scorecardresearch

Premium

UPSC-MPSC : आधुनिक भारताचा इतिहास : फ्रान्सचा भारतातील प्रवेश, कर्नाटक युद्ध

Europeans In India : या लेखातून आपण फ्रान्सचा भारतातील प्रवेश, त्यांचा ब्रिटिशांशी झालेल्या संघर्षाबाबत जाणून घेऊया.

french entry in indian, Carnatic Wars
कर्नाटक युद्ध ( फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम )

मागील लेखात आपण पोर्तुगीज, डच आणि इंग्रजांच्या भारतातील आगमनाबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण फ्रान्सचा भारतातील प्रवेश, त्यांचा ब्रिटिशांशी झालेला संघर्ष आणि याच संघर्षातून झालेल्या तीन कर्नाटक युद्धांबाबत जाणून घेऊ या.

पोर्तुगीज, डच आणि ब्रिटिश व्यापाऱ्यांना भारतातील मसाल्याच्या व्यापारातून होत असलेला नफा बघून फ्रान्सचा राजा लुई १४वा याने त्याचा मंत्री कॉल्बर्ट ( Colbert ) याला भारतात व्यापार करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार कॉल्बर्टने इ.स. १६६४ साली ‘फ्रेंच ईस्ट इंडिया’ कंपनीची स्थापना केली. या कंपनीला ‘इण्डसे ओरिएंट लेस’ या नावानंही ओळखलं जातं असे. ‘फ्रेंच ईस्ट इंडिया’ ही कंपनी कॉल्बर्टने स्थापन केली असली, तरी या कंपनीवर फ्रान्सच्या राज्याचं संपूर्ण नियंत्रण होतं. या कंपनीला फ्रान्सच्या राजाकडून अनुदान, सवलती आणि इतर मदत दिली जात असे.

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
supriya sule on sunetra pawar baramati loksabha election
बारामतीतून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार? सुप्रिया सुळेंनी केलं स्वागत, म्हणाल्या…
bachchu kadu on pankaja munde
“…म्हणून पंकजा मुंडेंवर कारवाई झाली असावी”, बच्चू कडूंचं थेट विधान
supriya sule raj thackeray
“राज ठाकरेंचं कौतुक करते, कारण…”, सुप्रिया सुळे यांचं विधान

‘फ्रेंच ईस्ट इंडिया’ कंपनीने इ.स. १६६८ साली सुरतमध्ये आपली पहिली वखार ( Factory ) स्थापन केली. त्यानंतर दुसऱ्या वर्षी म्हणजे इ.स. १६६९ मध्ये त्यांनी मसुलीपट्टणम येथे दुसरी वखार सुरू केली. पॉंडिचेरी ( आताचे पुद्दुचेरी) हे ‘फ्रेंच ईस्ट इंडिया’ कंपनीचं मुख्यालय होतं. फ्रेंचांनी इथेच एक किल्लाही बांधला. त्याला ‘फोर्ट लुई’ या नावानं ओळखलं जातं. याशिवाय फ्रेंचांनी हिंद महासागरातील मॉरिशस आणि रियुनियन या बेटांवरही ताबा मिळवला.

हेही वाचा – Indian Modern History : ब्रिटिश आणि डचांचा भारतातील प्रवेश

पुढे इ.स. १७४२ मध्ये फ्रान्सच्या राजाने लॉर्ड ड्युप्ले याला भारताचा गव्हर्नर म्हणून नियुक्त केलं. लॉर्ड ड्युप्ले हा अतिशय महत्त्वाकांक्षी होता. फ्रान्सने भारतावर राज्य करावं तसंच जर फ्रान्सला भारतातील व्यापारातून नफा कमवायचा असेल तर येथील राजकीय परिस्थितीवर आपलं नियंत्रण असावं, असं त्याचं ठाम मत होतं. मात्र, फ्रान्सच्या भारतात येण्यापूर्वी डच, पोर्तुगीज आणि ब्रिटिश भारतात दाखल झाले होते. त्यांनी येथील व्यापारावर आपला जम बसवला होता. त्यामुळे भारतात व्यापार वाढवायचा असेल तर फ्रान्सचा युरोपीय देशांशी संघर्ष अटळ होता. याच संघर्षातून पुढे ब्रिटिश आणि फ्रान्स यांच्यात तीन युद्धन झाली. त्यालाच कर्नाटक युद्ध ( Carnatic War ) म्हणून ओळखलं जातं. आताचं तामिळनाडू आणि आजूबाजूचा प्रदेश त्या वेळी कर्नाटक प्रांत म्हणून ओळखला जायचा.

पहिलं कर्नाटक युद्ध ( इ.स. १७४६-४८)

भारतात ब्रिटिश आणि फ्रान्स यांच्यातील संघर्षाला युरोपची पार्श्वभूमी होती. इ.स. १७४२ ऑस्ट्रियात उत्तराधिकारी नेमण्यावरून इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यात युरोपमध्ये युद्धाला सुरुवात झाली. या युद्धाचं लोणं भारतातही पसरलं. या युद्धानंतर भारतातील त्यांच्या कंपन्यांमध्येही युद्ध सुरू झालं.

भारतातील ब्रिटिश आणि फ्रान्स यांच्यातील संघर्षाला युरोपची पार्श्वभूमी असली, तरी त्याला तत्कालीन कारणदेखील होतं. इ.स. १७४६ मध्ये ब्रिटिश अधिकारी कॅप्टन बार्नेड याने फ्रान्सची दोन जहाजं ताब्यात घेतली. त्यामुळे फ्रेंचांनी इंग्रजांना धडा शिकण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी कर्नाटकचा तत्कालीन नवाब अन्वरुद्दीनकडे मदत मागितली. मात्र, अन्वरुद्दीनने ड्युप्लेला मदत करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला.

अन्वरुद्दीनने मदत करण्यास नकार दिल्यानंतर ड्युप्लेने मद्रासवर स्वारी करून ते आपल्या ताब्यात घेतले. त्या वेळी मद्रास हे ब्रिटिशांचं मुख्य व्यापारी केंद्र होतं. पुढे ब्रिटिशांनी फ्रेंचांविरोधात अन्वरुद्दीनकडे मदत मागितली. या वेळी मात्र, अन्वरुद्दीनने ब्रिटिशांना मदत करण्याचं आश्वासन दिलं. त्यातूनच इ.स. १७४८ साली अन्वरुद्दीन आणि फ्रेंच यांच्यात सेंट टॉमी येथे युद्ध झाले. या युद्धात अन्वरुद्दीनचा पराभव झाला. याचदरम्यान युरोपमध्ये ब्रिटिश आणि फ्रान्स यांच्या एक्स-ला-शापेला ( Aix-la-chapelle) येथे एक तह झाला. या तहानुसार फ्रेंचांनी भारतातील मद्रास ब्रिटिशांना परत केले. तर ब्रिटिशांनी अमेरिकेतील लुईवर्ग शहर फ्रान्सला परत केले. या तहाबरोबरच पहिले कर्नाटक युद्ध समाप्त झाले.

दुसरं कर्नाटक युद्ध ( इ.स. १७४९- ५४)

पहिल्या कर्नाटक युद्धाची सुरुवात ऑस्ट्रियातील उत्तराधिकारी नेमण्यावरून झाली होती. तर दुसऱ्या कर्नाटक युद्धाची सुरुवात भारतातील उत्तराधिकारी नेमण्यावरून झाली. तत्कालीन भारतात हैदराबाद आणि कर्नाटक या दोन महत्त्वाच्या रियासती होत्या. हैदाराबादमध्ये निजाम-उल्-मुल्क याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा नासिरजंग आणि नातू मुझफ्फरजंग यांच्यात यादवी युद्ध सुरू झाले. तर दुसरीकडे कर्नाटकमध्ये नवाब अन्वरुद्दीनविरोधात चंदासाहेब याने कटकारस्थानं सुरू केली. याचाच फायदा फ्रेंच आणि ब्रिटिशांनी घेतला. फ्रेंच गव्हर्नर ड्युप्लेने हैदाराबादमध्ये निजाम-उल्-मुल्क याचा नातू मुझफ्फरजंग याला, तर कर्नाटकमध्ये चंदासाहेब याला पाठिंबा दिला. त्यामुळे ब्रिटिशांनी हैदाराबादमध्ये नासिरजंग आणि कर्नाटकमध्ये अन्वरुद्दीनला पाठिंबा देणं स्वाभाविक होतं.

europeans in india
फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफीक्स टीम

पुढे इ.स. १७४९ अंबर येथे फ्रेंच आणि अन्वरुद्दीन यांच्यात पुन्हा एकदा लढाई सुरू झाली. या लढाईत अन्वरुद्दीनचा मृत्यू झाला. तर अन्वरुद्दीनचा मुलगा महम्मद अली याने त्रिचनापल्ली येथे आश्रय घेतला. फ्रेंचांनी चंदासाहेब याला कर्नाटकचा नवाब बनवले. त्या वेळी चंदासाहेब याने फ्रेंचांना पॉंडिचेरीतील ८० गावं बक्षीस म्हणून दिली. दुसरीकडे हैदाराबादमध्येही फ्रेंचांची सरशी झाली. फ्रेंचांनी निजाम-उल्-मुल्क याचा नातू मुझफ्फरजंग याला नवाब बनवले. तसेच बुसी नावाच्या एका अधिकाऱ्याला काही सैनिकांच्या तुकडीसह हैदराबादमध्ये तैनात केले. काही दिवसांतच मुझफ्फरजंगचाही अपघाती मृत्यू झाला. फ्रेंचांनी लगेच मुझफ्फरजंगचा मुलगा सलाबतजंग याला गादीवर बसवले. त्या बदल्यात निझामांनी फ्रेंचांना मुस्ताफानगर, एल्लोर, राजमहेंद्री व चिकाकोल हा प्रदेश बक्षीस म्हणून दिला. या घटनेनंतर फ्रेंच सत्ता दक्षिण भारतात उत्कर्षाच्या सर्वोच्च बिंदूवर पोहोचली होती. लॉर्ड ड्युप्लेची योजना यशस्वी ठरली होती.

फ्रेंचांच्या वाढत्या प्रभावाला शह देण्यासाठी ब्रिटिशांनी अन्वरुद्दीनचा मुलगा महम्मद अली याला पाठिंबा देण्याचे ठरवले. ब्रिटिश अधिकारी रॉबर्ट क्लाइव्हने त्यासाठी योजना आखली. त्याने त्रिचनापल्ली येथे आश्रय घेतलेल्या महम्मद अलीवरील दबाव कमी करण्यासाठी कर्नाटकची राजधारी अर्काटवर स्वारी करून ते जिंकून घेतले. तसेच चंदासाहेब याला ठार केले. या युद्धात फ्रेंच सैनिकांचा पराभव झाला.

भारतातील युद्धांवर होणाऱ्या प्रचंड खर्चांमुळे इ.स. १७५४ साली फ्रान्सच्या राज्याने लॉर्ड ड्युप्ले याला माघारी बोलावून घेतले. तसेच गोडेहिओ याला गव्हर्नर म्हणून नियुक्त केले. इ.स. १७५४ साली ब्रिटिश आणि फ्रेंच गव्हर्नर गोडेहिओ यांच्यात पॉंडिचेरी येथे तह झाला आणि दुसरे कर्नाटक युद्ध समाप्त झाले.

तिसरं कर्नाटक युद्ध ( इ.स. १७५८ – ६३)

पहिल्या कर्नाटक युद्धाला ज्याप्रमाणे युरोपची पार्श्वभूमी होती. त्याप्रमाणे तिसऱ्या कर्नाटक युद्धालाही युरोपची पार्श्वभूमी होती. इ.स. १७५६ साली युरोपमध्ये ब्रिटिश आणि फ्रान्स यांच्यात पुन्हा एकदा युद्ध सुरू झाले. त्याचा परिणाम भारतातही जाणवला. युरोपमध्ये युद्ध सुरू होताच भारतातही फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात संघर्ष सुरू झाला. मात्र, या युद्धाच्या एक वर्षापूर्वीच इ.स. १७५७ साली प्लासीचे युद्ध झाले. या युद्धात ब्रिटिशांचा विजय झाला. ब्रिटिशांनी बंगालवर नियंत्रण मिळवले. बंगालची समृद्ध साधनसंपत्ती हाती येताच ब्रिटिशांचे पारडे जड झाले होते. पुढे २२ जानेवारी १७६० साली वांदीवॉश येथे फ्रेंच आणि ब्रिटिश यांच्यात निर्णायक युद्ध झाले. या युद्धात फ्रेंचांचा दारुण पराभव झाला. त्यामुळे भारतात मिळवलेला संपूर्ण प्रदेश एका वर्षातच फ्रेंचांना गमवावा लागला. इ.स. १७६३ साली पॅरिसमध्ये ब्रिटिश आणि फ्रान्स यांच्या एक तह झाला. त्यानुसार ब्रिटिशांनी फ्रेंचांकडून जिंकलेला सर्व प्रदेश आणि वखारी त्यांना परत केल्या. मात्र, या प्रदेशांची तटबंदी करता येणार नाही आणि फ्रेंचांना भारतात सैन्य ठेवता येणार नाही. अशी अट घातली. पॅरिस तहाबरोबरच तिसरे कर्नाटक युद्ध समाप्त झाले.

carnatic war upsc marathi
फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफीक्स टीम

फ्रान्सवर मिळवलेल्या विजयानंतर ब्रिटिशांनी समुद्रावर वर्चस्व स्थापन केलं. तसेच संपूर्ण भारत पादाक्रांत करण्याच्या मूळ उद्देशाच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं. पुढे इंग्रजांनी एका सामर्थ्यशाली सैन्याची उभारणीही केली.

हेही वाचा – Indian Modern History : पोर्तुगीजांचा भारतातील प्रवेश

कर्नाटक युद्धातील फ्रान्सच्या पराभवाची महत्त्वाची कारणं

  1. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी ही एक सरकारी कंपनी होती. त्यामुळे प्रत्येक निर्णयासाठी त्यांना फ्रान्सच्या सरकारवर अवलंबून राहावं लागत असे. कंपनीच्या कामात फ्रान्स सरकारचा हस्तक्षेप त्यांच्या पराभवाचं एक महत्त्वाचं कारण होतं.
  2. फ्रान्स सरकारकडून लॉर्ड ड्युप्लेला माघारी बोलावणं, ही फ्रान्स सरकारची सर्वात मोठी चूक ठरली. हेच कर्नाटक युद्धात फ्रान्सच्या पराभवाचं आणखी एक महत्त्वाचं कारण होतं.
  3. प्लासीच्या युद्धानंतर बंगालमध्ये ईस्ट इंडिया कंपनी अतिशय मजबूत स्थितीत होती. त्या वेळी ब्रिटिशांकडे कोलकाता, मुंबई आणि म्हैसूर ही तीन महत्त्वाची बंदरं होती, तर फ्रेंचांकडे फक्त पॉंडिचेरी होते. हे सुद्धा फ्रान्सच्या पराभवाचं एक महत्त्वाचं कारण होतं.
  4. ब्रिटिश आणि फ्रान्स यांच्यात युरोपमध्ये सुरू असलेल्या युद्धात ब्रिटिशांचा विजय झाला. त्याचा परिणाम काही प्रमाणात भारतातही दिसून आलं. हे सुद्धा कर्नाटक युद्धातील फ्रान्सच्या पराभवाचं एक कारण होतं

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-06-2023 at 10:00 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×