ट्रान्सक्रिप्ट्स आणि प्रेडिक्टिव्ह स्कोअर्स किंवा प्रेडिक्टिव्ह्ज हे परदेशी विद्यापीठांच्या अर्जपक्रियेतील आणि त्यानंतरचेही महत्त्वाचे घटक आहेत. ट्रान्सक्रिप्ट हे विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रवासाचे अधिकृत रेकॉर्ड असते, तर प्रेडिक्टिव्ह मार्क्स हे अंदाजपत्रकासारखे असतात (विद्यार्थ्याला किती गुण मिळू शकतात ते प्रेडिक्टिव्हज् दर्शवतात), जे अंतिम परीक्षेच्या आधी प्रवेश प्रक्रियेस मदत करतात. दोन्ही कागदपत्रे महत्त्वाची असून, ती वेळेवर आणि योग्य स्वरूपात जमा करणे परदेशी विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक आहे.
ट्रान्सक्रिप्ट्स म्हणजेआपल्याकडील मार्कशीट्ससारखा दस्तऐवज आणि प्रेडिक्टिव्ह हे आपल्याकडील शालेय व्यवस्थेमध्ये अस्तित्वात नाहीत. त्यामुळे भारतीय विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रेडिक्टिव्ह स्कोअर्सचा समावेश नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना ट्रान्सक्रिप्ट्सआणि प्रेडिक्टिव्ह स्कोअर्स किंवा प्रेडिक्टिव्ह म्हणजे काय हा प्रश्न पडणं साहजिक आहे.
● ट्रान्सक्रिप्ट्स आणि प्रेडिक्टिव्हज म्हणजे काय?
ट्रान्सक्रिप्ट्स म्हणजे थोडक्यात आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना हव्या असलेल्या स्वरुपातील गुणपत्रके. ट्रान्सक्रिप्ट्स हे विद्यार्थ्याचे शैक्षणिक कामगिरीचे अधिकृत रेकॉर्ड असते, ज्यामध्ये प्रत्येक विषयाचे गुण आणि ग्रेड यांचा तपशील असतो. हे प्रामुख्याने नववी ते बारावीपर्यंतच्या सर्व वर्गांसाठी आवश्यक असते. ट्रान्सक्रिप्ट्समध्ये विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव आणि शाळेचे नाव, विद्यार्थ्याने शिकलेले विषय आणि त्यांचे कोड्स (जर लागू असेल तर), प्रत्येक विषयाचे गुण (मार्क्स किंवा ग्रेड्स), सरासरी गुण (जीपीए किंवा टक्केवारी), अभ्यासक्रमाचा कालावधी (अॅकेडेमिक इयर), शाळेचा शिक्का आणि मुख्याध्यापकांची स्वाक्षरी इत्यादी गोष्टी समाविष्ट असणे अपेक्षित आहे.
याउलट प्रेडिक्टिव्ह मार्क्स ( Predictive Scores) म्हणजे विद्यार्थ्याच्या बारावीच्या अंतिम परीक्षेतील अपेक्षित गुण. जर विद्यार्थ्याने बारावीची अंतिम परीक्षा अद्याप दिलेली नसेल, तर त्याच्या शाळेतील शिक्षक विद्यार्थ्याच्या आतापर्यंतच्या शैक्षणिक कामगिरीच्या आधारे हे गुण एक प्रकारचं ‘अंदाजपत्रक’ म्हणून देतात. जेव्हा विद्यार्थी बारावीच्या अंतिम परीक्षेपूर्वी अर्ज करतो, तेव्हा त्याच्या बारावीतील गुणांच्या या अंदाजानुसार परदेशी विद्यापीठे त्याला प्रवेश देतात. बऱ्याच बोर्डांचा अंतिम निकाल वेळेत मिळत नाही, त्यामुळे सर्व विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया पुढे जावी म्हणून प्रेडिक्टिव्ह मार्क्स मागवतात.
● ट्रान्सक्रिप्ट्स आणि प्रेडिक्टिव्ह मार्क्स का आवश्यक आहेत?
भारतामध्ये असलेल्या भाषिक, प्रादेशिक आणि शैक्षणिक माध्यमांच्या विविधतेमुळे परदेशातील विद्यापीठांना भारतीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे अचूक मूल्यांकन करणे कठीण जाते. भारतात राज्यानुसार वेगवेगळ्या भाषा असून, गुणपत्रकांवरील माहिती, विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचे तपशील आणि विषयांची नावे यांची भाषा एकसारखी नसते. काही शाळा इंग्रजी, काही प्रादेशिक भाषांतून शिक्षण देतात. तसेच, केंद्रीय (सीबीएसई, आयसीएसई)आणि राज्य बोर्ड यांमध्ये अभ्यासक्रम, परीक्षा पद्धत आणि मूल्यमापनाची पद्धत यात बरेच अंतर असते. त्यामुळे गुणांचे तुलनात्मक विश्लेषण सोपे होण्यासाठी ट्रान्सक्रिप्ट्स आणि प्रेडिक्टिव्ह्जचा वापर केला जातो.
ट्रान्सक्रिप्ट्स आणि प्रेडिक्टिव्ह मार्क्स यामधील फरक
घटक ट्रान्सक्रिप्ट्स ( Transcripts) प्रेडिक्टिव्ह मार्क्स ( Predictive Scores)
व्याख्या शैक्षणिक निकालांचे अधिकृत रेकॉर्ड शाळेने अंदाजे दिलेले अपेक्षित गुण
कधी दिले जातात? नववी ते बारावी सर्व वर्षांचे १२वीची अंतिम परीक्षा होण्यापूर्वी
कोण देते? शाळा किंवा शिक्षण मंडळ ( Board) शाळा/शाळेतील शिक्षक किंवा समन्वयक
विश्वासार्हता अधिकृत दस्तऐवज, प्रवेश प्रक्रियेसाठी तात्पुरता उपयोग, अंतिम गुणांवर प्रवेश ठरतो.
अनिवार्य.
विद्यार्थ्यांसाठी
विद्यार्थीमित्रांनो, ट्रान्सक्रिप्ट्स आणि प्रेडिक्टिव्ह सहसा दोन प्रकारे सादर करता येते. अधिकृत ट्रान्सक्रिप्ट ( Official Transcript) आणि अनधिकृत ट्रान्सक्रिप्ट ( Unofficial Transcript). अधिकृत ट्रान्सक्रिप्ट (आणि प्रेडिक्टिव्हजसुद्धा) हे थेट शाळेकडून त्यांच्या सही-शिक्क्यासहित विद्यापीठाला पाठवले जाते आणि अनधिकृत ट्रान्सक्रिप्ट विद्यार्थ्याने शाळेच्या वतीने स्वत: विद्यापीठाला सादर केलेले असते. अनेक विद्यापीठे अनधिकृत ट्रान्सक्रिप्ट प्राथमिक टप्प्यात स्वीकारतात, परंतु अंतिम प्रवेशासाठी अधिकृत ट्रान्सक्रिप्ट आवश्यक असते. याशिवाय फक्त प्रेडिक्टिव्हज् बद्दल सांगायचे झाले तर प्रेडिक्टिव्ह मार्क्स महत्त्वाचे आहेत, कारण जर बारावीचा अंतिम निकाल वेळेत मिळत नसेल, तरीही विद्यापीठ प्रवेश प्रक्रियेसाठी न थांबता पुढे जाऊ शकते. तसेच, काही विद्यापीठे शिष्यवृत्ती किंवा अटी-शर्तीच्या ( Conditional) विद्यापीठ प्रवेशासाठी याचा उपयोग करतात.
theusscholar@gmail. com