SDM Rahul Sinha Success Story Viral Video : १०० पैकी १०० गुण मिळविणारा हुशार आणि काठावर पास होणार ढ, अशीच विद्यार्थ्यांची तुलना केली जाते. पण, कधी कधी फक्त १० वी आणि १२ वी शिकलेला विद्यार्थीसुद्धा चांगला पगार असणाऱ्या नोकरीवर रुजू होतात आणि पदव्युत्तर पदवी (मास्टर) मिळविलेला उमेदवार अनेकदा नोकरीच शोधत बसतो. त्यामुळे आयुष्यात फक्त गुण नाही, तर तुम्ही एखादी गोष्ट मिळविण्यासाठी, एखादे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही कुठून आणि कशी सुरुवात करता आदी अनेक गोष्टीही तुमच्या यशस्वीतेसाठी महत्त्वाच्या असतात. तर आज आपण अशाच एका यशस्वी उमेदवाराची गोष्ट जाणून घेणार आहोत…
बिहार लोकसेवा आयोग (BPSC) २०१९ च्या परीक्षेत ९२ वा क्रमांक मिळविणाऱ्या राहुल सिन्हा यांनी त्यांच्या प्रवासाबद्दलची माहिती एका व्हिडीओत सांगितली आहे. राहुल सिन्हा सध्या बिहार प्रशासकीय सेवेमध्ये जिल्हा उपदंडाधिकारी (SDM) म्हणून कार्यरत आहेत.
दहावीला फक्त ५२ टक्के मिळाले होते (Viral Video)
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, असे अनेकदा म्हटले जाते. अनेकदा लहानपणी मुलाला डान्स करणे, वाद्य वाजवणे आवडू लागले की, हा मोठा होऊन डान्सर, वादक होणार, असे आपण अगदी सहजपणे बोलून जातो. पण, कदाचित असे सगळ्यांच्या बाबतीत होत नसेल. कारण- राहुल सिन्हा यांनी व्हिडीओत सांगितले की, त्यांना दहावीला फक्त ५२ टक्के मिळाले होते. तसेच ते आयआयटीमध्ये तिन्ही प्रयत्नांत अनुत्तीर्ण झाल्यामुळे ते प्रवेश घेऊ शकले नाहीत. १२ वर्षांहून अधिक काळ त्यांनी फक्त संघर्ष केला; पण ते बिहार लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी बिहार लोकसेवा आयोग मेन्सच्या परीक्षेमध्ये ५३८ गुण व मुलाखतीत १०२ गुण मिळवले आणि त्यांना एसडीएम पद मिळाले.
व्हिडीओ नक्की बघा…
पण, हार मानण्याऐवजी ते प्रयत्न करीत राहिले म्हणून आज त्यांना आज यश मिळाले. राहुल सिन्हा यांनी, “तुम्ही उठता तेव्हा सकाळ होते”, असे म्हणत सांगितले की, तुमची पार्श्वभूमी काय हे खरंच तितकंसं महत्त्वाचं नसतं. तुम्ही कधी सुरुवात करायची हे तुमच्यावर अवलंबून असतं आणि जेव्हा तुम्ही पुढे जाण्याचा आणि तयारी करण्याचा निर्णय घेता, तेव्हा तुम्ही यशस्वी होता. आज त्यांची कहाणीने आपल्यासमोर असे एक प्रेरणादायी उदाहरण समोर ठेवले आहे की, तुम्हाला गुण नव्हे, तर जिद्द आणि प्रयत्न यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जातात.