग लेक - नकाशापॅंगॉन्ग लेकवरील पूर भारतासाठी चिंतेचा विषय का? तुमच्या माहितीसाठी : चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए)ने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून सुमारे २५ किमी अंतरावर असलेल्या ४०० मीटर पुलाचे बांधकाम पूर्ण केले आहे. काही छायाचित्रांमध्ये नव्याने बांधलेल्या पुलावरून वाहने जात असल्याचे दिसून आले आहे. २०२२ मध्ये तलावाचा सर्वात अरुंद भाग असलेल्या खुर्नाक येथील पँगॉन्ग त्सोवर चीन हा पूल बांधत असल्याचे वृत्त समोर आले होते. सॅटेलाइट इमेजरीतज्ज्ञ डेमियन सायमन यांनी तेव्हा ‘एक्स’वर सांगितले होते की, पँगॉन्ग लेकच्या उत्तर आणि दक्षिण किनार्यांना जोडणारा पूल लवकरच वापरासाठी तयार होईल. त्यानंतर भारतीय लष्कराच्या एका निवृत्त जनरलनेही ‘सीएनबीसी’ला याची पुष्टी केली होती. पँगॉन्ग त्सो जवळील पुलाचे स्थान भारतासाठी चिंतेचे आहे, कारण लडाखकडे चीन नजर लावून बसला असल्याचे या कृतीतून स्पष्ट होते. भारतीय लष्कराच्या नॉर्दर्न कमांडच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्समध्ये सेवा बजावलेले जनरल रोहित गुप्ता (निवृत्त) यांनी ‘सीएनबीसी’ला सांगितले की, उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यादरम्यान सैन्याला वेगाने हलवण्याची चीनची क्षमता या पुलामुळे वाढते. पूर्वी पँगॉन्ग त्सो लेकवर चीनसाठी हे अशक्य होते. संरक्षण तज्ज्ञांनी नमूद केले आहे की, बांधण्यात आलेल्या पुलामुळे चीनला पर्वतांमध्ये त्वरीत ऑपरेशन सुरू करण्यासाठी लागणारा वेळ कमी होण्यास मदत होईल. शिवाय पुलामुळे चिनी सैन्याला त्यांच्या रणगाड्यांसह दक्षिणेकडील रेझांग लासारख्या भागात प्रवेश करण्यास मदत मिळेल. या भागात २०२० मध्ये भारतीयांनी त्यांना पराभूत केले होते. यासंदर्भातील महत्त्वाचे लेख : पँगॉन्ग लेकवरील चीनचा पूल तयार; भारतासाठी हा किती मोठा धोका? २) हमास प्रमुखाच्या हत्येनंतर भारताच्याही चिंतेत वाढ इस्रायल आणि हमास यांच्यात अनेक महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. त्यातच आता हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हानिया याची हत्या करण्यात आल्याने परिस्थिती आणखी चिघळणार आहे. ७ ऑक्टोबर २०२३ नंतर इस्रायल-हमास युद्धातील ही सर्वांत मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे. परीक्षेसाठी महत्त्वाचे का? हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील आंतरराष्ट्रीय संबंध या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमच्या माहितीसाठी : हमास या कारवाईकडे एक प्रमुख चिथावणी म्हणून पाहत आहे. कारण- हानिया कतारमध्ये असणार्या त्यांच्या राजकीय ब्यूरोचे प्रमुख होते. हानिया ‘हमास’मधील प्रमुख चेहरा होते. ओलिस करार, तसेच युद्धविरामाच्या अटींवर हानिया चर्चा करायचे. इराणच्या नवीन राष्ट्रपतींच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहिल्यानंतर तेहरानमधील त्याच्या निवासस्थानावर हल्ला करून त्याला संपवण्यात आले. त्यामुळे हमास आणि त्याचा सहकारी देश इराण संतापला आहे. ‘हमास’चे अधिकारी सामी अबू झुहरी यांनी ‘रॉयटर्स’ला सांगितले की हानियाची इराणमध्ये झालेली हत्या ही एक गंभीर बाब आहे. इराण आणि हमासमध्ये आता हानियाच्या मृत्यूचा बदला घेण्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे नवनिर्वाचित राष्ट्रपती पेजेशकियान यांच्यावर नक्कीच दबाव आणण्यात येईल. पेजेशकियान यांची निवडणूक मोहीम आर्थिक कारणांसाठी पाश्चात्त्य देशांशी वाटाघाटी सुरू करणे, यावर केंद्रित होती. कारण- इराणला पाश्चात्त्य निर्बंधांचा सामना करावा लागत आहे. त्यांना युरोपशी संवाद प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याचीदेखील आशा होती. परंतु, हानियाच्या हत्येमुळे पेजेशकियान यांच्यावर आयआरजीसी आणि इराणी आस्थापनातील कट्टरपंथींकडून त्यांच्याप्रमाणेच उत्तर किंवा प्रतिसाद देण्यासाठी दबाव असेल. पेजेशकियान यांचे राष्ट्रपती म्हणून पहिले काही दिवस आणि आठवडे एक राजकारणी म्हणून त्यांच्या कौशल्याची चाचणी असेल. या संकटाला कसा प्रतिसाद द्यायचा याविषयी त्यांना सर्वोच्च नेत्यांशी चर्चा करावी लागेल. भारताने याविषयी कोणतेही विधान करणे टाळले आहे. कारण- भारताला अशा प्रकरणाच्या संवेदनशीलतेची जाणीव आहे. त्यात हमासच्या नेत्यांबद्दल कोणतीही समानुभूतीची भावना नसली तरी अशा विषयांवर भाष्य करताना त्याच्या होणार्या परिणामांचा भारताला सर्वांत आधी विचार करणे आवश्यक आहे. भारताला जवळजवळ दोन-तृतियांश कच्च्या तेलाचा पुरवठा करण्याव्यतिरिक्त या प्रदेशात सुमारे नऊ दशलक्ष भारतीय नागरिक राहतात आणि काम करतात. त्यामुळे या प्रदेशातील शांतता आणि स्थिरता बिघडल्यास ते भारतासाठी चिंतेचे कारण ठरू शकेल. यासंदर्भातील महत्त्वाचे लेख : हमास प्रमुख इस्माईल हानियाच्या हत्येनंतर तणाव वाढणार, भारताच्याही चिंतेत वाढ; कारण काय? यूपीएससी सूत्र संदर्भातील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा…