चंपत बोड्डेवार

आजघडीला बहुतांश सामाजिक घटक आणि त्यातील मुद्दे कमी अधिक प्रमाणात जागतिकीकरणाच्या प्रभावापासून अलिप्त राहू शकले नाहीत. त्यामुळे जागतिकीकरणाचा हा सामाजिक मुद्दा म्हणून समजून घेताना संकल्पना आणि त्याचा व्यवहार, त्यात गुंतलेले विविध प्रवाह, तसेच त्याकडे पाहण्याचे विविध दृष्टिकोन समजून घेणे आवश्यक आहे.

Nitish Kumar
नितीश कुमारांना ‘एनडीए’शी प्रामाणिक असण्याबाबत का वारंवार द्यावं लागतंय स्पष्टीकरण? ‘त्या’मागचं राजकारण काय?
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
Support for science and development through two new policies
दोन नव्या धोरणांतून विज्ञानाची साथ आणि विकासाची वाट…
Strong economic growth opportunities Financial sector in economics
लेख: …तरच सशक्त आर्थिक वाढीच्या भरपूर संधी!
Badlapur sexual assault case,
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण: आरोपीच्या चारित्र्याविषयी माहिती गोळा करण्याचे काम सुरू
india s defense export in marathi
विश्लेषण: संरक्षण सामग्री निर्यातीत लक्षणीय वाढ? निर्यात कशी वाढतेय?
Criticism of the government is Naxalism
सरकारवर टीका म्हणजे नक्षलवाद नव्हे!
article 107 of indian constitution provisions as to introduction and passing of bills
संविधानभान : कायदा कसा तयार होतो ?

सर्वसाधारणपणे संपूर्ण जगाचे एका मोठय़ा बाजारपेठेत रुपांतरीत होण्याच्या प्रक्रियेला जागतिकीकरण म्हणतात. वस्तू आणि सेवा तसेच भांडवल आणि श्रम यांच्या व्यापारावरील निर्बंध उठवून जागतिक पातळीवर व्यापार खुला करण्याची प्रक्रिया यात सामावलेली आहे. खऱ्या अर्थाने ही प्रक्रिया १९ व्या शतकापासून सुरू झाली. भांडवलशाहीची वाढ, उपलब्ध सागरी दळणवळण, टेलिग्रामपासून ते २० व्या शतकातील उपलब्ध हवाई मार्ग,  दूरध्वनी, संगणक, बहुराष्ट्रीय कंपन्या, व्यापार आणि गुंतवणुकीवरील निर्बंध सैल होण्यातून ही प्रक्रिया सुरू झाली. २० व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २१ व्या शतकाच्या पूर्वाधात माहिती तंत्रज्ञान, इंटरनेट आणि सेवांचा उदय आणि पुढे जागतिक पातळीवर व्यापार खुला झाल्याने जागतिकीकरणाच्या प्रक्रियेने वेग घेतला.

फ्रान्सिस फुकुयामा यांनी जागतिकीकरणाला ‘मानवी शासनाचे उदारमतवादी लोकशाहीचे अंतिम प्रारूप’ असे संबोधले. थॉमस फ्रीडमनच्या मते, जागतिकीकरण म्हणजे व्यापार, वित्त आणि माहितीच्या एकत्रिकरणातून एकच एक अशी जागतिक बाजारपेठ आणि संस्कृतीची निर्मिती होय. अँथनी गिडन्स म्हणतो त्याप्रमाणे, ‘जागतिकीकरण म्हणजे जगभरात सामाजिक संबंधांचे सघनीकरण घडून येणे होय.’ जागतिकीकरणाचा भारतीय समाजावरील परिणाम अभ्यासताना सामाज्याच्या संस्था, सामाजिक गट, संस्कृती या घटकांवर काय परिणाम होत आहेत ते समजून घेणे आवश्यक आहे.

२०२० मध्ये यूपीएससीने भारतातील विविधतेवर जागतिकीकारणाने काही आव्हान निर्माण केले का, या संदर्भात प्रश्न विचारला होता. २०२१ साली, जागतिकीकरणाचा संदर्भ घेऊन क्रिप्टो करन्सीवर भारतीय समाजात त्याचा काय प्रभाव असेल या आनुषंगाने प्रश्न विचारला होता. २०२२ मध्ये यूपीएससीने मर्यादित संसाधनांच्या संदर्भात जागतिकीकरण व नवे तंत्रज्ञान यांच्या संबंधावर भारताच्या संदर्भात प्रकाश टाकण्यास सांगितले होते.

आयोगाचा प्रश्न विचारण्याचा पॅटर्न बघता प्रत्येक घटकावर काय परिणाम होत आहे हे संक्षिप्तपणे अभ्यासणे आवश्यक आहे. सामाजिक संस्था म्हणजे कुटुंब व्यवस्था, जाती व्यवस्था, लग्न संस्था, धर्म, शिक्षण व्यवस्था इ. घटकांवर काय परिणाम होत आहे, सामाजिक गट म्हणजे लहान मुलं, स्त्रिया, वृद्ध, तरुण वर्ग, दलित, आदिवासी,  छॅइळद्र, विकलांग, अल्पसंख्यांक इ. लोकांवर काय परिणाम होत आहे आणि संस्कृती म्हणजे भाषा, चालीरीती, रूढीपरंपरा, खेळ, नृत्य, संगीत, नाटय़ परंपरा, सिनेमा, हस्तउद्योग, जेवणाच्या पद्धती, वेशभूषा इ. घटकांवर काय परिणाम होत आहेत हे अभ्यासणे आवश्यक आहे. या टॉपिकचा अभ्यास करताना जास्तीत जास्त उदाहरणे देण्याचा प्रयत्न करावा. जागतिकीकरणाच्या समर्थकांच्या मते, अविकसित आणि विकसनशील देशांच्या आर्थिक विकासाला गती प्राप्त होऊन विकसित देश आणि बहुराष्ट्रीय कंपन्या गरीब देशांत मोठी भांडवल गुंतवणूक करीत आहेत. अद्ययावत तंत्रज्ञानाचा प्रवाह मागास राष्ट्रांकडे जाताना दिसतो आहे. जागतिकीकरणाच्या धोरणातून दक्षिणपूर्व आशियायी देश आणि ब्राझील यांनी विकास संपादन केला.

याउलट, जागतिकीकरणांतर्गत उदारीकरण, खासगीकरण, तंत्रज्ञानात्मक क्रांती, बहुराष्ट्रीय कंपन्या, आंतरराष्ट्रीयीकरण, राष्ट्र-राज्याचा ऱ्हास,  कल्याणकारी राज्याचा ऱ्हास, बाजारपेठांचे सार्वभौमत्व, बहुसांस्कृतिकवाद असेही प्रवाह सुरू झाले. ‘जे स्थानिक आहे ते जागतिक आहे आणि जे जागतिक आहे ते स्थानिक आहे’ या प्रक्रियेला रॉबर्टसन ‘विशिष्ठतेचे सार्वत्रिकीकर’ आणि ‘सार्वत्रिकतेचे विशिष्टीकरण’ या रूपाने ओळखतो. संपूर्ण जग हे जागतिक खेडे बनून आजघडीला ‘विचार जागतिक आणि कृती राष्ट्रीय’ असाच नारा बळावत असल्याचे दिसते. ग्लोबल आणि लोकल यातून ग्लोकल बनले आहे. त्यामुळे अरेनाज यांनी यास ‘हायब्रीडायझेशन’ असे संबोधले. सांस्कृतिक आक्रमण आणि मागास राष्ट्रांचे आर्थिक सार्वभौमत्व पायदळी तुडवण्यामुळे जागतिकीकरणास नववसाहतवादाचे नवे रूप देखील मानण्यात येते. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये कोणतीही व्यक्ती स्वतंत्र अथवा विभक्त समूहाचा भाग न राहता संपूर्ण समाजच थेट जागतिक व्यवहाराशी जोडला गेला आहे.

जागतिकीकरणाचा सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनावर परिणाम झालेला दिसतो. कुटुंब व्यवस्था, विवाह, स्त्री-पुरुष संबंध, जाती, जनजाती, भाषा, इ. सामाजिक घटकांमध्ये सामाजिक-आर्थिक स्थित्यंतरे घडून येत आहेत. जागतिकीकरणामुळे लहान मुले, तरुण वर्ग आणि वृद्धांचे जीवनमान प्रभावित झालेले आहे. ग्राहकवादाच्या प्रभावातून नव समाज आकार घेत आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे लोकांच्या जीवनाचा सांस्कृतिक आकृतिबंध बदलत असून अमेरिकन कपडे, चायनीज अन्न, फ्रेंच व्हिस्की,  इंग्लिश पॉप संगीत याबाबी नित्य परिचयाच्या झालेल्या आहेत.

जागतिकीकरणातून नव्या नागरी समाजाची निर्मिती होत आहे.

जागतिकीकरणाचा स्पष्ट आविष्कार बाजार पेठा, व्यापार, वस्तू आणि वित्तीय गुंतवणूक या क्षेत्रातील आर्थिक प्रक्रियांमध्ये दिसून येतो. आर्थिक धोरणे, कृषी, रोजगार, नैसर्गिक आणि मानवी संसाधने यावरही जागतिकीकरणाचा प्रभाव दिसून येतो. जागतिकीकरणाची नैसर्गिक नाळ उदारीकरणाशी जोडली असल्याने जगभर भांडवलाचा प्रवाह व बहुराष्ट्रीय कंपन्या तसेच कॉर्पोरेशन स्वत:चे जाळे विणत आहेत. त्यातून डिस्नेफिकेशन, मॅकडोनाल्डायझेशन आणि कोकाकोलोनायझेशन इत्यादी शब्द आपल्या अंगवळणी पडत आहेत.

थेट परकीय गुंतवणूक हे जगभरातील घटीत बनले आहे. राष्ट्र-राज्याच्या सीमा धूसर होऊन ‘राष्ट्रांचे सार्वभौमत्व’ धोक्यात आलेले आहे. कल्याणकारी भूमिकेतून माघार घेऊन राज्याने कायदा सुव्यवस्था सांभाळावी, असा दबाव तयार होत आहे. राज्यसंस्था बिगर-राजकीय अभिकर्त्यांच्या मदतीने राज्यकारभार चालवत आहे. त्यातून प्रातिनिधिक लोकशाही राजकारणाचा अवकाश नागरी समाजाकडून गिळंकृत केला जात आहे.

जागतिकीकरणामुळे ‘राष्ट्रातीत नागरिकत्व’ निर्माण होत आहे. विल किमलिका यांच्या मते, आजघडीला ‘बहुसांस्कृतिक नागरिकत्व’ उदयाला येत आहे. पुढे ही प्रक्रिया अशीच सुरू राहिली तर गोल्डस्मिथच्या शब्दात  ‘जागतिक नागरिकत्व’ या संकल्पना मूर्त रूपात येऊ शकतील. या उलट जागतिकीकरणात सांस्कृतिक वैविध्य नष्ट होऊन एकछापी संस्कृती निर्माण होते, असाही प्रतिवाद केला जातो. विद्यार्थ्यांनी बदलती सार्वजनिक धोरण प्रक्रिया आणि योजना निर्मितीवरील जागतिकीकरणाचा प्रभाव समजून घ्यावा. जागतिकीकरणामुळे सामाजिक घटकांतील वाढती दरी आणि सामाजिक प्रश्नांबद्दल वाढती अनास्था याचाही विचार करावा. त्याचप्रमाणे जागतिकीकरणामुळे स्त्रिया, बालके, जाती-जनजाती, परिघावरील घटक यांच्या समोरची आव्हाने अभ्यासावीत. वृत्तपत्रात यासंबंधी आलेल्या विश्लेषणात्मक लेखांचा आधार घ्यावा.