आपण २४ मे २०२६ रोजी झालेल्या यूपीएससी पूर्व परीक्षेतील ‘जीएस’ पेपरचे विश्लेषण बघितले आहे. आजच्या लेखात आपण ‘सीसॅट’ पेपरचे विश्लेषण बघणार आहोत.

यूपीएससी पूर्व परीक्षेत ‘सीसॅट’ हा पात्रतेचा पेपर असून यात २०० गुणांपैकी ६६ गुण घेणे अपेक्षित आहे.

यूपीएससी पूर्व परीक्षा २०२६ सीसॅट घटकनिहाय प्रश्न संख्या

घटक                                                 अंदाजित संख्या

क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि डेटा सफिशियन्सी            ३३

रीडिंग कॉम्प्रिहेन्शन २४

लॉजिकल आणि ॲनालिटिकल रिझनिंग १७

इंटरपर्सनल आणि कम्युनिकेशन स्किल्स ६

क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड : यात सूत्र आधारित गणिताला बाजूला सारून त्याऐवजी ‘डेटा सफिशियन्सी’ (माहितीची संपुष्टता) आणि ‘नंबर सिस्टीम’ (संख्या पद्धती) यांवर अधिक भर दिलेला होता.

नंबर सिस्टीम आणि अल्जेब्रा: एकक स्थानच्या अंकांचा समावेश असलेल्या प्रश्नांसाठी प्रदीर्घ गणितांपेक्षा संकल्पनात्मक स्पष्टतेची आवश्यकता असते हे समजून तुम्ही त्यानुसार अभ्यास करायला हवा.

अप्लाईड मॅथेमॅटिक्स : या पेपरमध्ये परिस्थितीजन्य अंकगणितावर मोठा भर देण्यात आला आहे. जसे की, मर्यादित वजनांच्या साहाय्याने अचूक वजन मोजणे, बदलत्या वेगासह वर्तुळाकार ट्रॅकवरील छेदनबिंदू शोधणे आणि मिश्रणाचे क्लिष्ट प्रश्न.

खालील प्रश्न बघा –

प्र. x, y आणि z हे तीन चल (वेरीएबल) २,३,४ किंवा ५ यांपैकी अशी मूल्ये घेतात की त्यांची मूल्ये नेहमी एकमेकांपासून भिन्न असतात. जर M आणि N हे अनुक्रमे {(x×y) z} या पदावलीचे सर्वात मोठे संभाव्य मूल्य आणि सर्वात लहान संभाव्य मूल्य दर्शवत असतील, तर M−N=

(अ) ११ (ब) १२ (क) १३ (ड) १४

रीडिंग कॉम्प्रिहेन्शन: यातील उतारे वैचारिकदृष्ट्या सखोल आहेत आणि त्यासाठी मजबूत तार्किक विचारांची गरज आहे. हे उतारे केवळ साध्या तथ्य-शोधनाच्या पलीकडे जाऊन, वैध गृहीतके आणि तार्किक निष्कर्षांचे मूल्यमापन करतात. यासाठी नियमित उताऱ्यांचे वाचन असावे. याकरिता वृत्तपत्रातील संपादकीय लेख तुम्ही वाचायला हवेत. या पेपरमधील उताऱ्यांमध्ये विविध समकालीन आणि प्रशासकीय विषयांचा समावेश असून शेतीमध्ये एआयचा वापर, हवामान बदल धोरणे आणि आर्थिक अभिसरण सिद्धांत

.चा समावेश करण्यात आला आहे.

प्रश्नांची रचना – प्रश्नांमध्ये वारंवार ‘वैध गृहीतक’ किंवा ‘लेखकाचा हेतू’ ओळखण्यास विचारले जाते, ज्यामुळे स्पष्ट तथ्ये आणि गर्भित तर्क यांमधील फरक समजून घेण्याच्या क्षमतेची चाचणी होते.

खालील प्रश्न बघा –

ईमेल आणि संताप आणणारे ते व्हॉईस मेन्यू (आवाज पर्याय) यांसह ग्राहक-सेवा तंत्रज्ञानाच्या मागील लाटांमुळे नोकऱ्या जाण्याची चिंता वाढली होती, परंतु प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. एआय मात्र यापेक्षा वेगळे ठरू शकते. आणि जर तसे झाले, तर त्याचे परिणाम हितकारक असू शकतात. मानवी प्रतिनिधी त्यांचा अधिक वेळ सर्जनशील आणि फायद्याच्या कामांवर खर्च करण्यासाठी मोकळे होऊ शकतात, जसे की उत्पादने आणि सेवा अधिक चांगल्या बनवण्यासाठी ग्राहकांच्या अभिप्रायाचा वापर करणे; आणि यामुळे चिडलेल्या ग्राहकांचे ऐकण्यात त्यांचा कमी वेळ जाईल!

प्र. खालीलपैकी कोणते विधान दिलेल्या उताऱ्याचा दृष्टिकोन सर्वात योग्यरित्या दर्शवते?

(अ) जर एआय ने ग्राहक सेवा पूर्णपणे ताब्यात घेतली, तर मानवी घटकांसाठी कोणतेही काम उरणार नाही.

(ब) त्रासदायक व्हॉईस मेन्यू आणि ईमेल हे मानवी नोकऱ्या तितक्या प्रमाणात कमी करू शकले नाहीत, जितक्या प्रमाणात एआय करू शकते.

(क) एआय मुळे प्रभावित झालेल्या कामाच्या ठिकाणी, मानवी हस्तक्षेपाचे मूल्य अधिक समाधानकारक कामांकडे वळवून वाढवले जाऊ शकते.

(ड) ग्राहक-सेवा तंत्रज्ञानातील मागील लाटांच्या विपरीत, एआय ने कामगार बदलले जाण्याची (नोकऱ्या जाण्याची) भीती निर्माण केली आहे.

लॉजिकल रिझनिंग : यात सरळ सोप्या सिलॉजिझम्स ऐवजी (प्रश्न ४८ चा अपवाद वगळता) आयोगाद्वारे बहुस्तरीय कोडी विचारली आहेत. रंगवलेले पृष्ठभाग ओळखणे किंवा भरीव घनाकृतीवरील काप कल्पनेत पाहणे यांसारख्या प्रश्नांसाठी उच्च अवकाशीय बुद्धिमत्तेची (स्पेशिअल व्हिज्युअलायझेशन) आवश्यकता असते. वर्तुळाकार बैठक व्यवस्था आणि वाहनांच्या वितरणाशी संबंधित कोड्यांमध्ये अनेक परस्परव्यापी अटी असतात. वेळेच्या दबावाखाली हे अचूकपणे सोडवण्यासाठी पद्धतशीर सारणीकरणाची आवश्यकता असते.

यासंबंधीचा प्रश्न बघा –

प्र. QUEUE या शब्दातील अक्षरांची अदलाबदल करून किती शब्द तयार करता येतील, जर ‘Q’ नंतर नेहमी ‘U’ येत असेल? या प्रकारे तयार होणाऱ्या शब्दांना अर्थ असणे आवश्यक नाही.

(अ) ६ (ब) ८ (क) १० (ड) १२

प्रशासकीय अभियोग्यता : या पेपरमधील सर्वात लक्षवेधी घटक म्हणजे ‘इंटरपर्सनल स्किल्स आणि कम्युनिकेशन’चा समावेश होय. उमेदवारांची संवादामधील संस्थात्मक अडथळे, सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण कार्यालयांमधील संघर्ष निवारण आणि प्रशासकीय साधनांचे विशिष्ट वापरकर्ते यांवर चाचणी घेणे, हे केवळ बौद्धिक क्षमतेपेक्षा त्यांच्या प्रशासकीय तयारीची परीक्षा घेणारे आहे. मधील काळात यावर तेवढे प्रश्न विचारलेले दिसून येत नाही. पुढील प्रश्न बघा –

प्र. सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण कर्मचारी असलेल्या कार्यालयातील परस्पर संबंधांमधील संघर्ष सोडवण्यासाठी खालीलपैकी कोणती कृती सर्वात योग्य मार्गदर्शक तत्त्व/आदेश ठरेल?

१. कर्मचाऱ्यांना अशा क्रियाकलापांचा सराव करण्याचा आदेश देणे, जे विविध गटांचे सांस्कृतिक दर्शक आहेत.

२. नेतृत्वाचा एक योग्य वस्तुपाठ घालून देण्यासाठी संघर्ष काळाच्या ओघात आपोआप सुटू देणे.

३. कर्मचाऱ्यांना एकमेकांचे दृष्टिकोन समजून घेण्यास प्रोत्साहन देणे.

खाली दिलेल्या संकेतांकाचा वापर करून योग्य उत्तर निवडा.

(अ) १ आणि ३

(ब) २ फक्त

(क) ३ फक्त

(ड) २ आणि ३

लक्षात ठेवा ‘सीसॅट’ म्हणजे फक्त ‘सराव’!

sushilbari10@gmail.com