शासकीय योजनांचा अभ्यास करताना योजनेचा उद्देश, योजनेचे मंत्रालय, जर काही विशिष्ट ध्येय निश्चित केले असतील तर त्याबाबत आपण माहिती घ्यायला हवी.
पुढील प्रश्न बघा –
प्र. राष्ट्रीय गोकुळ मिशनबाबत खालील विधानांचा विचार करा:
- I. ग्रामीण गरिबांच्या उत्थानासाठी हे मिशन महत्त्वाचे आहे, कारण कमी उत्पादन देणारे बहुतांश देशी प्राणी हे अल्पभूधारक, सीमांत शेतकरी आणि भूमीहीन मजुरांकडे आहेत.
- II. देशी गायी आणि म्हशींचे पालन आणि संवर्धन शास्त्रीय आणि सर्वांगीण पद्धतीने करण्यासाठी याची सुरुवात करण्यात आली.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
- a) फक्त I
- b) फक्त II
- c) I आणि II दोन्ही
- d) I किंवा II यांपैकी कोणतेही नाही
भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयांतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागातर्फे राष्ट्रीय गोकुळ मिशन (RGM) सुरू करण्यात आले.
विधान १ बरोबर आहे: राष्ट्रीय गोकुळ मिशन ग्रामीण गरिबांच्या उत्थानासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण ८०% पेक्षा जास्त कमी उत्पादन देणारे देशी प्राणी हे अल्पभूधारक, सीमांत शेतकरी आणि भूमीहीन मजुरांकडे आहेत.
विधान २ बरोबर आहे: देशी गायी आणि म्हशींच्या जातींचे पालन आणि संवर्धन शास्त्रीय आणि सर्वांगीण पद्धतीने करण्यासाठी राष्ट्रीय गोकुळ मिशन सुरू करण्यात आले. या मिशनचे उद्दिष्ट देशी जातींची उत्पादकता वाढवणे, त्यांच्यातील अनुवांशिक विविधता जतन करणे आणि ग्रामीण उपजीविका सुधारणे हे आहे.
प्र. ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजने’बाबत खालील विधानांचा विचार करा:
- I. निवासी क्षेत्रात एक कोटी सौर रूफटॉप पॅनेल बसवण्याचे याचे उद्दिष्ट आहे.
- II. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे उद्दिष्ट तळागाळात सौर रूफटॉप प्रणालीची स्थापना, संचलन, देखभाल आणि दुरुस्तीचे प्रशिक्षण देणे हे आहे.
- III. क्षमता बांधणी या घटक योजनेअंतर्गत नवीन कौशल्य विकास आणि कौशल्य वृद्धीद्वारे तीन लाखांहून अधिक कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचे याचे उद्दिष्ट आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
- a) फक्त I आणि II
- b) फक्त I आणि III
- c) फक्त II आणि III
- d) I, II आणि III
विधान I बरोबर आहे : फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरू झालेली ‘पीएम सूर्य घर: मोफत वीज योजना’ हा भारत सरकारचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. मार्च २०२७ पर्यंत निवासी क्षेत्रातील एक कोटी (१० दशलक्ष) घरांमध्ये रूफटॉप सोलर पॅनेल बसवणे हे याचे उद्दिष्ट आहे.
विधान II बरोबर आहे: नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने या योजनेअंतर्गत ‘क्षमता बांधणी’च्या महत्त्वावर भर दिला आहे. सौर रूफटॉप प्रणालीची स्थापना, संचलन, देखभाल आणि दुरुस्ती यावर तळागाळात प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे.
विधान III बरोबर आहे : ३ लाखांहून अधिक व्यक्तींना प्रशिक्षित करणे: नवीन कौशल्य आणि कौशल्य वृद्धी
कार्यक्रमांच्या संयोजनाद्वारे हे साध्य केले जाईल.
विशेष भूमिका : यापैकी किमान १ लाख व्यक्तींना ‘सोलर पीव्ही तंत्रज्ञ’ म्हणून प्रशिक्षित केले जाईल, जे फोटोव्होल्टेइक प्रणालीमध्ये तज्ञ असतील.
हे सर्व उपक्रम योजनेच्या ‘क्षमता बांधणी’ घटकाचा भाग आहेत, ज्याचा उद्देश सौर ऊर्जा परिसंस्थेमध्ये योगदान देण्यासाठी व्यक्तींना आवश्यक कौशल्यांनी सक्षम करणे हा आहे.
खालील प्रश्न बघा.
प्र. भारताच्या संदर्भात, खालील जोड्यांचा विचार करा
संस्था
केंद्रीय मंत्रालय
१. नॅशनल ऑटोमोटिव्ह बोर्ड
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय
२. कोइर बोर्ड
अवजड उद्योग मंत्रालय
३. नॅशनल सेंटर फॉर ट्रेड इन्फॉर्मेशन
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
वरीलपैकी किती जोड्या अचूक जुळलेल्या आहेत?
- a) फक्त एक
- b) फक्त दोन
- c) तिन्ही
- d) एकही नाही
जोडी १ चुकीची आहे: नॅशनल ऑटोमोटिव्ह बोर्ड हे अवजड उद्योग मंत्रालयांतर्गत कार्य करते. नॅशनल ऑटोमोटिव्ह बोर्डाची स्थापना ऑक्टोबर २०१२ मध्ये करण्यात आली आणि ऑगस्ट २०१३ मध्ये ‘सोसायटी नोंदणी कायद्यांतर्गत त्याची नोंदणी झाली.
जोडी २ चुकीची आहे: कोइर बोर्ड हे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयांतर्गत येते. देशातील कोइर (काथ्या) उद्योगाच्या सर्वांगीण शाश्वत विकासासाठी भारत सरकारने ‘कोइर उद्योग कायदा, १९५३’ अंतर्गत कोइर बोर्डाची स्थापना केली. या कायद्यांतर्गत बोर्डाच्या कार्यांमध्ये वैज्ञानिक, तांत्रिक आणि आर्थिक संशोधन करणे, सहाय्य करणे आणि प्रोत्साहन देणे, तसेच आधुनिकीकरण, गुणवत्ता सुधारणे, मानव संसाधन विकास, बाजारपेठ प्रोत्साहन आणि या उद्योगात गुंतलेल्या सर्वांच्या कल्याणाचा समावेश होतो.
जोडी ३ चुकीची आहे: नॅशनल सेंटर फॉर ट्रेड इन्फॉर्मेशन ची स्थापना वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाद्वारे करण्यात आली आहे. व्यापारविषयक डेटा गोळा करणे, त्याचे प्रसार करणे आणि व्यावसायिक माहिती सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा तयार करण्याच्या उद्देशाने याची स्थापना करण्यात आली आहे.
या प्रश्नावरून आपल्याला विविध मंत्रालये आणि त्याअंतर्गत कार्यरत संस्था माहित असणे अपेक्षित आहे. तसेच भारताचा अर्थसंकल्प व आर्थिक पाहणी आपण अभ्यासाने अपेक्षित आहे. गतवर्षीचे प्रश्न बघून अभ्यासाची दिशा निश्चित केल्यास यश नक्कीच मिळते.
