UPSC Key : worlds largest coral reef : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

१) वाढत्या तापमानाचे प्रवाळ परिसंस्थेवरील परिणाम

गेल्या काही वर्षांत वातावरणामधील कार्बन डाय-ऑक्साईड आणि मिथेन यांचे प्रमाण वाढले आहे. स्वाभाविकत: या गोष्टीचा दुष्परिणाम जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाच्या स्वरूपात झाला आहे. पृथ्वीचा ७१ टक्के भाग महासागरांनी व्यापला आहे आणि या तापमानवाढीचा सर्वाधिक परिणाम महासागरांवर होत आहे. ऑस्ट्रेलियाच्या ग्रेट बॅरियर रीफमध्ये आणि त्याच्या आसपासच्या पाण्याचे गेल्या दशकातील तापमान हे ४०० वर्षांतील सर्वाधिक तापमान असल्याची नोंद करण्यात आली आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच सामान्य अध्ययन पेपर ३ मधील जैवविविधतेचे प्रकार, पर्यावरण, संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण आणि ऱ्हास, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

महत्त्वाचे मुद्दे

जागतिक तापमानवाढ म्हणजे काय?
प्रवाळ परिसंस्था म्हणजे काय?
जागतिक तापमानवाढ आणि भारत
प्रवाळ परिसंस्था महत्त्वाच्या का?

तुमच्या माहितीसाठी :

ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी या संशोधनपर अभ्यासात मानवनिर्मित हवामान बदलाच्या घातक परिणामांविषयीची माहिती मांडली आहे. त्यांना प्रवाळ परिसंस्थेवर थेट परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढल्याने प्रवाळाचे विरंजन (ब्लीचिंग) होत असल्याची माहिती या अभ्यासातून समोर आली आहे. क्वीन्सलँडच्या उत्तरेकडील राज्याच्या किनारपट्टीपासून सुमारे २,४०० किलोमीटरपर्यंत या परिसंस्थेचे क्षेत्र व्यापले आहे.

संपूर्ण ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांमधील संशोधकांच्या गटाने १६१८ सालापर्यंतच्या उन्हाळ्यातील समुद्राचे तापमान मोजण्यासाठी नमुन्यांचे विश्लेषण केले. त्यातील परिणाम दर्शवितात की, शेकडो वर्षे स्थिर असलेले समुद्राचे तापमान १९०० पासून मानवी प्रभावामुळे वाढू लागले.

१९६० ते २०२४ पर्यंत यासंबंधीचा अभ्यास केलेल्या लेखकांनी जानेवारी ते मार्च या कालावधीत प्रतिदशक ०.१२ अंश सेल्सिअस इतकी सरासरी वार्षिक तापमानवाढ दर्शवली.

२०१६ पासून ग्रेट बॅरियर रीफचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आहे आणि त्यामुळे या क्षेत्रातील प्रवाळाचे विरंजन होत असल्याचे दिसून आले आहे. वारंवार विरंजन होत राहिल्यास प्रवाळ मृत होण्याची शक्यता जास्त असते.

जागतिक तापमानवाढीचा जगातील अनेक प्रवाळ परिसंस्थांवर परिणाम झाला आहे. परंतु, ग्रेट बॅरियर रीफ ही जगातील सर्वांत मोठी प्रवाळ परिसंस्था आहे.

प्रवाळ परिसंस्था (कोरल ड्रिफ) या लहान सजीवांच्या वसाहती महासागरांच्या तळाशी आढळून येतात. कोरल हे समुद्राच्या तळाशी कायमचे जोडलेले असतात. प्रत्येक कोरल प्राण्याला पॉलीप म्हणून ओळखले जाते.

कोरल शेकडो ते हजारो आनुवंशिकदृष्ट्या समान पॉलिप्सच्या गटात राहतात आणि त्यांची एक वसाहत तयार करतात. कोरलला कणखर व मऊ अशा मुख्यत्वे दोन प्रकारांत वर्गीकृत केले जाते.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

UPSC- MPSC : पर्यावरण : परिसंस्थेचे प्रकार भाग – १

UPSC-MPSC : पर्यावरण : परिसंस्थेचे प्रकार भाग -२

UPSC-MPSC : सागरी परिसंस्था म्हणजे काय? त्याचे मुख्य घटक कोणते?

२) ‘हिंडेनबर्ग रिसर्च’चे सेबीच्या अध्यक्षांवर आरोप

हिंडेनबर्ग रिसर्चने सेबीच्या अध्यक्षा माधबी बूच आणि त्यांचे पती धवल बूच यांनी अदानी समूहाच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित परदेशी संस्थांमध्ये भागीदारी केली होती असा आरोप केला आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच सामान्य अध्ययन पेपर ३ मधील अर्थशास्त्र या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

महत्त्वाचे मुद्दे :

हिंडेनबर्ग रिसर्च ही संस्था नेमकी काय?
हिंडेनबर्ग रिसर्चने नेमके काय आरोप केले?
सेबी ही संस्था नेमकी काय?

तुमच्या माहितीसाठी :

हिंडेनबर्गच्या ताज्या खुलाशानुसार, माधबी आणि धवल बूच यांनी परदेशात बर्म्युडा आणि मॉरिशस येथील अदानीशी संबंधित कंपन्यांमध्ये भागीदारी केली होती.

माधबी बूच आणि त्यांचे पती धवल बूच यांची गुंतवणूक गौतम अदानी यांचा मोठा भाऊ विनोद अदानी यांच्याशी संबंधित कंपन्यांमध्ये होती. विनोद अदानी यांच्याशी संबंधित कंपन्यांनी पुढे अदानी समूहात गुंतवणूक करून समभागांच्या किमती गैरमार्गाने फुगवल्या.

बूच यांच्या हितसंबंधांमुळे सेबीच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून सेबीच्या निष्पक्षतेच्या भूमिकेवरदेखील बोट ठेवण्यात आले आहे. शिवाय अदानी समूहावर सेबीने कोणतीही कारवाई न करणेदेखील संशयाच्या दृष्टीने बघितले जात असल्याचे हिंडेनबर्गने म्हटले आहे.

सेबीविषयी :

जी. एस. पटेल समितीच्या शिफारशीवरून १२ एप्रिल १९८८ रोजी एक असंवैधानिक संस्था म्हणून सेबीची स्थापना करण्यात आली. सेबीला ३० जानेवारी १९९२ रोजी सेबी कायदा, १९९२ नुसार वैधानिक दर्जा देण्यात आला.

सेबीचे मुख्यालय हे मुंबईला असून, तिची विभागीय कार्यालये कोलकत्ता, दिल्ली व चेन्नई येथे आहेत. भारत शासनाने एप्रिल १९९८ मध्ये सेबीला संपूर्ण भांडवली बाजाराचा मुख्य नियंत्रक म्हणून घोषित केलेले आहे.

सेबीच्या नियामक मंडळामध्ये अध्यक्षांसहित एकूण नऊ सदस्यांचा समावेश असतो. त्यामध्ये वित्त आणि कायदा मंत्रालयाचा प्रत्येकी एक सदस्य, भारतीय रिझर्व्ह बँकेचा एक सदस्य आणि भारत सरकारद्वारे इतर दोन सदस्यांची नियुक्ती करण्यात येते.

अध्यक्ष वगळून सेबीचे चार पूर्णवेळ सदस्य असतात. सेबीचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉ. एस. ए. दवे यांची नियुक्ती करण्यात आली होती. सद्य:स्थितीमध्ये माधवी पुरी बूच १ मार्च २०२२ पासून सेबीच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत. माधवी पुरी बूच या सेबीच्या अध्यक्षपदी कार्यरत असणाऱ्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

UPSC-MPSC : ‘सेबी’ची स्थापना करण्याची गरज का भासली? तिची उद्दिष्टे आणि कार्ये कोणती?

यूपीएससी सूत्र संदर्भातील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा…