निलेश देशपांडे
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील चार लेखांपासून केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेतील अनिवार्य मराठी पेपरबाबत माहिती घेत आहोत. पेपरचे स्वरूप, अभ्यासक्रम, तयारी कशी करावी? याबाबत आपण आढावा घेतला आहे. त्याचबरोबर मागील लेखामध्ये आपण २०२३ रोजी झालेला पेपर व त्याबाबत सखोल चर्चा केली आहे. मराठी अनिवार्य पेपर बाबत आपण पाहत असलेल्या या लेखमालेतील हे पाचवे व अखेरचे पुष्प आहे. सदर लेखामध्ये आपण २०२१, २०२२ व मागील झालेले पेपर व त्याचे स्वरूप, प्रश्नांची काठीण्यपातळी याबाबत सविस्तर आढावा घेणार आहोत.
मागील लेखात आपणास एकूण प्रश्न व त्यांचे स्वरूप समजले आहे. २०२३ चा पेपर हा आपणास सविस्तर समजला आहे. २०२२, २०२१ व त्याअगोदर झालेले पेपर यांचा आपण
आढावा घेताना सर्वात प्रथम आपण जाणून घेऊयात की, निबंध कशाप्रकारे विचारण्यात आले होते. २०२२ साली विचारलेले निबंध पुढीलप्रमाणे होते.
१) अक्षय ऊर्जा : शक्यता आणि आव्हाने
२) संज्ञापनक्रांतीचे महत्त्व
३) खेळांचे वाढते व्यावसायीकरण
४) खानपानाचा आरोग्यावरील परिणाम
त्याचबरोबर २०२१ साली विचारलेले निबंध पुढीलप्रमाणे होते.
१) मुलांच्या कुपोषणाची समस्या
२) वैश्विक शांततेपुढील आव्हाने
३) मातृभाषा व प्राथमिक शिक्षण
४) भाडोत्री मातृत्वाचा सामाजिक स्वीकार
मागील दोन्ही पेपरचे विषय पाहून एक बाब लक्षात येते आहे की, विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात केल्यापासून सामान्य अध्ययन पेपर व त्यासोबत चालू घडामोडीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. निबंधाचा सराव केवळ परीक्षेच्या कालावधीत न करता अभ्यासाला सुरुवात केल्यापासून वर्तमानपत्र वाचन करणे आवश्यक आहे. वरील विषय आरोग्य, विज्ञान, शिक्षण, भाषा या मुद्दय़ांशी संबंधित आहेत. वरील सर्व विषयांचा सांगोपांग उहापोह वर्तमानपत्रांमध्ये आढळतो.
आपणास चार विषय देऊन त्यापैकी एका विषयावर लेखन करावयाचे असल्याने किमान एक विषय आपणास सहजगत्या निवडता येतो.
विद्यार्थी मित्रांनो, विषयाची निवड केल्यानंतर सर्वात प्रथम त्या विषयाचे कच्चे मुद्दे तयार करा. तयार केलेल्या कच्च्या मुद्दय़ांचा योग्य क्रम लावून घ्या. प्रत्यक्ष निबंध लिहायला सुरूवात करताना आपण अगोदर समर्पक प्रस्तावना लिहून निबंधास सुरुवात करावी. निबंधाव्यतिरिक्त इतर प्रश्न सोडवताना आपणास लक्षात येते की, प्रश्न क्रमांक दोनमध्ये उतारा दिलेला असून त्याची संक्षिप्त उत्तरे देणे अपेक्षित आहे. २०२३ च्या पेपरप्रमाणे या २०२१ व २०२२ च्या पेपरमध्ये उतारे अत्यंत सोप्या भाषेत दिले गेले आहेत.
मागील चार लेख व हा अंतिम पाचवा लेख समजून घेताना आपण आयोगाचा पेपर समोर ठेवल्यास अधिक फायदा होईल.
प्रश्न क्रमांक ३ हा सारांश लेखनाचा असून २०२२ च्या पेपरमध्ये ३३३ शब्द तर २०२१ च्या पेपरमध्ये ३३८ शब्दांचा उतारा आयोगाने दिलेला होता. दोन्ही उतारे सोप्या व प्रमाण भाषेत असून आपण त्याचा एक तृतीयांश सारांश करावयाचा आहे. प्रश्न क्र. ४ व ५ हे अनुक्रमे भाषांतराचे आहेत. भाषांतर करण्यासाठी मराठी असो व इंग्रजी शब्दसंग्रह असणे खूप आवश्यक असते. आपल्याकडील शब्दसंग्रह व लेखन कौशल्याच्या बळावर आपण इंग्रजी व मराठी दोन्ही भाषांतरे व्यवस्थित करू शकतो. आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका सोडविणे हा आपल्यात कौशल्य आत्मसात करण्याचा, लेखन सरावाचा एक राजमार्ग आहे. आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचा सराव केल्याने आपल्यामध्ये पारंगतता येते.
प्रश्न क्र. ६ वा हा शब्दसंग्रह, म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, कल्पना विस्तार व संवाद लेखन या बाबींवर आधारलेला असतो. सदर प्रश्नांमध्ये अंग चोरणे, अंगवळणी पडणे, अंगाची लाही लाही होणे, अंगात वीज संचारणे इ. प्रकारच्या म्हणी व वाक्प्रचार विचारले गेले असून त्यांचा अर्थ सांगून वाक्यात वापर करावयाचा आहे. त्यानंतर १० गुणांसाठी २ कल्पना विस्तार विचारले असून, २०२१ च्या पेपरमध्ये ‘मानवता हाच खरा धर्म’ आणि ‘मी पाणी बोलत आहे’ हे दोन विषय दिले आहेत.
२०२२ मध्ये ‘म्हणी अनुभवाच्या खाणी’ व ‘यत्न तो देव जाणावा’ हे विषय दिलेले आहेत. विषय खूप सोपे आहेत. लेखन कौशल्य आत्मसात केल्यास कल्पना विस्तार सुंदर लिहिता येतो. २०२१ च्या पेपरमध्ये २० वाक्यात संवादलेखन करावयाचे असून ‘पावसाची विविध रूपे’ हा सुंदर विषय आपणास दिला आहे.
मित्रांनो, तीन तासांमध्ये आपणास हा संपूर्ण पेपर सोडवण्यासाठी वेळेचे व्यवस्थापन करून ठेवणे खूप महत्त्वाचे ठरते. वेळेचे व्यवस्थापन केल्यास कोणत्या प्रश्नास किती कालावधी देता येईल हे नेमकेपणाने ठरते. वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका सोडवणे व त्यातून स्वत: नियोजन करणे आवश्यक आहे.
स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात येऊन तयारी करू इच्छिणाऱ्या सर्व भावी अधिकाऱ्यांनी लेखन कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. वढरउ मध्ये यश मिळवण्यासाठी लेखन कौशल्य हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मागील अनुक्रमे चार व हा पाचवा लेख आपण अनिवार्य मराठी पेपरबाबत अत्यंत सविस्तर आढावा घेतला आहे. सदर पाचही लेखांमध्ये आपण अनिवार्य मराठी पेपरचे स्वरूप व तयारीचे टप्पे या बाबी सविस्तर अभ्यासल्या आहेत. या पेपरसाठी अभ्यास करत असताना संदर्भ साहित्य म्हणून आयोगाचे पेपर व दैनंदिन वर्तमानपत्र उदा. लोकसत्ता, द हिंदू, इंडियन एक्स्प्रेस रोज वाचणे आवश्यक आहे. अवांतर वाचन व दर्जेदार व्याख्याने ऐकल्यास नक्कीच फायदा होतो.