२५ मे २०२५ रोजी यूपीएससी पूर्वपरीक्षा असून त्यासाठी २ जानेवारी २०२५ पासून ‘यूपीएससीची तयारी’ या सदरात लेखमाला सुरू केली होती. या लेखात परीक्षेच्या आधी शेवटच्या आठवड्यात आपण काय तयारी करायला हवी ते समजून घेवूयात.
यूपीएससी पूर्वपरीक्षेच्या शेवटच्या आठवड्यात आपण ज्ञान एकत्रित करण्यावर, मॉक टेस्टमधील चुका सुधारण्यावर आणि मुख्य विषयांना प्राधान्य देण्यावर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित आहे.
या काळात नवीन अभ्यास साहित्य, नोट्स याकडे न जाता याआधी आपण जे साहित्य अभ्यासले आहे त्यावरच आपण काम करणे अपेक्षित असते. बहुतेदा आपल्या आजूबाजूला अभ्यासिकेत नवीन साहित्य बघून ते वाचण्याची आपली इच्छा होऊ शकते. ही नैसर्गिक बाब आहे.
खालीलप्रमाणे तुमची रणनीती असावी :
● अधिक गुण देणाऱ्या विषयांना प्राधान्य द्या :
१४ जानेवारी रोजी प्रकाशित ह्यजीएस’ची तयारीह्ण या लेखात विषयानुरुप गेल्या ४ वर्षातील प्रश्न संख्या दिलेली आहे. आपल्याला ज्या विषयांवर नियमितप्रमाणे जवळपास १५ प्रश्न विचारले जातात त्यांची उजळणी या काळात व्हायला हवी. यात राज्यघटना, भूगोल व पर्यावरण, अर्थशास्त्र व चालू घडामोडी यांचा विचार आपण करू शकतो. या विषयात गुणही चांगले मिळण्याची शक्यता अधिक असते.
● स्वत:च्या नोट्स अभ्यासाने :
अभ्यास करताना आपण ज्या नोट्स काढतो त्यांचे रिवीजन या काळात व्हायला हवे. परीक्षाभिमुख व संक्षिप्त नोट्स अभ्यासल्यास त्यामुळे कमी वेळेत अधिक अभ्यास होतो तसेच आपला आत्मविश्वासही वाढतो. यूपीएससीची तयारी करताना अभ्यासाच्या लांबलचक साहित्याचे छोटे, सुलभ उजळणी करता येतील अशा नोट्समध्ये रूपांतर करणे अपेक्षित असते. मोठमोठी पुस्तके या काळात आपल्यासाठी रिवीजन करण्यास उपयुक्त नसतात.
● मॉक टेस्टमधील चुका सुधारणे :
आपण पूर्वपरीक्षेची तयारी करताना ज्या मॉक टेस्ट देतो त्यातील आपले चुकलेले प्रश्न वा आपल्याला माहित नसलेल्या घटकावर विचारलेले प्रश्न यांचा आढावा घेणे गरजेचे असते. त्यात ‘संकल्पना’ व ‘तथ्ये’ या दोन्ही बाबींचा विचार व्हायला हवा.
● चालू घडामोडींची उजळणी :
चालू घडामोडी व त्यांचा इतर विषयांशी असलेला संबंध बघता अपेक्षित असलेल्या प्रश्नांवर काम करायला हवे. चालू घडामोडींतील विविध विषयांशी संबंधित नवीन संकल्पना विचारण्यावर आयोगाचा भर नेहमीच राहिलेला आहे. तेव्हा अशा संकल्पना आवर्जून अभ्यासा.
● सीसॅटचा नियमित सराव :
सीसॅट हा जरी पात्रतेचा पेपर असला तरी त्याचा सराव परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यातही नियमितपणे करणे अपेक्षित आहे. २०२३ मधील सीसॅटचा पेपर आपल्याला स्पष्टपणे सांगतो की २०० पैकी ६६ गुण घेणंही अवघड होवून बसत जेव्हा अपेक्षित प्रश्न समोर नसतात. तेव्हा सीसॅटमधील गतवर्षीच्या प्रश्नांच्या विश्लेषणाच्या आधारे अभ्यास करा.
● जीएसच्या गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका बघा : जीएसच्या मागील १० वर्षातील प्रश्नपत्रिका नजरेसमोरून जायला हव्यात. त्यातील प्रश्न, पर्याय यांचे निरीक्षण करा. यावरून आपल्याला आयोगाची प्रश्न विचारण्याची वृत्ती समजून घेता येते.
● मानसिक व शारीरिक स्वास्थ्य :
या काळात शांत राहणे अपेक्षित असते. ध्यान, व्यायाम आणि पुरेशी झोप घेऊन मानसिक आणि शारीरिक आरोग्याला प्राधान्य तुम्ही प्राधान्य द्यायला हवे. स्वत:वर विश्वास ठेवा. परीक्षेच्या ताणतणावावर मात करण्यासाठी या बाबी गरजेच्या आहेत.
काही तांत्रिक बाबी
यूपीएससीने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर पूर्वपरीक्षेसाठी प्रवेशपत्रे जारी केली आहेत. स्वत:चे परीक्षा केंद्र कुठे आहे, तेथे जाण्याची तुमची व्यवस्था करणे व शक्य असेल तर आदल्या दिवशी परीक्षा केंद्राला भेट द्या. सध्याचे वादळी व पावसाळी वातावरण याचाही विचार तुम्ही करणे अपेक्षित आहे. विशेषत: मुंबईमध्ये याचा परिणाम लोकलच्या यंत्रणेवर होतो. रविवारी बहुतेकदा मुंबईत मेगा ब्लॉक असतो. त्यानुसार तुमची प्रवास व्यवस्था करा. अगदीच सकाळी २-३ तासांचा प्रवास करून परीक्षेला जाणे टाळा. आदल्या दिवशी जर तुम्ही केंद्राच्या जवळपास राहण्याची व्यवस्था केली तर तुम्ही निवांतपणे दुसऱ्या दिवशी परीक्षेला जावू शकता.
● आयोगाने उमेदवारांना परीक्षा केंद्रात फक्त खालील वस्तू घेऊन जाण्याची परवानगी दिली आहे:
● ई-प्रवेशपत्राचे प्रटिंआउट
● पेन आणि पेन्सिल
● वैध फोटो ओळखीचा पुरावा
● स्वत:चे फोटो (लागू असेल तिथे)
● ई-प्रवेशपत्राच्या सूचनांमध्ये विशेषत: नमूद केलेल्या इतर कोणत्याही वस्तू
● उमेदवारांना काळा बॉलपॉइंट पेन आणण्याचा सल्ला देण्यात आला आहे, कारण तो ओएमआर उत्तरपत्रिका आणि उपस्थिती पत्रक भरण्यासाठी आवश्यक असेल.
● उमेदवारांनी पेपर सुरू होण्याच्या किमान ३० मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर पोहोचणे अपेक्षित आहे. सकाळचे सत्र सकाळी ९.३० वाजता सुरू होईल आणि परीक्षा हॉलमध्ये प्रवेश सकाळी ९ वाजता बंद होईल. त्याचप्रमाणे, दुपारी २.३० वाजता सुरू होणाऱ्या दुपारच्या सत्रासाठी प्रवेश दुपारी २ वाजता बंद होईल.
● जर एखाद्या उमेदवाराने त्याचे नाव बदलले असेल, तर त्यांनी पूर्वपरीक्षेच्या प्रत्येक सत्रासाठी परीक्षा केंद्रावर बदललेले नाव दर्शविणारा सरकारने जारी केलेला फोटो आयडी सादर करावा. असे न केल्यास परीक्षा परिसरात प्रवेश नाकारला जाऊ शकतो.
● परीक्षा हॉलमध्ये साधे किंवा अॅनलॉग मनगटी घड्याळांचा वापर करण्यास परवानगी आहे. स्मार्टवॉच किंवा संप्रेषण साधन म्हणून काम करू शकणाऱ्या कोणत्याही उपकरणासह विशेष अॅक्सेसरीज असलेले घड्याळ आणण्यास सक्त मनाई आहे.
पुढील लेखात आपण पेपर सोडवितानाची रणनीती समजून घेणार आहोत. जेणेकरून २५ मे रोजी होणाऱ्या यूपीएससी पूर्वपरीक्षेला आपण अधिक चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकतो.
sushilbari10 @gmail. com