विद्यार्थीमित्रांनो, आजच्या लेखात आपण ‘विज्ञान-तंत्रज्ञान’ या विषयाचे यूपीएससी पूर्वपरीक्षा २०२५ चे प्रश्न समजून घेणार आहोत. या विषयातील प्रश्न चालू घडामोडींवर आधारित होते; ज्यामध्ये अंतराळ तंत्रज्ञान, एआय – कृत्रिम बुद्धिमत्ता, जैवतंत्रज्ञान, हरित ऊर्जा, सेमीकंडक्टर्स, क्वांटम तंत्रज्ञान आणि उदयोन्मुख नवोपक्रमांवर विशेष भर देण्यात आला होता. यामधील प्रश्नांना सामोरे जाताना केवळ तथ्ये महत्त्वाची नसून संकल्पनात्मक स्पष्टता, उपयोजनावर आधारित प्रश्न आणि एलिमिनेशन कौशल्यांची चाचणी आयोगाने घेतली हे आपणाला समजून घ्यावे लागेल.

आपण या बाबी पुढील प्रश्नांच्या आधारे समजून घेवूयात –

प्रश्न. खालील अंतराळ मोहिमांचा विचार करा:

I. ॲक्सिओम-४ II. स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट – स्पॅडेक्स III. गगनयान

वर दिलेल्या अंतराळ मोहिमांपैकी कितीने ‘मायक्रोग्रॅविटी’ (सूक्ष्म-गुरुत्वाकर्षण) संशोधनाला प्रोत्साहन आणि पाठबळ दिले आहे?

अ) फक्त एक ब) फक्त दोन क) तिन्ही ड) एकही नाही

I. ॲक्सिअम-४ : या मोहिमेचा मुख्य उद्देश पृथ्वीच्या खालच्या कक्षेतील वातावरणाचा वापर करून मानवी शरीरशास्त्र, अंतराळातील शेती, आणि बायोटेक्नॉलॉजी या क्षेत्रांमध्ये व्यापक मायक्रोग्रॅविटी (सूक्ष्म-गुरुत्वाकर्षण) संशोधन करणे हा आहे.

II. स्पेडेक्स : ही इस्रोची दोन उपग्रहांची मोहीम असून, अंतराळात दोन यान एकमेकांना जोडण्याचे तंत्रज्ञान विकसित करणे हा याचा मुख्य हेतू आहे. या मोहिमेमध्ये पीएसएलव्हीच्या चौथ्या टप्प्याचा वापर करून विविध शैक्षणिक संस्था आणि स्टार्टअप्सचे पेलोड्स अंतराळात पाठवले जाणार आहेत, जे मायक्रोग्रॅविटी वातावरणात वैज्ञानिक प्रयोग करतील.

III. गगनयान : हा भारताचा पहिला मानवरहित आणि मानवसहित अंतराळ प्रवास कार्यक्रम आहे. गगनयान मोहिमेदरम्यान अंतराळवीर पृथ्वीभोवतीच्या कक्षेत राहून मानवी आरोग्य, जैविक विज्ञान आणि द्रव गतिशास्त्र या विषयांवर मायक्रोग्रॅविटी प्रयोग करणार आहेत.

त्यामुळे, वरील तिन्ही अंतराळ मोहिमा मायक्रोग्रॅविटी संशोधनाला प्रोत्साहन आणि पाठबळ देतात. या प्रश्नावरून हे स्पष्ट होते की, महत्त्वाच्या अंतराळ मोहिमा पूर्वपरीक्षेसाठी आपण अभ्यासायला हव्यात.

पुढील प्रश्न बघा. या प्रश्नामुळे आपल्याला चालू घडामोडींचे महत्त्व समजून येते –

प्रश्न. प्रसारमाध्यमांमध्ये काहीवेळा चर्चेत असणाऱ्या ‘CL-20’, ‘HMX’ आणि ‘LLM-105’ या रासायनिक पदार्थांचे सामान्य वैशिष्ट्य काय आहे?

अ) हे हायड्रो-फ्लूरोकार्बन रेफ्रिजरंट्सना पर्याय आहेत.

ब) हे लष्करी शस्त्रास्त्रांमध्ये वापरले जाणारे स्फोटक आहेत.

क) हे क्रूझ क्षेपणास्त्रांसाठीचे उच्च-ऊर्जा इंधन आहेत.

ड) हे रॉकेट प्रक्षेपणासाठीचे इंधन आहेत.

‘CL-20’, ‘HMX’ आणि ‘LLM-105’ हे सर्व पदार्थ ‘उच्च-ऊर्जा स्फोटके’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रसायनांच्या वर्गातील आहेत. ही अत्यंत शक्तिशाली स्फोटक संयुगे प्रामुख्याने लष्करी वापरासाठी, विशेषतः क्षेपणास्त्रांची युद्धशिरसे, बॉम्ब आणि इतर अचूक मारा करणाऱ्या दारूगोळ्यामध्ये वापरण्यासाठी विकसित केली गेली आहेत.

पुढील प्रश्न बघा –

प्रश्न. इलेक्ट्रिक वाहन बॅटऱ्यांच्या संदर्भात, खालील घटकांचा विचार करा:

I. कोबाल्ट II. ग्रॅफाइट III. लिथियम IV. निकेल

वर दिलेल्या घटकांपैकी किती घटकांचा वापर सामान्यतः बॅटरीच्या ‘कॅथोड’ निर्मितीमध्ये होतो?

अ) फक्त एक ब) फक्त दोन क) फक्त तीन ड) चारही

बहुतेक इलेक्ट्रिक वाहनांमध्ये ‘लिथियम-आयन’ बॅटऱ्यांचा वापर केला जातो. या बॅटऱ्यांमध्ये दोन महत्त्वाचे इलेक्ट्रोड्स असतात:

कॅथोड (धन प्रभारित टोक/विद्युत अग्र): बॅटरी डिस्चार्ज (वापरली) होत असताना लिथियम आयन इथे साठवले जातात.

अॅनोड (ऋण प्रभारित टोक/विद्युत अग्र): बॅटरी चार्ज होत असताना लिथियम आयन या टोकाकडे सरकतात.

विधान I बरोबर आहे: कोबाल्ट – कॅथोडमध्ये वापरला जातो.

विधान II चुकीचे आहे: ग्रॅफाइट – अॅनोडमध्ये वापरला जातो.

विधान III बरोबर आहे: लिथियम – कॅथोडमध्ये वापरला जातो.

विधान IV बरोबर आहे: निकेल – कॅथोडमध्ये वापरला जातो.

सध्या ‘इलेक्ट्रिक वाहन’ चर्चेत असतात. शासनही त्यांना प्रोत्साहन देत असल्याने त्यांच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता अधिक असते. या पेपरमध्ये त्यांच्याशी संबंधित तंत्रज्ञानावर ३ प्रश्न विचारले आहेत.

पुढील प्रश्न बघितल्यास एक बाब निश्चित होते ती म्हणजे, आपण गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका बघायला हव्यात. ‘क्लाउड सीडिंग’ यावर बहुतेकदा प्रश्न विचारलेले आहेत –

प्रश्न. हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी कृत्रिमरीत्या पाऊस पाडण्याच्या पद्धतीमध्ये खालीलपैकी कशाचा वापर केला जातो?

अ) सिल्व्हर आयोडाइड आणि पोटॅशियम आयोडाइड

ब) सिल्व्हर नायट्रेट आणि पोटॅशियम आयोडाइड

क) सिल्व्हर आयोडाइड आणि पोटॅशियम नायट्रेट

ड) सिल्व्हर नायट्रेट आणि पोटॅशियम क्लोराईड

कृत्रिम पाऊस, ज्याला सामान्यतः ‘क्लाउड सीडिंग’ म्हणून ओळखले जाते, हे ढगांमधून पाऊस पाडण्यासाठी किंवा पावसाचे प्रमाण वाढवण्यासाठी वापरले जाणारे एक तंत्रज्ञान आहे.

क्लाउड सीडिंगच्या प्रक्रियेमध्ये वातावरणात काही विशिष्ट रासायनिक पदार्थ सोडले जातात, जे ढगांमध्ये सांद्रीभवन केंद्र किंवा बर्फाचे केंद्र म्हणून काम करतात. सिल्व्हर आयोडाइड सोबतच पोटॅशियम आयोडाइडचा देखील वापर केला जातो. हे देखील सांद्रीभवन केंद्र म्हणून काम करून ढगांमधून पाऊस पाडण्यास मदत करते; मात्र, सिल्व्हर आयोडाइडच्या तुलनेत याचा वापर कमी प्रमाणात होतो. ही रसायने एकत्र मिळून ढगांची पाऊस पाडण्याची क्षमता वाढवतात, ज्यामुळे हवेतील प्रदूषणकारी घटक पावसाच्या पाण्यासोबत जमिनीवर वाहून जातात आणि हवा स्वच्छ होते.

पूर्वपरीक्षेसाठी चालू घडामोडींशी संबंधित विज्ञान आणि तंत्रज्ञान, सरकारी उपक्रम, अंतराळ मोहिमा, जैवतंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर्स आणि पर्यावरण-तंत्रज्ञान या विषयांवर विशेष लक्ष केंद्रित करा. अपेक्षित घटक ओळखून त्यानुसार अभ्यास करा.

sushilbari10@gmail.com