UPSC Key : India Bangladesh ties : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. १) बांगलादेशमधील अस्थिरता, त्याचा भारतावर होणारा परिणाम बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन प्रचंड चिघळल्यानंतर शेख हसीना यांनी सोमवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत देशाबाहेर पलायन केले. यामुळे बांगलादेशातील त्यांची १५ वर्षांची राजवट अचानक संपुष्टात आली असून लष्करप्रमुखांनी लवकरच हंगामी सरकारची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. परीक्षेसाठी महत्त्वाचे का? हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना आणि मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील भारत आणि त्याच्या शेजारी देशांशी असलेले संबंध या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. महत्त्वाचे मुद्दे : भारत बांगलादेश संबंधबांगलादेशच्या निर्मितीत भारताची भूमिकाबांगलादेशमधील अस्थितेचं कारणबांगलादेशमधील परिस्थितीचा भारतावर होणारा परिणाम तुमच्या माहिसीसाठी बांगलादेशमध्ये आरक्षणाविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाने रौद्र रूप घेतले आहे. चिघळलेल्या या आंदोलनाने हिंसाचाराचे रूप घेतल्याने अनेकांचा मृत्यू झाला. देशातील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आणि संचारबंदी लागू करण्यात आली. देशातील गंभीर स्थिती पाहता शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असून देश सोडला आहे. तसेच त्यांनी भारतात आश्रय घेतला आहे. भारत-बांगलादेशमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून द्विपक्षीय संबंध आहेत. २००९ मध्ये शेख हसीना सत्तेवर आल्यापासून भारत आणि बांगलादेशचे मैत्रीपूर्ण संबंध वाढत गेले आहेत. व्यापाराच्या दृष्टीने बांगलादेश हा दक्षिण आशियातील भारताचा सर्वात मोठा भागीदार आहे आणि चीननंतर भारत बांगलादेशचा दुसरा सर्वात मोठा भागीदार आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात दोन्ही देशांतील द्विपक्षीय व्यापार १३ अब्ज डॉलर्स इतका होता, असे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे. करोना काळातदेखील दोन्ही देशांत १०.७८ अब्ज डॉलर्स इतका व्यापार झाला होता. भारतातील कापसाची सर्वाधिक निर्यात बांगलादेशमध्ये होते. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये भारताच्या एकूण कापूस निर्यातीपैकी ३४.९ टक्के कापूस निर्यात बांगलादेशला करण्यात आली आहे, ज्याची अंदाजे किंमत २.४ अब्ज डॉलर्स इतकी आहे. भारतातून बांगलादेशमध्ये पेट्रोलियम उत्पादने आणि तृणधान्यांचीदेखील मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये भारताने बांगलादेशातून रेडिमेड कपड्यांची आयात केली, ज्याची रक्कम ३९१ दशलक्ष डॉलर्स होती. अलीकडच्या काही वर्षांत बांगलादेश हे कापड उद्योगाचे प्रमुख जागतिक केंद्र म्हणून उदयास आले आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये भारत आणि बांगलादेशने ढाका येथे व्यापारावरील संयुक्त कार्यगटाच्या एका बैठकीदरम्यान मुक्त व्यापार करारावर चर्चा सुरू केली. मुक्त व्यापार करारामुळे भारत आणि बांगलादेशदरम्यान व्यापार केलेल्या वस्तूंवरील सीमा शुल्क कमी होईल किंवा पूर्णपणे काढून टाकण्यात येईल, तसेच पुढील व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी नियम सुलभ करण्यात येतील. पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीमुळे भारत-बांगलादेश संबंध अधिक मजबूत झाले आहेत, असे परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी सांगितले आहे. रस्ते, रेल्वे, जहाजबांधणी आणि बंदर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भारताने २०१६ पासून बांगलादेशला तीन वेळा आठ अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये अखौरा-अगरतळा क्रॉस-बॉर्डर रेल्वे लिंक आणि खुलना-मोंगला पोर्ट रेल्वे लाईन या दोन संयुक्त प्रकल्पांचे उदघाटन करण्यात आले. रेल्वेव्यतिरिक्त सध्या भारत आणि बांगलादेशदरम्यान पाच कार्यरत बस मार्ग आहेत; ज्यात कोलकाता, आगरतळा आणि गुवाहाटी ते ढाका या शहरांना जोडणार्या मार्गांचा समावेश आहे. २०२३ मध्ये बांगलादेशने भारत आणि ईशान्येकडील मालवाहतूक सुलभ करण्यासाठी चितगाव आणि मोंगला बंदरांच्या वापरासाठीच्या भारताच्या प्रस्तावावर सहमती दर्शविली होती. गेली साधारण १५ वर्षे शेख हसीना बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या. त्यांच्या काळात बांगलादेशचे भारताबरोबरचे संबंधही अत्यंत चांगले राहिले आहेत. त्यांनी पदावरून पायउतार होणे म्हणजे भारताने बांगलादेशमधील एक विश्वासू सहकारी गमावला आहे.शेख हसीना यांचा भारताशी चांगला स्नेह होता आणि बांगलादेशातून कार्यरत असलेल्या दहशतवादी गटांचा सामना करण्यासाठी भारताने त्यांच्यासोबत फार जवळून काम केले आहे. उभय देशांमधील या सहकार्यामुळे दोन्ही देश एकमेकांचे चांगले मित्र बनले आहेत. याआधीही अनेक प्रकारच्या विकास प्रकल्पांसाठी भारताने बांगलादेशला चांगली मदत केली आहे. बांगलादेशमध्ये नव्याने जी सत्ता स्थापन होईल, ती काय भूमिका घेईल याबाबत भारताला चिंता असेल. भूतकाळामध्ये बांगलादेशमधील विरोधी पक्ष बीएनपी- जमात अथवा सैन्याची सत्ता बांगलादेशावर होती, तेव्हा भारताला फार चांगला अनुभव आलेला नाही. त्या काळात भारत-बांगलादेश सीमेवर भारतविरोधी दहशतवादी संघटना कार्यरत होत्या. अशाच प्रकारची परिस्थिती पुन्हा एकदा उद्भवण्याची शक्यता आहे. मात्र, असे झाल्यास पुन्हा एकदा संघर्ष भारताला परवडणारा नाही. सध्या आधीपासूनच एलओसी आणि पाकिस्तानच्या सीमेवर तणाव आहे. या पार्श्वभूमीवर शांत असलेला बांगलादेशचा सीमाभाग अस्थिर व्हावा, अशी भारताची इच्छा नाही. यासंदर्भातील महत्त्वाचे मुद्दे : बांगलादेशमधील अस्थिरता, शेख हसीना यांनी देश सोडल्यामुळे भारताच्या चिंतेत वाढ; काय आहेत कारणं? शेख हसीनांचे पलायन, बांगलादेशात अराजक; भारताचं या ६ गोष्टींकडे लक्ष UPSC-MPSC : बांगलादेशची निर्मिती कशी झाली? यात भारताची भूमिका काय होती? UPSC-MPSC : भारत-बांगलादेश यांच्यातील सहकार्याची क्षेत्रे कोणती? दहशतवाद्यांसह ५०० कैदी बांगलादेशच्या तुरुंगातून फरार, भारताची चिंता वाढली २) वायनाडमधील बेली ब्रिज केरळमधील वायनाड जिल्ह्यामध्ये ३० जुलै रोजी झालेल्या भूस्खलनामध्ये मोठ्या प्रमाणावर वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या भूस्खलनामध्ये २१९ जणांचा मृत्यू झाला. ही आपत्ती घडल्यानंतर लष्कराच्या तुकड्या, राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (NDRF), तटरक्षक दल, नौदल यांच्याकडून तातडीने बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले. तसेच या ठिकाणी तात्पुरत्या ‘बेली ब्रिज’ची निर्मिती करण्यात आली. परीक्षेसाठी महत्त्वाचे का? हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील आपत्ती व्यवस्थापन या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. महत्त्वाचे मुद्दे : बेली ब्रिज म्हणजे काय?बेली ब्रिज कशा प्रकारे काम करतो?भारत आणि बेली ब्रिज तुमच्या माहितीसाठी : बेली ब्रिज म्हणजे काय हे अगदी सोप्या शब्दांत सांगायचे झाले, तर असा एखादा पूल की, ज्याचे भाग आधीपासूनच तयार असतात आणि आवश्यकता असताना ते जोडण्यात येतात. थोडक्यात कमीत कमी बांधकाम प्रक्रिया करून गरजेच्या वेळी अत्यंत कमी वेळेत उभा करता येईल, इतका कार्यक्षम असलेला हा ‘मॉड्युलर’ पूल असतो. ‘मॉड्युलर’ याचा अर्थ ज्याचे विभक्त भाग एकत्र जोडल्यानंतर साकार होते अशी गोष्ट होय. ‘बेली ब्रिज’ याच प्रकारात मोडतो. अमेरिकन सैन्याच्या इंजिनीयर स्कूलच्या मॅन्युअलमध्ये अशी नोंद आहे की, बेली ब्रिजचा उगम युद्धाच्या काळात झाला. ज्या स्थापत्य अभियंत्याने या पुलाची निर्मिती केली, त्याच्याच नावावरून या पुलाला हे नाव देण्यात आले आहे. दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या (१९३९-१९४५) काळात डोनाल्ड कोलमन बेली या स्थापत्य अभियंत्याने या प्रकारच्या नव्या पुलाची सर्वांत पहिल्यांदा निर्मिती केली. अमेरिकन सैन्याच्या इंजिनीयर स्कूलच्या मॅन्युअलमध्ये म्हटले आहे, “१९४१ साली बेली यांनी आपल्या या नव्या रचनेचा पहिला आराखडा ब्रिटिश वॉर ऑफिसकडे सादर केला होता. दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात हाच बेली ब्रिज अनेक कामांसाठी उपयोगी ठरला. शत्रूपक्षाचा हल्ला सुरू असतानाही हा पूल सहजपणे हलवता यायचा आणि त्याची पुनर्बांधणी करता यायची. तसेच अवघ्या काही तासांतच तो मोडून, पुन्हा दुसऱ्या जागी उभादेखील करता यायचा. १९४३-४५ मध्ये इटली आणि वायव्य युरोपमधील मित्रराष्ट्रांच्या सैन्याने याचा मोठ्या प्रमाणावर आणि चांगला वापर केला. ब्रिटिश फील्ड मार्शल लॉर्ड बर्नार्ड लॉ माँटगोमेरी यांनी या बेली ब्रिजबाबत बोलताना एकदा म्हटले होते, “बेली ब्रिजशिवाय आम्ही हे युद्ध जिंकूच शकलो नसतो. आमच्याकडे असलेली ही सर्वोत्तम गोष्ट होती.” भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) पुस्तकामध्ये पुण्यातील संशोधन आणि विकास आस्थापनेचे (अभियंता) माजी संचालक एम. आर. जोशी यांनी लिहिलेय, “भारतीय सशस्त्र दलांनी आणि विशेषत: भारतीय सैन्याने ब्रिटिशांच्या बेली ब्रिजचा हा वारसा पुढे नेला.” १९७१ साली पाकिस्तानबरोबर झालेले युद्ध असो वा बांगलादेश मुक्तिसंग्राम असो; या दोन्हीही युद्धकाळामध्ये अशा प्रकारच्या बेली ब्रिजचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. याआधीही अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये २०२१ साली राज्यात अचानक आलेल्या पुरानंतर भारत-चीन सीमेवरील महत्त्वाच्या गावांमध्येही अशा प्रकारचे बेली पूल बांधण्यात आले होते. यासंदर्भातील महत्त्वाचे लेख : बेली ब्रिज म्हणजे काय? वायनाड दुर्घटनेनंतर असा पूल उभारण्याची गरज का भासली? यूपीएससी सूत्र संदर्भातील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा…