या पेपरमध्ये भांडवली बाजारातील बॉन्डस्, स्टॉक्स, व्हेंचर कॅपिटल, हेज फंडस् इ., आरबीआय, अर्थमंत्रालयातील विविध विभाग, कर, संसाधणे, राष्ट्रीय गोकुळ योजना व पीएम सूर्य घर मूफ्त बिजली योजना यासारख्या शासकीय योजना, बँकिंग संबंधी संकल्पना – आरटीजीएस व नेफ्ट, आंतरराष्ट्रीय संघटना – ब्रीक्स्, बिमस्टेक इ. वर प्रश्न विचारले आहेत.

यूपीएससी पूर्वपरीक्षेत नियमितपणे काही ना काही धक्का तंत्र वापरत असते. २०२५ मध्ये आयोगाने पुढील प्रश्नाद्वारे विद्यार्थ्यांना सरप्राईज दिले –

प्रश्न. एका देशाची वित्तीय तूट ₹ ५०,००० कोटी आहे. त्या देशाला कर्ज-विरहित भांडवली पावत्यांद्वारे ₹ १०,००० कोटी मिळत आहेत. देशाची व्याजाची देयता ₹ १,५०० कोटी आहे. तर एकूण प्राथमिक तूट किती?

  • अ) ₹ ४८,५०० कोटी
  • ब) ₹ ५१,५०० कोटी
  • क) ₹ ५८,५०० कोटी
  • ड) वरीलपैकी कोणतेही नाही

एकूण प्राथमिक तूट काढण्यासाठी आपल्याला खालील सूत्राचा वापर करावा लागेल

  • एकूण प्राथमिक तूट = वित्तीय तूट – व्याज प्रदान

दिलेली माहिती

  • वित्तीय तूट = ₹ ५०,००० कोटी
  • व्याजाची देयता = ₹ १,५०० कोटी

प्राथमिक तुटीची थेट गणना करण्यासाठी ‘कर्ज-विरहित भांडवली पावत्यांची’ आवश्यकता नसते. त्या वित्तीय तुटीच्या वित्तपुरवठ्याचा भाग असतात, परंतु प्राथमिक तुटीच्या गणनेवर त्यांचा परिणाम होत नाही.

  • एकूण प्राथमिक तूट = ५०,००० – १,५०० = ४८,५०० कोटी

अशाप्रकारचा प्रश्न आयोगाने प्रथमच विचारला असून; इथे संकल्पना समजून त्याद्वारे आपल्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर काढायचे आहे. प्रश्न सोपा आहे परंतु परीक्षेच्या वेळी तुम्ही शांतपणे अशा प्रश्नांना सामोरे जाणे अपेक्षित आहे.

पुढील प्रश्न हा भांडवली बाजारावर आधारित आहे. आयोगाद्वारे यावर नियमित व मोठ्या प्रमाणावर प्रश्न विचारले जातात –

प्रश्न. गुंतवणुकीच्या संदर्भात, खालील बाबी विचारात घ्या

  • I. बाँड्स
  • II. हेज फंड्स
  • III. स्टॉक्स/शेअर्स
  • IV. व्हेंचर कॅपिटल

वरीलपैकी किती पर्यायांना ‘पर्यायी गुंतवणूक निधी’ मानले जाते?

  • अ) फक्त एक
  • ब) फक्त दोन
  • क) फक्त तीन
  • ड) वरील चारही

पर्यायी गुंतवणूक निधी म्हणजे भारतात स्थापन झालेला किंवा नोंदणीकृत झालेला असा कोणताही निधी, जो खाजगीरित्या एकत्रित केलेला गुंतवणुकीचे साधन आहे. हा निधी सुजाण गुंतवणूकदारांकडून (भारतीय किंवा परदेशी) गोळा केला जातो आणि गुंतवणूकदारांच्या फायद्यासाठी एका परिभाषित गुंतवणूक धोरणानुसार गुंतवला जातो.

सेबी नियमावली, २०१२ – नियम ३(४) नुसार, याचे तीन व्यापक श्रेणींमध्ये वर्गीकरण केले जाते: श्रेणी I, II आणि III.
पर्याय I चुकीचा आहे: स्टॉक्स जसे की इक्विटी शेअर्स, हे पारंपारिक गुंतवणूक साधन आहेत जे गुंतवणूकदाराची मालकी दर्शवतात.

पर्याय II बरोबर आहे: हेज फंड्स हे श्रेणी III मधील पर्यायी गुंतवणूक निधी आहेत, जे वैविध्यपूर्ण किंवा गुंतागुंतीच्या व्यापार धोरणांचा वापर करतात.

पर्याय III चुकीचा आहे: बाँड्स हे कर्ज रोख्यांचे एक प्रकार आहेत ज्याद्वारे गुंतवणूकदार एखाद्या कंपनीला किंवा सरकारला नियमित व्याज देयकाच्या बदल्यात पैसे कर्ज म्हणून देतो. यामध्ये गुंतवणूकदाराला त्या संस्थेमध्ये कोणताही मालकी हक्क मिळत नाही.

पर्याय IV बरोबर आहे: व्हेंचर कॅपिटल हा श्रेणी I मधील पर्यायी गुंतवणूक निधी आहे, जो प्रामुख्याने स्टार्टअप्स, सुरुवातीच्या टप्प्यातील उपक्रम, सामाजिक उपक्रम किंवा एमएसएमई मध्ये गुंतवणूक करतो.

पुढील प्रश्न हा ‘आरबीआय’शी संबंधित आहे –

प्रश्न. खालील विधानांचा विचार करा

  • I. भारतीय रिझर्व्ह बँक भारतातील सर्व सूचीबद्ध कंपन्यांना ‘व्यवसाय जबाबदारी आणि शाश्वतता अहवाल’ सादर करणे अनिवार्य करते.
  • II. भारतात, ‘व्यवसाय जबाबदारी आणि शाश्वतता अहवाल’ सादर करणारी कंपनी अहवालामध्ये प्रामुख्याने गैर-वित्तीय स्वरूपाची माहिती उघड करते.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?

  • अ) फक्त I
  • ब) फक्त II
  • क) I आणि II दोन्ही
  • ड) I किंवा II यांपैकी कोणतेही नाही

‘व्यवसाय जबाबदारी आणि शाश्वतता अहवाल’ ही एक भारतीय अहवाल प्रणाली आहे, ज्याचा उद्देश सूचीबद्ध कंपन्यांच्या पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन कामगिरीची माहिती उघड करणे आणि त्यात सुधारणा करणे हा आहे. याची मुळे २००९ मध्ये कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने सुरू केलेल्या ‘कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीवरील ऐच्छिक मार्गदर्शक तत्त्वां’मध्ये आढळतात.

विधान I चुकीचे आहे: सेबी (सूचीबद्धता जबाबदाऱ्या आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमावली, २०१५ नुसार, सेबी (RBI नव्हे) भारतातील पहिले १,००० सूचीबद्ध कंपन्यांना (बाजार भांडवलानुसार) ‘व्यवसाय जबाबदारी आणि शाश्वतता अहवाल’ सादर करणे अनिवार्य करते.

विधान II बरोबर आहे: ‘व्यवसाय जबाबदारी आणि शाश्वतता अहवाल’अंतर्गत केल्या जाणाऱ्या प्रकटीकरणामध्ये प्रामुख्याने गैर-वित्तीय माहितीचा समावेश होतो. यात पर्यावरणीय प्रभाव (उदा. कार्बन उत्सर्जन, पाण्याचा वापर), सामाजिक पैलू (उदा. कर्मचाऱ्यांचे कल्याण, लिंग विविधता) आणि प्रशासकीय बाबींचा (उदा. नैतिक व्यवसाय पद्धती) समावेश असतो, जे पारंपारिक वित्तीय अहवालांपेक्षा वेगळे असतात.

यावरून संकल्पनात्मक अभ्यासाचे महत्त्व अधोरेखित होते. तेव्हा या विषयाचा अभ्यास करताना ही बाब लक्षात घ्या.