चालू घडामोडींचा अभ्यास करताना आपल्या इतर विषयांशी जोडून आपल्याला त्यांचा विचार करावा लागतो यातून आपल्याला स्टॅटिक अभ्यासक्रमातील अपेक्षित प्रश्नही मिळतात.

यामुळेच स्टॅटिक विषयांशी भक्कम जोड देऊन मागील १२-१८ महिन्यांच्या चालू घडामोडींवर लक्ष केंद्रित करा. ओव्हरलोड टाळण्यासाठी एका विश्वसनीय स्रोताचा (वृत्तपत्र मासिक) वापर करा. पर्यावरण, योजना, विज्ञान आणि आंतरराष्ट्रीय संबंध यांसारख्या विषयांना प्राधान्य द्या. कीवर्ड्स, तथ्ये आणि उदाहरणांसह संक्षिप्त नोट्स तयार करा.

नवीन स्रोत वाचण्याऐवजी अनेक वेळा उजळणी करा. प्रश्नांचे स्वरूप, विशेषतः विधानांवर आधारित प्रश्न समजून घेण्यासाठी मागील वर्षांचे प्रश्न आणि बहुपर्यायी प्रश्नांचा सराव करा. पाठांतराऐवजी संकल्पनांवर भर द्या. अहवाल, निर्देशांक आणि संस्थांचा पद्धतशीरपणे मागोवा घ्या. सरावादरम्यान एलिमिनेशन पद्धतीचा वापर करा. पूर्व परीक्षेत अचूकता वाढवण्यासाठी सातत्यपूर्ण उजळणी आणि स्टॅटिक विषयांसह एकत्रीकरण ही गुरुकिल्ली आहे.

२०२६ च्या पूर्वपरीक्षेसाठी आपण या घटकांचा सर्वाधिक अपेक्षित घटक म्हणून अभ्यास करणे अपेक्षित आहे. हे घटक खालीलप्रमाणे आहेत –

१. आंतरराष्ट्रीय संबंध

  • जी२० – भारताच्या अध्यक्षपदाचे निष्कर्ष (डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा)
  • ब्रीक्स् विस्तार – नवीन सदस्य देश
  • भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडोर (आयएमईसी)
  • क्वाड उपक्रम
  • शांघाय सहकार्य संघटना – सदस्यत्व आणि भूमिका

२. पर्यावरण आणि हवामान

  • कॉप हवामान वित्तपुरवठा आणि ‘हानी व नुकसान’ निधी
  • भारतातील नवीन रामसर स्थळे
  • राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन
  • कार्बन मार्केट फ्रेमवर्क (भारत)
  • आयपीसीसी आणि यूएनईपी अहवाल

३. विज्ञान आणि तंत्रज्ञान

  • चंद्रयान-३ (चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग)
  • आदित्य-L1 (सौर मोहीम)
  • गगनयान मोहीम
  • क्रिस्पर जीन एडिटिंग
  • क्वांटम कॉम्प्युटिंगची मूलभूत तत्त्वे

४. अर्थव्यवस्था

  • डिजिटल रुपया (सीबीडीसी)
  • महागाई आणि रेपो रेटचा कल
  • पीएलआय योजना (उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन)
  • ओएनडीसी (ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स)
  • निर्गुंतवणूक धोरण

५. राज्यव्यवस्था आणि प्रशासन

  • नवीन फौजदारी कायदे (भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष)
  • महिला आरक्षण कायदा
  • सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निकाल
  • निवडणूक आयोग सुधारणा
  • ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’

६. संरक्षण

  • अग्नी आणि ब्राह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली
  • संरक्षण सराव (मलबार, युद्ध अभ्यास)
  • स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञान (आत्मनिर्भर भारत)
  • ड्रोन्स आणि अँटी-ड्रोन यंत्रणा
  • सायबर सुरक्षा उपक्रम

७. कृषी

  • आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष (श्री अन्न)
  • नैसर्गिक शेती उपक्रम
  • पीएम-किसान योजना
  • ई-नाम प्लॅटफॉर्म
  • अन्न सुरक्षा बफर मानके

८. आरोग्य

  • आयुष्मान भारत योजना
  • प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
  • अँटीबायोटिक प्रतिरोध
  • नवीन आजारांच्या साथी
  • पोषण अभियान

९. कला आणि संस्कृती

  • नवीन युनेस्को जागतिक वारसा स्थळे
  • जीआय टॅग्स (अलीकडील भर)
  • चर्चेतील सांस्कृतिक उत्सव
  • शास्त्रीय नृत्यांची मान्यता
  • चर्चेतील महत्त्वाच्या ऐतिहासिक व्यक्ती

१०. अहवाल आणि निर्देशांक

  • मानवी विकास निर्देशांक
  • जागतिक भूक निर्देशांक
  • शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांक
  • जागतिक बँक आणि आयएमएफचे अहवाल
  • पर्यावरण कामगिरी निर्देशांक

‘चालू घडामोडी’ या विषयातील पूर्व परीक्षेसाठीचे महत्त्वाचे १५ घटक

  • १. जी२० आणि ब्रीक्स
  • २. भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडोर (आयएमईसी)
  • ३. कॉप हवामान वित्तपुरवठा
  • ४. रामसर स्थळे
  • ५. चंद्रयान / गगनयान
  • ६. क्रिस्पर जीन एडिटिंग / कृत्रिम बुद्धिमत्ता
  • ७. डिजिटल रुपया
  • ८. पीएलआय योजना
  • ९. नवीन फौजदारी कायदे
  • १०. संरक्षण सराव
  • ११. तृणधान्ये
  • १२. आयुष्मान भारत
  • १३. युनेस्को स्थळे
  • १४. जीआय टॅग्स
  • १५. जागतिक निर्देशांक

उदा. आपण भारतातील जुलै २०२५ मध्ये जाहीर झालेले भारताचे ४४ वे जागतिक वारसा स्थळ बघूयात.

“भारताची मराठा लष्करी भूदृश्ये” (मराठा मिलिटरी लँडस्केपस् ऑफ इंडिया) हे महाराष्ट्र आणि तामिळनाडू मधील १२ धोरणात्मकरीत्या तयार केलेल्या आणि एकमेकांशी जोडलेल्या किल्ल्यांचे जाळे आहे, ज्यांचा जुलै २०२५ मध्ये युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून समावेश करण्यात आला. हे किल्ले (ज्यामध्ये रायगड, सिंधुदुर्ग आणि जिंजी यांचा समावेश आहे) डोंगर, किनारपट्टी आणि जंगल तटबंदीच्या एका अद्वितीय प्रणालीचे प्रतिनिधित्व करतात.

१२ किल्ले : साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग (११ किल्ले महाराष्ट्रात) आणि जिंजी किल्ला (तामिळनाडू).

लष्करी नैपुण्य : हे किल्ले मराठ्यांच्या नाविन्यपूर्ण अभियांत्रिकीचे प्रदर्शन करतात, ज्यामध्ये संरक्षक तटबंदीची नैसर्गिक वैशिष्ट्ये जसे की उंच डोंगर (उदा. रायगड, राजगड) आणि सागरी वातावरण (उदा. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग) यांच्याशी सांगड घातली आहे.

ऐतिहासिक महत्त्व : मराठा साम्राज्याचा उदय आणि विस्तारासाठी ही स्थळे केंद्रस्थानी होती. उदाहरणार्थ, शिवनेरी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे, रायगड ही राजधानी होती आणि प्रतापगडमध्ये अफजलखाना विरुद्ध झालेल्या युद्धासाठी प्रसिद्ध आहे.

व्यवस्थापन आणि संरक्षण

या स्थळांचे व्यवस्थापन प्रामुख्याने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण किंवा पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे केले जाते. नामांकनामध्ये किल्ल्यांच्या नैसर्गिक आणि सभोवतालच्या भूदृश्यांचे संरक्षण करण्यासाठी एक निश्चित ‘बफर झोन’ समाविष्ट आहे. याप्रमाणे वर दिलेल्या अपेक्षित घटकांचे विश्लेषण करा. त्यांचे शॉर्ट नोट्स बनवा आणि वारंवार रिव्हीजन करा. लक्षात ठेवा जेवढे अधिक रिव्हीजन तेवढे अधिक मार्क्स.