Modern Indian History In Marathi : मागील लेखांमधून आपण युरोपियनांचे भारतातील आगमन आणि व्यापारातून त्यांच्यात झालेल्या संघर्षाबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण मुघल साम्राज्याच्या उत्तरार्धाबाबत जाणून घेऊया. भारतीय इतिहासात मुघल साम्राज्याचा उत्तरार्ध हा इ.स. १७०७ ते इ.स. १८५७ पर्यंतचा काळ मानला जातो. इ.स. १७०७ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतरच मुघल साम्राज्याला उतरती कळा लागली होती. १८व्या शतकाच्या सुरुवातीला मुघलांचे विघटन आणि नंतर पतन झाले. इ.स. १८०३ मध्ये ब्रिटिशांनी दिल्ली काबीज केल्यानंतर पुढील काळात मुघलांना निवृत्तिवेतनधारक म्हणून जीवन जगावे लागले. इ.स. १७०७ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याची तीन मुले मुअज्जम, महम्मद आझम आणि कामबख्श यांच्यात गादीवरून संघर्ष पेटला. मुअज्जम त्या वेळी काबूलचा सुभेदार, तर महम्मद आझम गुजरातचा सुभेदार होता. औरंगजेबाच्या मृत्यूची माहिती मिळताच मुअज्जम दिल्ली आणि महम्मद आझम आग्र्यात दाखल झाले. गादीच्या संघर्षातून इ.स. १७०७ मध्ये दोघांत आग्र्याजवळ असलेल्या जजाऊ येथे युद्ध झाले. या युद्धात मुअज्जमने महम्मद आझमचा पराभव केला आणि तो मुघल बादशहा म्हणून गादीवर बसला. इ.स. १७०९ मध्ये मुअज्जम आणि कामबख्श यांच्यात युद्ध झाले. या युद्धातही मुअज्जमची सरशी झाली. पुढे हाच मुअज्जम बहादूरशहा प्रथम म्हणून ओळखला जाऊ लागला. हेही वाचा - UPSC-MPSC : आधुनिक भारताचा इतिहास : मुघल साम्राज्याचा उत्तरार्ध – भाग २ बहादूरशहा प्रथम (१७०७-१७१२) मुघल बादशाहा म्हणून गादीवर बसताना बहादूरशहाचे वय साधारण ६३ वर्षे होते. तो सुशिक्षित आणि भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा होता. गादीवर बसताच त्याने औरंगजेबाच्या कडव्या इस्लामिक धोरणांमध्ये बरेच बदल केले. त्याने हिंदू राजा आणि जनतेविरोधात सहिष्णू दृष्टिकोन बाळगला. सर्वप्रथम त्याने मुघालांच्या कैदेत असलेल्या शाहू राजांची सुटका केली. मात्र, महाराणी ताराबाई आणि शाहू राजांमधील संघर्षात त्याने हस्तक्षेप केला नाही. परिणामी मराठा साम्राज्य अस्थिर राहिले. बहादूरशहाने शिखांचे १०वे गुरू, गुरू गोविंदसिंग यांनाही उच्च मनसबदारी दिली. मात्र, त्यांच्या निधनानंतर बंदाबहादूर यांच्या नेतृत्वात शिखांनी पुन्हा बहादूरशहाविरोधात उठाव केला. या संघर्षादरम्यानच फ्रेबुवारी १७१२ मध्ये बहादूरशहाचा मृत्यू झाला. बहादूरशहाने त्याच्या काळात कोणतीही पर्वा न करता अनेकांना जहागिऱ्या वाटल्या. तसेच काही अधिकाऱ्यांना बढतीही दिली. त्यामुळे मुघलांची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी ढासळली होती. जहाँदारशहा (१७१२-१७१३) बहादूरशहाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्यात एक नवीन प्रवृत्ती पुढे आली. पूर्वी बादशहाच्या मृत्यूनंतर गादीवर कोण बसणार? यासाठी राजपुत्रांमध्ये संघर्ष होत असे. मात्र, आता उमरावांमध्ये हा संघर्ष होऊ लागला. यातून मुघल दरबारात उमरावांचे अनेक गट पडले. या संघर्षादरम्यान झुल्फिकार खान या उमरावाच्या पाठिंब्याने बहादूरशहाचा मोठा मुलगा जहाँदारशहा मुघल बादशहा म्हणून गादीवर बसला. जहाँदारशहा हा वाया गेलेला राजपुत्र होता. तो नेहमी ऐषोआरामात मग्न असे. त्यामुळे राज्याच्या प्रशासनाची संपूर्ण सूत्रे ही झुल्फिकार खानाच्या हातात होती. हेही वाचा - Modern Indian History : फ्रान्सचा भारतातील प्रवेश, कर्नाटक युद्ध जहाँदारशहानेही बहादूरशहाप्रमाणेच हिंदू राजांबाबत सहिष्णू दृष्टिकोन बाळगला. त्याने राजपुतांबरोबरील संबंध सुधारण्यासाठी अंबरचा राजा जयसिंग याला 'मिर्झा राजे सवाई' हा किताब देऊन त्याची माळव्याच्या सुभेदारपदी नियुक्ती केली. तर मारवाडचा राजा अजित सिंह याला गुजरातचे सुभेदारपद दिले. याशिव्याय त्याने मराठ्यांबरोबरही संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले. त्याने मराठ्यांना दख्खनमध्ये चौथाई वसूल करण्याचे अधिकार दिले. जहाँदारशहाच्या काळात मुघल साम्राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्यासाठीही प्रयत्न करण्यात आले. यासाठी इझारा ही कर वसुलीची नवी व्यवस्था लागू करण्यात आली. या व्यवस्थेद्वारे शेतकऱ्यांकडून थेट कर वसूल न करता त्यासाठी कंत्राटे देण्यात आली. मात्र, कंत्राटदाराने शेतकऱ्यांकडून किती कर वसूल करावा, यावर कोणतेही नियंत्रण नव्हते.