येत्या विवारी, २४ मे रोजी होणाऱ्या यूपीएससी पूर्व परीक्षेचा पेपर सोडविताना आपण काय काळजी घ्यायला हवी; ते आपण या लेखात बघणार आहोत. आपण वर्षभर केलेल्या अभ्यासाला पूर्वपरीक्षेच्या ४ तासांच्या अचूक रणनीतीची जोड मिळाली तर आपली पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होण्याची शक्यता वाढते. २०२५ च्या पूर्वपरीक्षेच्या पेपरची ‘उत्तरतालिका’ आयोगाने नुकतीच दिली असून; परीक्षेला जाण्यापूर्वी ती बघून घ्या.

यूपीएससी पूर्व परीक्षेचा पेपर सोडवणे म्हणजे केवळ तुमच्या ज्ञानाची परीक्षा नाही; तर ती मानसिक दडपणाखाली योग्य निर्णय घेणे, जोखमीचा अचूक अंदाज लावणे आणि वेळेचे नियोजन करणे याची परीक्षा आहे. यूपीएससीच्या बदलत्या आणि अनपेक्षित प्रश्न पद्धतीमुळे परीक्षा हॉलमध्ये पेपर सोडवण्यासाठी तुमच्याकडे एक सुनियोजित आराखडा असणे आवश्यक आहे. यात पुढील बाबींचा समावेश होतो –

मल्टि-राउंड अटेम्प्ट स्ट्रॅटेजी

प्रश्न क्रमांक १ ते १०० एकाच वेळी सलग सोडवण्याचा प्रयत्न कधीही करू नका. त्याऐवजी, तुमच्या २ तासांच्या वेळेची तीन वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये विभागणी करा.

पहिली फेरी: ‘आत्मविश्वास वाढवणारी फेरी’ (पहिली ४५-५० मिनिटे)

ज्या प्रश्नांची उत्तरे अगदी खात्रीशीर माहीत आहेत, ते गुण सुरक्षित करणे. संपूर्ण पेपरमधून जा आणि केवळ अशाच प्रश्नांची उत्तरे लिहा, ज्यांच्या उत्तरांबद्दल तुम्ही १००% खात्रीशीर आहात. पेपर सोडविण्याची सुरुवात तुम्ही तुमची पकड असलेल्या विषयापासून करू शकता. परंतु कोणत्याही एका प्रश्नावर ६०-९० सेकंदांपेक्षा जास्त वेळ रेंगाळू नका. जर एखादा प्रश्न कठीण किंवा संदिग्ध वाटत असेल, तर त्याला पुढील फेरीसाठी मार्क करा आणि पुढे जा. या फेरीत साधारणपणे ३५ ते ४५ प्रश्न अचूकतेने सोडवण्याचे लक्ष्य ठेवा. यामुळे तुमचा आत्मविश्वास कमालीचा वाढेल.

दुसरी फेरी: ‘५०-५० जोखीम’ (पुढील ४०-४५ मिनिटे)

ज्या प्रश्नांबद्दल तुम्हाला अंशतः (अर्धवट) माहिती आहे, त्यावर लक्ष केंद्रित करणे. अशा प्रश्नांवर लक्ष केंद्रित करा जिथे तुम्ही किमान दोन पर्याय नक्कीच चुकीचे आहेत हे ठरवू शकता. यामुळे प्रश्न ५०-५० च्या स्थितीत येतो. येथे तार्किक विचार वापरा. यूपीएससी उमेदवारांना फसवण्यासाठी अनेकदा वापरत असलेले ‘टोकाचे शब्द’, संकल्पनांमधील विरोधाभास किंवा अर्धवट सत्य असलेली विधाने शोधा. या फेरीत आणखी ३० ते ३५ प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा.

तिसरी फेरी: ‘अंतिम प्रयत्न’ (शेवटची १५-२० मिनिटे)

उर्वरित प्रश्नांचा आढावा घेणे. ज्या प्रश्नांमध्ये तुम्ही फक्त एकच पर्याय बाद करू शकला होतात, किंवा जे प्रश्न महत्त्वाच्या स्टॅटिक घटकांशी संबंधित आहेत, अशा प्रश्नांचा पुन्हा विचार करा. जर तुम्हाला प्रश्नाबद्दल काहीच कल्पना नसेल किंवा तुम्ही एकही पर्याय बाद करू शकत नसाल, तर तो प्रश्न पूर्णपणे सोडून द्या. अंदाजे उत्तरे लिहिल्यानेच गुण निगेटिव्हमध्ये जातात.

अटेम्प्ट

पेपरच्या काठिण्य पातळीनुसार नेमके किती प्रश्न अटेम्प्ट करायचे याची प्रश्न संख्या बदलू शकते, तरीही साधारणपणे ८० ते ८५ प्रश्न सोडवण्याचा सुरक्षित प्रयत्न बहुतांश यशस्वी उमेदवारांसाठी योग्य मानला जातो. खूप कमी प्रश्न (७० पेक्षा कमी) सोडवल्यास चुका सुधारण्यास वाव राहत नाही, तर खूप जास्त (९५ पेक्षा अधिक) प्रश्न सोडवल्यास अंदाजे उत्तरांमुळे मोठे नुकसान होऊ शकते. सध्याच्या कट-ऑफनुसार सुरक्षित स्कोर १०० गुण इतका आहे.

ओएमआर शीट

परीक्षा क्रमांक: ओएमआर शीटवर तुमचा परीक्षा क्रमांक काळजीपूर्वक भरा. त्यात चूक होता कामा नये.

उत्तरांचे गोल: शेवटच्या १० मिनिटांसाठी सर्व गोल करणे बाकी ठेवू नका. टप्प्या-टप्प्याने गोल करा. सर्वात चांगली पद्धत म्हणजे पहिली फेरी संपल्यानंतर लगेच त्या प्रश्नांचे गोल करून घेणे, आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीत प्रत्येक ५ ते १० प्रश्न सोडवल्यानंतर त्यांचे गोल करणे. प्रश्नांचा क्रम चुकू नये म्हणून गोल करताना नेहमी डाव्या हाताचे बोट प्रश्नपत्रिकेतील क्रमांकावर आणि उजवा हात ओएमआर शीटच्या योग्य रेषेवर ठेवा.

मानसिक नियंत्रण

पहिल्या ५ प्रश्नांचा सापळा: जर तुम्ही प्रश्नपत्रिका उघडली आणि पहिले ५ प्रश्न अत्यंत कठीण किंवा अनोळखी असतील, तर घाबरून जाऊ नका. बहुतेकदा आयोगाद्वारे सुरुवातीला असे कठीण प्रश्न देऊन तुमचा आत्मविश्वास तपासाला जातो. शांतपणे ते प्रश्न सोडून द्या, दीर्घ श्वास घ्या आणि थेट प्रश्नपत्रिकेच्या पुढील प्रश्नांकडे जा.

अनपेक्षित गोष्टींसाठी तयार राहा: यूपीएससी पर्यायांच्या रचनेत किंवा प्रश्नांच्या स्वरूपात नियमितपणे बदल करत असते. हे बदल सर्वांसाठीच असतात तेव्हा ते सकारात्मक मानसिकतेने स्वीकारा. आपण केलेला अभ्यास आणि कष्ट यावर विश्वास ठेवा.

सीसॅट’कडे दुर्लक्ष करू नका

तुम्हाला सीसॅटमध्ये फक्त ६६ गुणांची गरज आहे. गणित किंवा बुद्धिमत्तेच्या एखाद्या कठीण प्रश्नावर भावनिक होऊन वेळ वाया घालवू नका. तुमची पकड असलेले मजबूत घटक आधी सोडवा. उदा. जर तुमचे इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन चांगले असेल, तर ते आधी पूर्ण करा. त्यानंतर बेसिक मॅथ्स आणि लॉजिकल रिझनिंग सोडवून पात्रतेचा टप्पा सहज पार करा.

या सर्व बाबी लक्षात घेऊन २४ मे च्या परीक्षेला सामोरे जा. सर्वांना पूर्वपरीक्षेसाठी शुभेच्छा!

– sushilbari10@gmail.com