UPSC success story of IAS Saikiran Nandala: UPSC म्हणजेच नागरी सेवा परीक्षा ही भारतातील एक देशव्यापी स्पर्धात्मक परीक्षा आहे. या परीक्षेसाठी देशभरातून लाखो उमेदवार तयारी करतात; पण त्यातील मोजकेच उत्तीर्ण होतात. कष्ट, मेहनत व अखंड संघर्ष करून काही जण त्यांचं हे स्वप्न पूर्ण करतात. आज आपण स्वत:चे हे स्वप्न पूर्ण करणाऱ्या साईकिरण नंदाला यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेणार आहोत. साईकिरण नंदाला हे तेलंगणातील करीमनगर जिल्ह्यातील वेलीचाला गावातील एका सामान्य विणकर कुटुंबामध्ये वाढले. त्यांच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले. त्यानंतर विडी बनविण्याचे काम करून, त्यांच्या आईने आपल्या मुलांना एकट्याने वाढवले. हेही वाचा. एकेकाळी हातगाडीवर विकायचे आईस्क्रीम अन् आता आहेत अब्जावधींचे मालक; वाचा एकविशीत कंपनी सुरू करणाऱ्या आर. जी. चंद्रमोगन यांची यशोगाथा साईकिरण यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या; परंतु त्यांनी त्या अडचणींवर मात करीत आपले स्वप्न साकार केले. UPSC नागरी सेवा परीक्षा २०२३ मध्ये २७ वा क्रमांक मिळवून साईकरण यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला . शिक्षण आणि कठोर परिश्रम साईकिरण यांचा शैक्षणिक प्रवासही संघर्षमय होता. शालेय शिक्षणानंतर त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT), वारंगल येथून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनियरिंगची पदवी प्राप्त केली. या काळात त्यांनी हैदराबाद येथील एका खासगी कंपनीत अभियंता म्हणून काम केले. तथापि, त्यांनी आयएएस (IAS) अधिकारी बनण्याचे स्वप्न ते पाहत होते. त्यांनी कधीही हार न मानता नागरी सेवा परीक्षेची तयारी केली. परीक्षेची तयारी आणि यश कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयामुळे साईकिरण यांनी UPSC नागरी सेवा परीक्षा २०२३ मध्ये २७ वा क्रमांक पटकावला. त्यांच्या या यशामुळे कुटुंबासह गावालाही त्यांचा अभिमान वाटला. अडचणी आणि संघर्ष करूनही प्रयत्नांतील सातत्य आणि समर्पणाने यश मिळवता येते. जे अथक कष्ट करीत राहतात, ते कधीच हरत नाहीत, हे वाक्य साईकिरण यांनी सत्यात उतरवले. त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासामुळे सगळ्यांनाच आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. हेही वाचा. समोसा विक्रेता होणार डॉक्टर! भाड्याची खोली, रात्रभर अभ्यास अन् ‘अशी’ केली NEETची परीक्षा पास; वाचा १८ वर्षाच्या सनी कुमारचा थक्क करणारा प्रवास … असं झालं कौतुक चोपडांडीचे माजी आमदार सांके रविशंकर यांच्यासह अनेकांनी साईकिरण यांच्या घरी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी गर्दी केली होती. त्यांनी या यशाबद्दल साईकिरण यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या मेहनत व समर्पणाचे कौतुक केले. साईकिरण यांची कथा हे एक असे सशक्त उदाहरण आहे की, कठीण परिस्थितीतही मनुष्य स्वप्ने साकार करून दाखवू शकतो.